एक पाऊल ऑलिम्पिकच्या दिशेने

    दिनांक  14-Jan-2019   


पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिम्पिकला सुरुवात होईल आणि भारताची तयारी याआधीच सुरू झाली आहे. भारतात खेळाडूंची कमी नाही, त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या या कच्च्या सोन्याला तळपणारे, झगझगीत सोने कसे करावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अगदी उत्तमरित्या ठाऊक होते आणि यात त्यांच्या या कार्याचा भार उचलला, तो क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आणि २०१८ पासून ‘खेलो इंडिया’ या युथ गेम्सची सुरुवात केली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश केवळ मुलांनी या स्पर्धेत भाग घ्यावे, पदक जिंकावे यापुरताच मर्यादित नव्हता तर, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या एक हजार स्पर्धकांना सरकारच्या वतीने आठ वर्षांसाठी पाच लाखांची शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेता येईल आणि अर्थातच या स्पर्धेमुळे सरकारने देशभरातील युवकांसाठी क्रीडा क्षेत्रातील संधीची अनेक कवाडे खुली केली. हा सगळा घाट घालण्याचा मोदींचा एकच उद्देश होता, तो म्हणजे ऑलिम्पिकच्या दिशेने एक पाऊल टाकणे. यावर्षी ‘खेलो इंडिया’ची धुरा महाराष्ट्र सरकारने आपल्या खांद्यावर घेतली आणि महाराष्ट्राने खरंच या मिळालेल्या संधीचे सोने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे उद्घाटन करताना, पदकांचा दुष्काळ संपेल, असे सांगितले होते आणि तसेच काहीसे होत आहे. गतवर्षी दुसर्‍या स्थानावर समाधान मानलेल्या महाराष्ट्राने यंदा मुसंडी मारत स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली होती. आजपर्यंत महाराष्ट्र अंक तालिकेत अव्वल स्थानी आहे. खरंतर आपल्या देशात प्रतिभावंतांची कमतरता नाही. मात्र, मुळात आपल्या देशातील सर्वसामान्य मुलांना ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणार्‍या केवळ दोन तीनच क्रीडा प्रकारांची माहिती असते. तेच खेळ मुले खेळत असतात. त्यांना इतर खेळांची माहितीच नसल्याने त्यांच्याकडून ऑलिम्पिकमध्ये पदकांची अपेक्षाच कशी करणार? त्यामुळे हे असे ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम केवळ पदकांच्या अपेक्षेने नाही तर, भविष्याच्या संधीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील मुलांना खेळांची माहिती मिळत आहे. खेळांचे अद्ययावत ज्ञान मुलांना मिळते. चांगले प्रशिक्षक, चांगली मैदाने, चांगले खेळाचे साहित्य खेळाडूंना मिळते. त्यामुळे कधी मैदाने न पाहिलेल्या मुलांसाठी ही स्पर्धा एक संधी आणि एका स्वप्नाचे बीज रोवते. त्यामुळे खरंतर मोदींनी ही स्पर्धा सुरू करून ऑलिम्पिकच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल सार्थकी लागणार, हे नक्की...

आता करो या मरो!

ऑस्ट्रेलियाविरोधात अगदी एकहाती सत्ता मिळवल्यासारखी कसोटी मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय सामन्यात मात्र विराटसेनेला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने धोबीपछाड देत भारताला तब्बल ३४ धावांनी नमवले. आता भारताला जर ही मालिका जिंकायची असेल तर, मंगळवारी अ‍ॅडलेड येथे होणारा सामना जिंकावा लागणार आहे. पण एकूणच अ‍ॅडलेड मैदानावरची भारताची खेळी बघता, भारताने २०१२ साली या मैदानावर शेवटचा सामना जिंकला होता. त्यामुळे भारताला सिडनी येथे झालेल्या सामन्यातील चुकांमधून शिकणे गरजेचे आहे. मागच्या सामन्यात भारतासाठी जमेची बाजू ठरली ती म्हणजे रोहित शर्माला मिळालेली लय. रोहित शर्माने १२९ चेंडूत १३३ धावा केल्या आणि एका विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सलामी फलंदाज म्हणून १३३ धावा करणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनेही ५१ धावा करत रोहितला साथ दिली. मात्र, त्याने त्याचे हे अर्धशतक ९१ चेंडूत केले. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मधल्या फळीत फलंदाजांचा चांगला भरणा करणे गरजेचे आहे. त्यातच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्या निलंबनामुळे संघात सामील झालेल्या विजय शंकर यालाही या सामन्यात खेळवण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे धोनीची संथ खेळी विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मागील सामन्याचा विचार केल्यास भारताच्या गोलंदाजांनाही विशेष चांगला खेळ करता आला नाही, ऑस्ट्रेलियाने अगदी सहजरित्या २८८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, या धावांचा पाठलाग करताना भारताला केवळ २५४ धावाच करता आल्या. यात सलामी फलंदाज शिखर धवन, मधल्या फळीतील दिनेश कार्तिक आणि स्वत: कर्णधार विराट कोहली यांना चांगली खेळी करता आली नाही. त्यातच अंबाती रायडू याने केलेल्या गोलंदाजीमुळेही भारताच्या अडचणीत वाढ झाली. त्याची गोलंदाजी आक्षेपार्ह असल्यामुळे त्याला पुढच्या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे विराटला जादा गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. परिणामी कसोटी मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या विराट सेनेला सामन्याला ‘करो या मरो’च्या विश्वासानेच तोंड द्यावे लागणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/