‘ते’ आंदोलन आणि ‘हे’ आंदोलन...

    दिनांक  29-Mar-2018   

 


 
 
डॉ. बाबासाहेबांचा महाड चवदार तळ्यापासून सुरू झालेला लढा ज्ञानसंपन्न होण्याच्या दिशेने नेला पाहिजे. एका व्यक्ती विरुद्ध उभा केलेला लढा समाजाला क्षणिक समाधान देणारा, परंतु पदरात काहीच न टाकणारा असतो हे समजून घेतले पाहिजे.
 
 
प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराव भिडे यांच्या अटकेसाठी मुंबईत दि. २६ मार्च रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे स्वरूप कसे राहील? ३ जानेवारीप्रमाणे काचा फोडल्या जातील का? वाहतूक बंद होईल का? याविषयी मुंबईकरांच्या मनात खूप धाकधूक होती. सुदैवाने तसे काही घडले नाही. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे अभिनंदन करायला हरकत नाही. असे अभिनंदन करत असताना एक प्रश्न मनात निर्माण झाला की, एका मुंगीला मारण्यासाठी हत्तीदल आणणाऱ्याची काही गरज होती का? देशात आतापर्यंत असंख्य आंदोलने झाली. मुंबईकरांना ती काही नवीन नाहीत. ९ ऑगस्ट १९४२ ला ‘चले जाव’चे आंदोलनसुद्धा मुंबईतच सुरू झाले. मुंबईत जेव्हा कापडगिरण्या होत्या, तेव्हा गिरणी कामगारांच्या संपाने मुंबई हादरून जात असे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील टॅक्सीचालकांचे संप हा विषय साठ-सत्तरच्या दशकातील ज्वलंत विषय असे. पण असे कुठलेही आंदोलन एका व्यक्तीला लक्ष्य करून केले गेले नाही.
 
 
पुन्हा ती व्यक्ती कुणी विजय मल्ल्या नव्हे, नीरव मोदी नव्हे, दाऊद इब्राहिम नव्हे किंवा मेमन नव्हे. एक वयोवृद्ध, ज्याने आपले सर्व जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण केले आहे, अशी व्यक्ती. तिच्या विचारांसंबंधी किंवा कार्यासंबंधी मतभेद असू शकतात. तो राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. एक नैतिक शक्ती सोडली, तर या व्यक्तीजवळ दुसरी कोणतीही शक्ती नाही. त्यामुळे मनात प्रश्न आला की, एका वृद्धाला अटक करण्याची मागणी करून त्यासाठी शक्तीप्रदर्शन करणे म्हणजे मुंगीला चिरडण्यासाठी हत्तीदल घेऊन येणे होय, असे मला वाटते. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलने केली. महाड, अमरावती, पर्वती, आणि काळाराम मंदिर ही त्यातील प्रमुख आंदोलने आहेत.
 
 
मुंबईत गिरणी कामगारांचा संपही त्यांनी घडवून आणला. बाबासाहेबांची सर्व आंदोलने तत्त्वाच्या प्रस्थापनेसाठी होती. महाड सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी आपला लढा कशासाठी आहे, हे फार चांगल्या शब्दांत सांगितले. चवदार तळ्याचे पाणी पिऊन कुणी अमर होणार नव्हते किंवा त्यांचे दैन्य आणि दुःख संपणार होते, असेही नाही. तो लढा सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी होता. ‘‘तुम्ही जर आम्हाला हिंदू मानता तर जे सर्व हिंदूंना सामाजिक अधिकार आहेत, ते आम्हालादेखील मिळाले पाहिजेत,’’ अशी त्यांची बरोबरीची हक्क मागण्याची भूमिका होती. महाड चवदार तळ्याचा लढा कोणत्याही एका जाती विरुद्ध किंवा जातीसमूहाविरुद्ध नव्हता. तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘ब्राह्मणेतरांच्या विरुद्ध वापरण्यासाठी आपला उपयोग करू इच्छिणार्‍या धूर्ताच्या हातचे आपण बाहुले होणार नाही, अशी आपण खबरदारी घेतली पाहिजे. हिंदू संघटनवाद्यांचे प्रेम मायावी आहे.’’ अशा प्रकारे आपल्या अनुयायांना सावधानतेचा इशारा दिला होता. महाड चवदार तळे सत्याग्रहात गं. वि. सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे, टिपणीस आणि भिडे अशी मंडळी सामील झालेली होती. महाड सत्याग्रहाच्या दुसर्‍या टप्प्यात जेधे-जवळकर यांनी बाबासाहेबांना कळविले की, या सत्याग्रहाच्या चळवळीतून ब्राह्मण कार्यकर्ते बाहेर काढावे. ही अट आपल्याला मान्य नाही, असे स्पष्ट सांगून डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हाला जवळचा वाटतो. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर आम्हास इष्टच वाटतो... हे भांडण तत्त्वासाठी आहे. ते कोणत्याही एका व्यक्तीशी किंवा जातीशी नाही.’’ बाबासाहेबांच्या या विचारावर अधिक भाष्य करण्याची काही गरज आहे, असे वाटत नाही.
 
 
बाबासाहेबांनी तत्त्वासाठी भांडण केल्यामुळे आज त्यांच्या समतेचा विचार कुणी नाकारत नाही. जो जातीद्वेष करणारा झालेला नाही. याउलट अस्पृश्येतर समाजातील मंडळी या विचारांशी परिचित होतात. तेव्हा तेदेखील त्यांच्याशी सहमत होतात. बाबासाहेबांच्या विचारांचे हे सामर्थ्य आहे. बाबासाहेबांच्या लढ्याचे दुसरे वैशिष्ट्य असे दिसते की, लढा कोणाविरुद्ध करायचा आहे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा आहे, याचे त्यांना उत्तम भान असे. शेकडो लोकांना आज गोळा करून त्यांच्या भावना चेतवणे एक वेळ सोपे काम असते, परंतु त्यांना संयमाने एका दिशेने घेऊन जाणे अतिशय कठीण काम असते. २५, २६, २७ डिसेंबर १९२७ ला महाड येथे दुसरी परिषद झाली. या परिषदेत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, हिंदूमात्राच्या जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा प्रकाशित झाला. हजारो अनुयायी सत्याग्रहासाठी जमले होते, त्याचवेळी शासनाने १४४ कलम लावले. हे जमावबंदीचे कलम आहे आणि चवदार तळ्यावर जाण्यास मनाई केली. डॉ. बाबासाहेबांपुढे प्रश्न उभा राहिला की, बंदीहुकूम मोडून सत्याग्रह करायचा की बंदीहुकूम मानून सत्याग्रह स्थगित करायचा. एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढायचे की एका वेळी एकाच आघाडीवर लढायचे? दूरदर्शी नेता एका वेळी एकाच आघाडीवर लढण्याचा निर्णय घेतो. अनुयायांची इच्छा वाट्टेल ते झाले तरी सत्याग्रह करायचा, अशी होती. नेत्याने अनुयायांच्या मागे धावायचे नसते तर अनुयायांना आपल्या मागे आणायचे असते. म्हणून अनेकांची नाराजी पत्करून सत्याग्रह स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शासनाशी अनावश्यक संघर्ष टाळला. कारण त्यांना राजकारण करायचे नव्हते, तर सामाजिक क्रांतीचे समाजकारण करायचे होते. त्यावेळी त्यांच्या अनुयायांना त्यांचा निर्णय आवडला नाही, तरी आज असे म्हणावे लागते त्यांचा हा निर्णय अत्यंत दूरदर्शीपणाचा होता. पर्वतीच्या सत्याग्रहात सत्याग्रहींवर दगडफेक झाली आणि काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळीदेखील अनेकांना मारझोड झाली. बाबासाहेबांनी आदेश दिला असता तर त्याचा सूड त्यांच्या अनुयायांनी उगवला असता. हिंसेला हिंसेने उत्तर दिले असते. हिंसेने हिंसा थांबत नाही, मानवजातीचा हा इतिहास आहे. हिंसाचाराच्या स्मृती कायमस्वरूपी राहतात आणि समाजात त्या तेढ निर्माण करतात. काळाराम मंदिर सत्याग्रहात ज्या सत्याग्रही बंधूंना मार खावा लागला, तो वाया गेला नाही. काळाराम मंदिराचे आपले मुख्य पुजारी सुधीर महाराज यांनी २००५ साली काळाराम मंदिराच्या गर्भगृहात दलित बांधवांना नेले. त्यांचा सत्कार केला आणि ‘‘माझ्या आजोबांनी जी चूक केली त्याची मी दुरुस्ती करतो आहे,’’ अशी कबुली दिली. या ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार आहे. बाबासाहेबांनी संयम राखला. त्यामुळे मनपरिवर्तन घडले, समाजपरिवर्तन घडले. आज हे सर्व लढे अभ्यासाचे विषय झालेले आहेत. महाडमध्ये घरोघर नळ आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे आणि मंदिरे कायद्याने सर्वांसाठी खुली झाल्याने सत्याग्रहाची आवश्यकता उरली नाही. जुने प्रश्न संपतात, नवीन उभे राहतात किंवा जुनेच प्रश्न नव्या रूपात पुढे येतात. ‘कसेल त्याची जमीन’ असा कायदा झाला. तेव्हा दादासाहेब गायकवाडांनी प्रश्न केला की, ‘‘कसेल त्यांची जमीन, नसेल त्यांचे काय, म्हणजे भूमिहिनांना तुम्ही काय देणार आहात?’’ असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलन उभे केले. बाबासाहेबांचा विचार त्यांनी आपल्या परीने पुढे नेला. जमीन ही जशी संपत्ती आहे तशी संपत्तीची अनेक साधने आहेत. त्यामध्ये उद्योग हे एक महत्त्वाचे साधन आहे. चांगला व्यवसाय मिळणे हे महत्त्वाचे साधन आहे. आधुनिक काळात ज्ञानाला संपत्ती मानले जाते. हे ज्ञान कोणा पुराणाचे ज्ञान नसून किंवा अभ्यासक्रमाला लावलेल्या पुस्तकांचे ज्ञान नसून ते आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे. ज्याचा अनुभव आपण मोबाईल, इंटरनेटद्वारे रोज घेत असतो. देशभर आता मॅकडोनाल्ड, बाटा, केएफसी इत्यादींची दुकानेच दुकाने आहेत. ती त्या कंपनीच्या मालकीची नसतात. ती आपला ब्रॅण्ड विकतात आणि विक्रीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण करतात, एकसारखेपणा करतात. त्यामुळे ते अब्जावधी रुपये मिळवितात. मुंबईसारख्या मोठ्या शहरातून उबेर आणि ओलाची टॅक्सी चालवितात. त्या कंपन्यांनी अॅप तयार केले आहे. ते त्यांचे ज्ञान, गाडी तुमची, ड्रायव्हर तुमचा, त्यातून या कंपन्या करोडो रुपये मिळवितात.
 
 
आधुनिक काळात समाजाचे दैन्य, दुःख, दारिद्य्र दूर व्हायचे असेल तर तो ज्ञानसंपन्न होणे गरजेचे आहे. ते काम कोणी करायचे? भावना अडकविण्याचे काम सोपे आहे. ज्ञानाधारित समाज उभे करण्याचे काम खूपच कठीण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जात नाही. जो हे स्वीकारेल, त्यात प्राविण्य संपादन करील आणि लोकांच्या गरजा भागविल किंवा नवीन गरजा निर्माण करील, त्यांची जात कोणती हे कोणी विचारत नाही. डॉ. बाबासाहेबांचा महाड चवदार तळ्यापासून सुरू झालेला लढा ज्ञानसंपन्न होण्याच्या दिशेने नेला पाहिजे. एका व्यक्ती विरुद्ध उभा केलेला लढा समाजाला क्षणिक समाधान देणारा, परंतु पदरात काहीच न टाकणारा असतो हे समजून घेतले पाहिजे.
 
 
 
 
 
- रमेश पतंगे