वाचक तितुका मेळवावा!

    दिनांक  20-Oct-2019 21:22:10   


 


ग्रंथसंकलन आणि त्याचे वाचन शांततामयी आणि विवेकी समाजाचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रंथालयाच्या कपाटात असणारी ही संपदा वाचकांच्या हातात असणे, हेदेखील वाचनसंस्कृतीची वाढ होण्यासाठी आवश्यक असेच आहे. याच जाणिवेतून नाशिकमधून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या संकल्पनेच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाचकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे ग्रंथांच्या जवळ येणे शक्य होत नाही. तेव्हा ग्रंथच वाचकांच्या दारी पोहोचवले तर, समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदतच होईल, या हेतूने ग्रंथपेटीच्या माध्यमातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’चा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्रातील जवळपास सगळी शहरे, देशातील अनेकविध राज्ये आणि जगातील बहुतांश राष्ट्रे येथे आजवर ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला गेली आहे.

 

आपल्या सहित्यात ग्रंथ, ज्ञान यांची कमतरता नाही, फक्त अडचण आहे ती उपलब्ध होण्यात. हीच अडचण ओळखून विनायक रानडे यांनी सुरू केलेला हा उपक्रम नुकताच दुबईमध्ये आपला करिष्मा दाखवून गेला. निमित्त होते दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचक तितुका मेळवावा’ या कार्यक्रमाचे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून दुबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे या उपस्थित होत्या. मागील पाच वर्षांतील लेखाजोखा वाचकांच्या समोर मांडला जावा, यासाठी वाचक हा घटक केंद्रस्थानी ठेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 

परदेशात स्थित मराठी कुटुंबीयांची पाल्ये त्या संबंधित देशातील संस्कृती, भाषा कळत-नकळत आत्मसात करत असतात. त्यामुळे अशा स्थितीत आपली मातृभाषा मराठीचे पाउलदेखील पुढे पडावे, मराठीचे ज्ञान आणि मराठीतील ज्ञान यांची कमान कायम चढती असावी, यासाठी मुले, पालक, मराठी शाळा संचालक आणि बालपेटी समन्वयक यांच्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच, यावेळी मराठी भाषेतील नवीन संधी उपस्थित वाचकांसमोर मांडण्यात आल्या. त्याचबरोबर आजच्या समाजमाध्यमप्रिय जगात कागदावर छापून आलेला मजकूर वाचण्यास प्राधान्य देण्याऐवजी ई-स्वरूपातील वाचन जास्त लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे आधुनिक काळाची गरज ओळखून आणि साहित्याची बदललेली साधने जसे- ब्लॉगिंग, ई-बुक, स्क्रिप्ट लिहिणे, अनुवाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अरुणा ढेरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपला लेखनप्रवास वाचकांसमोर उलगडून दाखविला.

 

तसेच परदेशस्थ मराठी वाचकांना मातृभाषा मराठी भाषेचे महत्त्व अत्यंत साधेपणाने समजावून सांगितले. अरुणाताई म्हणल्या की, “इंग्रजी ही जरी सर्वसामान्यत: वापराची भाषा झाली असली तरी, जशा आपण इतर परदेशी भाषा म्हणून शिकतो, तशी जोड भाषा म्हणून जरी मातृभाषा शिकली तरी ते आपली संस्कृती पुढे नेण्यास साहाय्यक ठरेल.” अतिशय कमी आणि मोजक्या अपेक्षेने देखील मातृभाषेचे संवर्धन आणि तिचा विकास आणि त्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन कसे करता येऊ शकते, याचा भावार्थ अरुणा ढेरे यांनी दुबईत उलगडून दाखविला.
 

जगातील तरुण हे वाचनाभिमुख होत असून त्यांची साधने आज बदलली आहेत. हे लक्षात घेत अरुणा ढेरे यांनी यावेळी आताच्या पिढीला समजेल, असे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. फेसबुक, ब्लॉग्स अशा विविध माध्यमांचा वापर करत लेखकांनी लिहिते होणे आवश्यक आहे, त्यातून चांगले साहित्य निर्माण होईल, असा आशावाददेखील अरुणा ढेरे यांनी यावेळी व्यक्त केला. साहित्य म्हटले की, साहित्यिकांना केंद्रस्थानी ठेवून आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत. मात्र, वाचकांना केंद्रस्थानी ठेऊन कार्यक्रम फार क्वचित होत असतात. दुबईच्या वाळवंटी प्रदेशात मराठीच्या वाचकांचा भरलेला हा मेळावा नक्कीच स्पृहणीय असाच आहे. अशा संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी साहित्य हे परदेशी भूमीवर रुजण्यास, फुलण्यास आणि पुढे जाण्यास नक्कीच मदत होईल. तसेच, राजकीय संबंध हे कायम चांगले असतील असे नसते मात्र, अशा सांस्कृतिक व्यासपिठांच्या माध्यमातून होणारे आदानप्रदान हे शाश्वत संबंधांची पायाभरणी करण्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील, असे वाटते.