दीदी, तुम्हाला विमानच का हवे?

    दिनांक  05-Sep-2018   मंगळवारी दुपारच्या सुमारास द. कोलकात्यातील माजरहाट येथील पूल कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य ३० जण जखमी आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालच्याच उत्तरेकडील टोकावर असलेल्या दार्जिलिंगच्या दौर्यावर होत्या. तिथूनच त्यांनी कोलकात्यामधील अपघाताविषयी चिंता व्यक्त केली आणि बचावकार्य, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. पण, राज्याच्या प्रमुख म्हणून ममतादीदींना तत्काळ आपला दौरा रद्द करून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोलकात्यात दाखल व्हावेसे मात्र वाटले नाही. उलट, कोलकात्यासाठी दुपारनंतरचे विमान नसल्याचे सांगत त्यांनी रात्र दार्जिलिंगमध्येच काढणे पसंत केले. काल बुधवारी ममतादीदी कोलकात्यात दाखल झाल्याही असतीलही. पण, केवळ विमानाच्या अनुपलब्धतेमुळे राज्याच्या प्रमुखाने अशी जबाबदारी झटकणे कितपत योग्य? दुपारी १.४४ वाजता दार्जिलिंगहून कोलकात्यासाठी शेवटचे विमान सुटते. दिवसातून कोलकात्यासाठी दार्जिलिंगला केवळ पाच ते सहा उड्डाणे होतात, त्यापैकी दुपारी १.४४ चे शेवटचे. दार्जिलिंग ते कोलकाता हे राज्यांतर्गतच विमान प्रवासाचे अंतर केवळ १ तास १५ मिनिटांचे. तेव्हा, ममतादीदींना मुख्यमंत्री म्हणून चार्टर प्लेनची व्यवस्था करून संध्याकाळी कोलकात्यात पोहोचताही आले असते. पण, नाही. विमान नसल्याचे शुल्लक कारण पुढे करत प्रवास शक्य नसल्याची सबब पुढे करत माध्यमांचा रोष टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जर खरंच त्यांना अपघाताची कळकळ असती, जखमींची चिंता असती तर रस्तामार्गानेही जास्त वेळ लागला तरी त्या कोलकात्यात बुधवारी सकाळपर्यंत त्या पोहोचू शकल्या असत्या. रस्तामार्गानेही या जवळपास ६०० किमीच्या प्रवासाला १५ तास लागले असतेच. पण, आपल्या राज्यांच्या लोकांप्रती ममतादीदी म्हणतात तशा त्यांची आपुलकी, कर्तव्य तत्परता, आत्मीयता यांचे दर्शनही झाले असते. पण, अखडू दीदीच त्या... कोणालाही न जुमानणार्या. त्यांच्या ‘माटी’तील ‘मा-मानुष’ पुलाच्या ढिगार्याखाली चिरडून मेले, पण दीदींना मात्र राज्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाण्यासाठी विमानच हवे! यापूर्वीही दीदींच्या राज्यात पूल कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेलेच आहेत. पण, अजूनही दीदींना याचे गांभीर्य नाही. कारण, त्यांचे लक्ष दार्जिलिंगमध्ये बसूनही आता कोलकात्यातही नाही, तर थेट दिल्लीकडे आहे.

 

‘रिटर्न’ची रडारड

 

कालच मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकात रिटर्न प्रवास करणार्या प्रवाशांना मनसेने चोप देत लोकलमधून पिटाळून लावले. विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर स्थानकातून भरून आलेल्या या लोकलमध्ये अंबरनाथ सुरुवातीचे स्थानक असूनही चढायलाही जागा मिळत नाहीच. कारण, हे रिटर्न प्रवासी आधीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या लोकलमध्ये जागा पकडून बसतात. ही गत मुंबईतील एकट्या अंबरनाथ स्थानकाची नाही. ही परिस्थिती पश्चिम रेल्वेवरही पाहायला मिळते. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणारी लोकल बोरिवलीच्या दिशेने जातानाच मालाड आणि कांदिवली स्थानकात पूर्णत: भरून जाते. त्यामुळे बोरिवलीकरांना लोकलचे सुरुवातीचे स्थानक असूनही उभ्यानेच प्रवास करावा लागतो. नियमाच्या बाबतीत म्हणाल तर, रिटर्न प्रवास करणारे बहुतांश प्रवासी पासधारक असतात. त्यांच्याकडे पुढील एक-दोन स्थानकांपर्यंतचाही पास असतो. कारण, पासच्या किमती सारख्या तरी असतात किंवा किचिंत जास्त. त्यामुळे नियमान्वये रिटर्न प्रवास करणार्या प्रवाशांवर ‘विनातिकीट प्रवासी’ म्हणून कारवाईही करता येत नाही. त्यात गर्दीच्या या वेळेत टीसींचे-रेल्वे पोलिसांचे लोकलमध्ये चढणेही शक्य नाही. तेव्हा, रिटर्नची ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुख्य स्थानकांव्यतिरिक्त इतर गर्दीच्या स्थानकांमधून लोकल चालवायला हव्यात आणि जिथे सुरू केल्या आहेत, त्यांची संख्या तरी वाढवायला हवी. जसे मालाड स्थानकातून सकाळी केवळ दोनच लोकल ८ ते ८.३०च्या दरम्यान चर्चगेटकडे रवाना होतात. त्यानंतर मालाड स्थानकातून चर्चगेट लोकलमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते. पर्यायी, मालाडकर, कांदिवलीवासी रिटर्नचाच पर्याय स्वीकारतात. त्यात त्यांनाही वेळेपूर्वी निघावे लागतेच. पण, किमान लोकलमध्ये चढल्याचे समाधान. तेव्हा, मालाड, गोरेगाव, दिवा, घाटकोपर यांसारख्या गर्दीच्या स्थानकांतूनही लोकलच्या जादा फेर्या सुरू करणे हाच या समस्येवर उपाय ठरू शकतो. जेणेकरून त्या-त्या स्थानकांतील प्रवासी रिटर्न प्रवास करणार नाहीत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास मुंबईकरांच्या लोकलकळाही निश्चितच कमी होतील. त्यामुळे केवळ मेट्रो-मोनोसारख्या पर्यायी वाहतुकीच्या मार्गांचा विचार न होता, रेल्वेच्या उपलब्ध सेवासुविधांचा दर्जा कसा वाढविता येईल, याचा रेल्वेने सारासार विचार करावा, जेणेकरून मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होईल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/