पार्ट टाईम ‘कॉमेडीयन’

    दिनांक  11-Sep-2018   

 

 

 
उच्चभ्रू वस्तीत घरकाम ते स्टॅण्ड-अप कॉमेडी अशा प्रवासात आणि आपल्या कामात बायकांना मिळणार्‍या वागणुकीवर हसत हसत भाष्य करणार्‍या दीपिका यांचा हा प्रवास...
 
आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे कळल्यापासून किती तरी नवीन नवीन माध्यमं निर्माण झाली आणि लोक परखडपणे आपली मतं, भावना व्यक्त करू लागले. मग त्यात फेसबुक, व्हॉट्सअप आणि युट्युब यांसारख्या प्रसारमाध्यमांची चांदी झाली. कारण, यांच्याशिवाय सामान्य माणूस अभिव्यक्त होणार तरी कुठे! आणि यामुळेच विविध क्षेत्रं तयार होऊ लागली. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे ’स्टॅण्ड-अप कॉमेडी.’ भारतात किंवा इतर देशांमध्ये सध्या या क्षेत्राची खूपच चलती आहे. याआधीही हे क्षेत्र अस्तित्वात होतं; पण इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे या क्षेत्राच्या कक्षा रूंदावल्या आणि सर्व थरांतील लोकं या क्षेत्राचा भाग झाली.

 

पु. ल. देशपांडे नेहमीच म्हणायचे की, ”लोकांना हसवणारे श्रेष्ठ असतात. कारण, तेच सगळ्यात कठीण असते. त्यामुळे या क्षेत्राला कमी लेखण्याची चूक कोणी करू नये.” अशाच काहीशा आपल्या विनोदातून समाजातील दोन गटांमधील हसत हसत फरक सांगणार्‍या फुल टाईम बाई आणि पार्ट टाईम कॉमेडीयन म्हणजे दीपिका म्हात्रे.

 

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत घरकाम करणार्या दीपिका म्हात्रे सध्या समाजमाध्यमांवर आपल्या विनोदी फटकेबाजीमुळे चांगल्याच गाजत आहेत. पण, पहाटे लोकलमध्ये इमिटेशन ज्वेलरी, दागिन्यांची विक्री करुन घरकाम करण्यार्‍या दीपिका यांना असे विनोद का बरं करावेसे वाटले असतील? कदाचित आपल्याकडे विविध विचारसरणीची लोक असतात, काही लोकं आपल्याला कमी लेखतात, अशावेळी याच सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणालाही न दुखवता दाखवून द्यायचं की, ‘हम किसीसे कम नही।’ हेच कदाचित दीपिका यांनीही केलं असावं.

 

दीपिका यांनी केवळ 15-20 मिनिटांत घरकाम करणार्या बायका आणि त्यांना मिळणारी वागणूक यावर विनोदी पद्धतीने, पण संक्षिप्तपणे भाष्य केले. या उच्चभ्रू वस्तीत आमच्यासाठी वेगळी लिफ्ट, आम्ही कोणाशी बोलायचं नाही, घरातील सोफा, खुर्चीवर बसायचं नाही म्हणजे आम्ही साफ केलेल्या घरात आम्हाला राहायला काही नाही, हाच विरोधाभास मी विनोदात आणला,” असं त्या सगळ्यांना सांगतात. घरकाम करतो म्हणजे त्या ‘आपल्या खालच्या’ असं मानून सर्रास त्यांची पिळवणूक केली जाते. त्यांच्याकडे घरी पूजा असेल, तर आम्ही नमस्कार नाही करायचा; पण देवाचा प्रसाद मात्र आम्ही करायचा. म्हणजे चहा मागितला तरी देणार नाही, पण बाकी जेवण आम्हीच करायचं, यालाच तर म्हणतात विरोधाभास. हाच आपल्या हलक्या फुलक्या विनोदांनी त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. घरकाम काही बायका हौशीने करतात, तर काही परिस्थितीमुळे. दीपिका यांनाही परिस्थितीमुळेच हे काम करावं लागलं. म्हणून त्यांनी आपल्या कामाला कधीच कमी लेखलं नाही. दीपिका आणि त्यांच्या मैत्रिणींनी अनेक वेळा आपल्या हक्कासाठी संस्थेत जाऊन तक्रार करायचा विचार केला, पण पोटावर पाय येईल म्हणून त्यांनी हे टाळलं. दरम्यान, त्या काम करत असलेल्या इमारतीतील एकीने ‘महिला दिना‘च्या दिवशी ‘पिटार बॉक्स’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा उच्चभ्रू समाजातील मानसिकतेवर दीपिका यांनी पहिल्यांदा एक छोटंसं विनोदी नाट्य सादर केलं. सोसायटीतील श्रीमंत बायका ज्यांच्याकडे आम्ही दिवसभर राबतो त्या आम्हाला कसं वागवतात बघा, हा दीपिका यांच्या नाटकाचा विषय होता. मॉलमध्ये हजारो रुपये कपडे आणि इतर अनावश्यक वस्तूंवर खर्च करणार्या या बायका, आपल्या कामवाल्यांना पगार देताना मात्र हात आखडता घेतात. याच विषयावरच दीपिका यांचं 15-20 मिनिटांचं नाट्य त्यांच्या नकळत फेसबुकवर टाकलं गेलं आणि बघता बघता, लाखो लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि त्या बनल्या ‘पार्ट टाईम कॉमेडीयन.’ त्यांचा तो नकळत सादर केलेला विनोदी प्रयोग व्हायरल झाल्यावर लोकांनी त्यांना असे कार्यक्रम आवर्जून आयोजित करण्याचा सल्लाही दिला. याचे चांगले पैसेही त्यांना मिळायले लागले. दीपिका यांनी आतापर्यंत मुंबईत बरेच कार्यक्रम केले. हळूहळू त्यांनाही बदल जाणवू लागला. आता त्या घरकाम करत नसल्या तरी, त्यांच्या मैत्रिणींना मिळणारी काहीशी चांगली वागणूक पाहून त्यांना त्यांच्या कामाचं समाधान वाटतं. पण एवढं असलं तरी आजही त्या पहाटे उठून नालासोपारा ते मालाड लोकलमध्ये कानातील आणि इतर दागिने विकायचं काम करतात. कारण, कोणतंही काम मोठं किंवा छोट नसतं. हे त्या स्वत:ही मानतात आणि आपल्या मुलांनाही सांगतात. मात्र, उच्च आणि मध्यमवर्गाने आपली मानसिकता बदलावी आणि घरकाम करणार्या बायकांच्या कामाला किंमत द्यावी, जेवढ्या आपुलकीने ही लोकं आपली कामं करतात, तेवढ्याच आपुलकीने त्यांना वागवलं गेलं पाहिजे. एवढीचं काय ती दीपिका यांची अपेक्षा...
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/