मुंबई : 'स्टार्टअप इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्याला ७०१ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'मरिन स्टार्टअप'ला मोठा वाव आहे. त्याला चालना देण्यासाठी येत्या काळात धोरणात्मक पावले उचललेली दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २० मे रोजी व्यक्त केला.
नेस्को गोरेगाव येथे आयोजित दोन दिवसीय 'स्टार्टअप कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सुनील कुमार सिंह, आशिष लेले, व्यंकट मोहन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत देशभरातून ७० नवउद्यमी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, जगातील सर्वात जलदगतीने वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टम चीन नंतर भारत आहे. आज ज्या पद्धतीने भारतीय तरूणाई या क्षेत्रात दमदार कामगिरी करीत आहे, ते पाहता येत्या काही वर्षांत आपण जगात पाहिले असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाश्वतता आणि कार्यक्षमता या टप्प्यावर खरा उतरणाऱ्या संशोधनाला 'स्टार्टअप'शी जोडा. त्यांनतर मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. महाराष्ट्रात मरिन क्षेत्रात स्टार्टअपची मोठी संधी आहे. मरिन रोबोटिक्सची संकल्पना त्यादृष्टीने चर्चेत आली आहे. इको इंधनावर आपण 'कॅटामरान' चालवत आहोत. ही एक क्रांती आहे. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येऊ लागले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेची एक साखळी तयार झाली आहे. आजच्या परिषदेत तीन संस्थांनी सहभागी करून घेतले आहे. पण पुढच्या वेळी आम्ही केंद्र आणि राज्यातील सर्व संस्थांना सहभागी करून घेऊ.
स्टार्टअप इंडियाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्र देशाची स्टार्टअप राजधानी आहे. त्यामुळे हे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी तयार करीत आहोत. ही देशातील सर्वात मोठी इनोव्हेशन सिटी असेल. 'एज्यु सिटी' देखील तयार करीत आहोत. जगातील पहिल्या क्रमांकाच्या १२ विद्यापीठाचे कॅम्पस त्यात असतील. शिक्षणाला संशोधनाची जोड देऊन स्टार्टअपला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
४९ टक्के स्टार्टअप हे छोट्या शहरांमध्ये - जितेंद्र सिंह
- विद्यार्थी, स्टार्टअप, रिसर्चर आणि उद्योग जगतातील प्रतिनिधी आज या स्टार्टअप परिषदेला उपस्थित आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही परिषद महत्त्वपूर्ण आहे. पालकांमध्ये अद्याप स्टार्टअप बाबत हवी तितकी जागृती झालेली नाही. आजही सरकारी नोकरी, म्हणजे आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय मानण्याची पद्धत कायम आहे. त्यामुळे अशा परिषदांमध्ये पालकांना सहभागी करून घेणे, त्यांच्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्याची गरज आहे.
- भारतीय स्टार्टअपचा विचार करता, ४९ टक्के स्टार्टअप हे छोट्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे केवळ ग्रामीण भागात नव्हे, तर मोठ्या शहरातही स्टार्टअपबाबत जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्टार्टअप हे असे साधन आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेला पुढच्या काही वर्षांत सर्वोत्तम अर्थव्यवस्था बनवेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यावेळी केले.
गावागावात स्टार्टअप पोहोचवणार - लोढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे स्टार्टअपचे काम दिले, ते काहीतरी नवे करण्यासाठी. गेल्या सहा महिन्यांत आम्ही काही धोरणात्मक निर्णय घेतले. आम्ही नवी स्टार्टअप पॉलिसी आणली आहे. शहरातून गावात स्टार्टअप पोहोचवेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.