तोल सुटलेल्या ममता...

    दिनांक  06-Jun-2019   बंगालमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रवादाचे खोलवरचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. ज्यांच्यापुढे आपण केवळ नतमस्तकच होऊ शकतो, अशी हिमालयाच्या उंचीची बरोबरी करणारी थोर माणसे बंगालमध्ये झाली. ममता बॅनर्जींवर त्यांचे काही संस्कार आहेत का?


गरज उठे गगन सारा,

समुद्र छोडे अपना किनारा

हिल जाए जहाँ सारा,

जब गुंजे जय श्रीराम का नारा...

 

रामनामाच्या सामर्थ्याच्या या दोन हिंदी ओळी आहेत. समुद्राने आपला किनारा सोडला की नाही, हे माहीत नाही. परंतु, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला संयम सोडला. सार्वजनिक नळावर पाणी भरताना स्त्रिया भांडण करतात, ते ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या लोकांवर धावून जाणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणजे नळावर भांडण करणारी बाईच वाटली असेल. राज्याची मुख्यमंत्री आपली मर्यादा सोडून, आपला आब सोडून आणि आपला सन्मान सोडून, गाडीतून दोन-तीन वेळा खाली उतरून घोषणाधाऱ्यांच्या अंगावर धावून जाते. हे बघायलादेखील कसे तरी वाटते. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांनी ४० मिनिटांचा टॉक शो केला. अर्णव गोस्वामी असेही खूप आक्रमक असतात. त्यांनी शब्द वापरला की, “ममता बॅनर्जी कमालीच्या निराश (Extreme frustration) झालेल्या आहेत.”’ या टॉक शोमध्ये त्यांनी गाडीत चढणाऱ्या-उतरणाऱ्या, चढणाऱ्या-उतरणाऱ्या ममता बॅनर्जी यांची व्हिडिओ क्लीप पाच-सात मिनिटे दाखविली. ममता बॅनर्जी यांनी संयम बाळगला असता आणि थोडे शहाणपण दाखवले असते, तर त्यांचा हा तमाशा सर्व देशभर गेला नसता. त्यांनी जर प्रतिघोषणा दिली असती, ‘जय सीतामय्या’ तर घोषणा देणाऱ्यांचा आवाज बंद झाला असता आणि वाहिन्यांनी त्यावर चर्चा सुरू केली असती- ममता बॅनर्जी स्त्री असल्यामुळे त्यांना सीतेची आठवण झाली. असे काहीही न करता, ममता बॅनर्जी यांनी असभ्य भाषेत घोषणा देणाऱ्यांना सुनावले. ती वाक्ये अशी आहेत - ‘तुम्ही आमच्यामुळे जीवंत आहात,’ ‘बंगाल हा नेहमीच बंगाल राहील, तो गुजरात होणार नाही,’ ‘मी तुमची कातडी सोलून काढीन,’ ‘या सर्वांची नावे लिहून घ्या, यांच्या घरांची तपासणी केली जाईल,’ ‘समोर या, साले गुंड,’ ‘तुम्ही जमीनदारांसारखे वागत आहात, तुम्ही बंगालचे नाहीत’ वगैरे... ‘जय श्रीराम’ची घोषणा देणाऱ्यांकडे हात लांब करून ममता बॅनर्जी अंगुलीनिर्देश करत आहेत. या प्रकारे एखाद्याकडे बोट दाखविणे हे चांगले समजले जात नाही. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात. शहाणा माणूस आपले आत्मपरिक्षण करतो.

 

ममता बॅनर्जींनी लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. भाजपला ‘रसगुल्ला’ मिळेल, असे जाहीर भाषणात म्हणणाऱ्या ममता यांना ‘रस’ नसलेले ‘गुल्ले’ मिळाले. त्यामुळे त्या संतापल्या आहेत. “माझ्या बंगालमध्ये मला आव्हान देण्याची हिंमत कुणात आहे? मी कम्युनिस्टांना हरविले, भाजप माझ्यापुढे तर किस झाड की मूली है?’ पंतप्रधानपदाचे, मोदींना राजकारणातून हद्दपार करण्याची स्वप्नं त्या बघत होत्या. आता त्यांनाच राजकारणातून हद्दपार होण्याची वेळ आलेली आहे. बंगाल भारताची बुद्धिमत्ता आहे. आज भारतात जेवढ्या म्हणून वैचारिक चळवळी आहेत, त्या सर्वांचा उगम या ना त्या स्वरूपात बंगालमध्ये झालेला आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार बंगालमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहिले होते. बंगालमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रवादाचे खोलवरचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. ज्यांच्यापुढे आपण केवळ नतमस्तकच होऊ शकतो, अशी हिमालयाच्या उंचीची बरोबरी करणारी थोर माणसे बंगालमध्ये झाली. ममता बॅनर्जींवर त्यांचे काही संस्कार आहेत का? ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात,“जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर तुम्हाला वाकायला शिकल पाहिजे. जे वाकत नाहीत, त्यांना काळ वाकायला लावतो.” ममता यांनी आपल्या वागण्यातून ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे हे वाक्य खरे करुन दाखविले आहे. ममतादीदी आज ‘बंगाल, बंगालची अस्मिता’ याची भाषा बोलू लागल्या आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी त्या गेल्या नाहीत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आणि देहबोलीतून बंगाल भारतापेक्षा वेगळा असे सूक्ष्मरूपाने का होईना जाणवू लागले आहे. त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की, भारतीय राष्ट्रवादाची जन्मभूमी बंगाल आहे. ‘वंदे मातरम्’चा जयघोष करणारी बंगालभूमी आहे. ‘जन-गण-मन’चे बोल बंगालच्या भूमीतूनच प्रकट झालेले आहेत. असा बंगाल ममतादीदींची खासगी मालमत्ता नाही, जहागीरदारी नाही.

 

ज्यांनी ‘वंदे मातरम्’ ही अमर मंत्रसाधना दिली, ते बंकिमचंद्र मातृभूमीविषयी म्हणतात,“मातृभूमी हीच आमची केवळ आई आहे. आमची मातृभूमी स्वर्गाहून सुंदर आहे. मातृभूमीशिवाय आम्हाला दुसरी माता नाही, आम्हाला कोणी पिता नाही, कोणी बंधू नाही, कोणी पत्नी नाही, कोणी अपत्य नाही, आम्हाला निवास नाही, आमच्याकडे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भारतमाता.” ‘आनंद मठ’ या कादंबरीतील हा संवाद आहे. आज देशात जो भारतमातेचा जयजयकार चालतो, त्याचा पहिला ध्वनी बंगालच्या भूमीत उमटलेला आहे. बंगालवर राज्य करीत असताना ममतादीदींना वाटायला लागले की, ‘मी म्हणजे बंगाल आणि मीच सांगेल तेच लोकांनी केले पाहिजे, मला कोणी विरोध करता कामा नये. जर कोणी विरोध केला तर तो मी पोलीसशक्ती वापरून दाबून टाकेन.’ सत्ता व्यक्तीला भ्रष्ट करते. सत्तेची नशा डोक्यात शिरल्यानंतर ती अधिकच भ्रष्ट करते. ममतादीदी यांनी आपल्या वर्तनातून हे सिद्ध करून दाखविले. रवींद्रनाथ म्हणतात,“ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्वामित्व असते, त्याला भीती वाटाव्या अशा अनेक गोष्टी असतात.” ज्याच्याकडे धनाचे स्वामित्व आहे, त्याला चोरांची खूप भीती असते. जवळच्या नातेवाईकांचीदेखील भीती असते आणि ज्याच्याकडे सत्तेचे स्वामित्व असते, त्याला सहकाऱ्यांची भीती असते. कधी कोण पाठीत खंजीर खुपसेल हे सांगता येत नाही. आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधी यांचा विश्वासघात केला. लोकसभेच्या १७ जागा गेल्यामुळे ममता आता आपले काय होणार, या चिंतेत आहेत.

 

देश गाढ निद्रेत असताना त्याला हलविण्याचे काम बंगाल आणि महाराष्ट्राने केले. महाराष्ट्राने भगव्याला नाकारले नाही. बंगाल मात्र दीर्घकाळ ‘लाल’ झाला. तेव्हा आमच्यासारख्यांना त्याचे फार दु:ख व्हायचे. ज्या बंगालने रामकृष्ण परमहंस दिले, विवेकानंद दिले, बंकिमचंद्र दिले, रवींद्रनाथ टागोर दिले, योगी अरविंद दिले, सुभाषचंद्र बोस दिले, तो बंगाल देव न मानणाऱ्या, राष्ट्र न मानणाऱ्या, भारतीय संस्कृती न मानणाऱ्या लालभाईंच्या ताब्यात कसा गेला? ममता बॅनर्जी यांनी बंगाल लालभाईंच्या तावडीतून सोडविला, खूप मोठे ऐतिहासिक काम केले. हे ऐतिहासिक काम नवीन इतिहास घडविणारे करण्याऐवजी त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन सुरू केले. दुर्गापूजा, गणेशपूजा, यावर बंधने घालायला सुरुवात केली. घुसखोर बांगलादेशीयांना मतदार केले. ज्या बंगालने फाळणीचा अनुभव घेतला, लाखो हिंदूंच्या कत्तली अनुभवल्या, तो बंगाल पुन्हा फाळणीपूर्व स्थितीला जाणार का? ही चिंता सुरू झाली. ममतादीदींनी ‘विवेकानंदांचा बंगाल’, ‘सुभाषबाबूंचा बंगाल’ उभा करायला पाहिजे होता. त्याऐवजी ‘सुर्रावर्दींचा बंगाल’ उभा करण्याच्या मागे त्या लागल्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या रूपाने ‘विवेकानंदशक्ती’ उभी राहिली आहे. भारताचे बौद्धिक नेतृत्त्व करणारा बंगाल, पुन्हा एकदा उभा राहण्याच्या स्थितीत येत चालला आहे आणि त्यासाठी बंगालमध्ये सत्ता परिवर्तन अनिवार्य झालेले आहे. लालभाई, हिरवी शाई, या मार्गाने जाणार बंगाल आता ‘भगवेकरण’ होण्याच्या दिशेने चाललेला आहे. नेहमीप्रमाणे लालभाई, हिरवेभाई, पांढरेभाई, यांना हे आवडणार नाही. ते त्यांच्या सवयीप्रमाणे बोंबाबोंब करीत राहतील. श्वानांचा स्वभाव नवीन कोणी आले की, भुंकण्याचाच असतो, ती त्यांची जन्मजात खोड आहे, त्यात आपण बदल नाही करू शकत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat