पॅडवुमन

    दिनांक  04-Jun-2019
गावातील गरीब महिला-मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स पुरविणाऱ्या सुहाना मोहन या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी...

 

भारतीय महिलांमध्ये मासिक पाळीबाबत आजही अनेक गैरसमज दिसून येतात. त्यातही सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करण्याची विशेषत: ग्रामीण भागातील महिलांची तयारी नसते. त्यामुळे अशा महिलांनी खासकरून सॅनिटरी नॅपकिन्स वापरावेत, यासाठी आरोग्य पातळीवर व्यापक प्रयत्न होताना दिसतात. असेच या महिलांची मानसिकता बदलण्याचे मोठे काम केले आहे सुहाना मोहन या तरुणीने. सुहानाने गावातील महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी जनजागृतीचे कार्य हाती घेतले. गेली कित्येक वर्षे ती या समाजकार्यात अग्रेसर असून अनेक अडचणींवर मात करत तिने बऱ्याच स्त्रियांना मार्गदर्शन केले आहे. सुहाना मोठ्या प्रमाणात महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटपही करतात. त्याचे फायदे महिलांना समजावून सांगतात. २८ वर्षीय सुहाना तशी लहानपणापासूनच संवेदनशील. वयात आल्यावर तिला मासिक पाळीच्या वेळी कितीतरी महिला आरोग्याची योग्य निगा न राखल्यामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे वास्तव लक्षात आले आणि तेव्हापासून हे विदारक चित्र बदलण्यासाठी सुहानाने पुढाकार घेण्याचा दृढनिश्चय केला. मुंबईच्या एका सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या सुहानाला अजिबात कल्पना नव्हती की, भारतातील ३५५ दशलक्ष स्त्रियांपैकी ८८ टक्के स्त्रियांना सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लाजेेखातर काही मुली मासिक पाळीत शाळा सोडून घरी बसणेच पसंत करतात. त्यामुळे सुहानाने केवळ महिलांना मासिक पाळीच्या समस्येतूनच नव्हे, तर मासिक पाळीशी जोडलेल्या कलंकापासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. पुढे सुहानाला आढळून आले की, औषधांच्या दुकानातसुद्धा सॅनिटरी पॅडच्या नोंदी कमी आहेत.

 

मासिक पाळीच्या काळात चांगले स्वास्थ्य राखण्यासाठी ग्रामीण महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नसल्याचे तिच्या लक्षात आले. म्हणूनच मग सुहाना अरुणाचलम मुरुगुनथम यांना भेटली, जे कमी खर्चिक सॅनिटरी पॅड बनविणारे पॅडमनम्हणून ओळखले जातात. सुहाना म्हणते की, “मी मुरुगुनथम यांचे सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादनाचे काही युनिट्स पाहण्यासाठी गेले आणि त्यानंतर मी हाच माझा कायमस्वरूपी व्यवसाय म्हणून सुरू करण्याचा विचार केला. पण मला जाणवले की, हे काम अतिशय श्रमकेंद्रित आहे. दहा महिला दिवसभरात केवळ ५०० पॅड्स तयार करायच्या. पण, मला यापेक्षा अधिक पॅड्सची गरज होती. तसेच, त्या पॅडची किंमत पाच रुपये होती आणि मुरुगुनथम हे पॅड्स तीन रुपयांना विकत होते. त्यामुळे हे एक ग्रॅण्ड-फंडेड मॉडेल होते,” अशी सुहानाने आपल्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यामागील भूमिका सांगितली. २०१५ च्या सुरुवातीस सुहाना आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थी कार्तिक मेहता यांना भेटली, जे विविध पॅकेजिंग कंपन्यांकरिता मशीन्स डिझाईन करत होते. एखाद्या सामाजिक कार्यासाठी मशीन डिझाईन करण्याबाबत मेहतांनीही सकारात्मकता दर्शविली. त्यानंतर सुहाना आणि मेहता यांनी पवई लेक व्हेंचरकडून पैसे उभे केले आणि अखेर २०१५ मध्ये स्वत:च्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनासाठी एक खास यंत्रप्रणाली विकसित केली, ज्याची क्षमता ही दररोज ५० हजार पॅड्स निर्मितीची होती. सुरुवातीच्या काही महिन्यांत सुहाना मुंबईच्या झोपडपट्ट्यांत त्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्स विक्रीसाठी गेली आणि तिथे तिने तीन पॅडचा एक पॅक फक्त १० रुपयांना विकला. असे असले तरी स्त्रिया मात्र अजूनही सॅनिटरी नॅपकिन्सपेक्षा कपड्यालाच प्राधान्य देत होत्या. त्यातच सुहानाने सर्वमान्य वितरण प्रणालीविरोधात निर्णय घेतला आणि समाजातील महिलांना घरोघरी जाऊन नॅपकिन्स विकले आणि त्याचबरोबर याच कामासाठी स्त्रियांना नोकरीसुद्धा देऊ केली. पण, लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये समस्या ही फक्त नॅपकिन्सच्या परवडण्याची नव्हती, तर ती वापराचीदेखील होती. कारण, अनेक महिलांना पॅड कसे वापरायचे, याचीच मुळी कल्पना नव्हती आणि त्यासाठी गरज होती ती समाजातील महिलांची मानसिकता बदलण्याची...

 

समाजातील महिलांच्या नेटवर्कद्वारे अॅक्टिव्ह पॅड विकण्याव्यतिरिक्त ६० टक्क्यांहून अधिक विक्री स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाते, जे मोठ्या प्रमाणावर हे पॅड्स सुहानाकडून खरेदी करतात. सुहाना-मेहता या जोडीने आता हे कमी खर्चातील पॅड निर्मितीचे तंत्रज्ञान बांगलादेश आणि नाम्बिबिया या देशातील उद्योजकांनादेखील विकले आहे. सुहाना देशभरात कमीतकमी अशा १०० मशीन्स उभारण्याची आणि पुढील एका वर्षात पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची आशा व्यक्त करतेय. त्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्सची बहुतेक विक्री पश्चिम भारतात होते. परंतु, आता बिहार आणि उत्तर-पूर्वेकडील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सुहाना सांगते. हे तंत्रज्ञान केवळ स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांनीही सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करावी म्हणून सुहाना भांडवल उभारणीसाठीदेखील साहाय्य करते. सुहानाला या समाजकार्यात अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. यासाठी ती आजही अहोरात्र गावोगावी फिरत असते. महिलांच्या बैठका घेऊन त्यांना आरोग्याविषयी जागरुक करत असते. सुहानाचे हे कार्य समाजातील अनेक गरीब स्त्रियांसाठी, मुलींसाठी एकप्रकारे जीवनदान ठरले आहे. तिच्या या कामासाठी तिला अनेक शुभेच्छा!

 

- कविता भोसले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat