सायकलवेड्या वेदांगीचा जगप्रवास

    दिनांक  24-Dec-2018   

 


 
 
 
वयाच्या २० व्या वर्षी २९ हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास करून आशियातील पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवणाऱ्या ध्येयवेड्या वेदांगी कुलकर्णीची कहाणी...
 

सायकल... खरंतर सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग ती पहिल्यांदा धडपडत चालवलेली सायकल असो किंवा एकदम सुसाट आपल्या मित्र-मैत्रिणींसमोर शायनिंग मारायला चालवलेली सायकल असो. सायकल ही लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीची. पण या सायकलवरून २९ किलोमीटरचासुद्धा प्रवास करावा असं सहसा कुणाला वाटणार नाही किंवा अशी कल्पनाही शक्यतो आपण करू शकत नाही. पण ते म्हणतात ना, ‘उम्मीदसे जादा सोचोगे, तो उससे दुगुना पाओगे,’ तसं काहीसं पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीबाबतीत घडलं. वय वर्ष केवळ २०. आत्ताच्या तारुण्यात धुंद झालेल्या मुलांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी होते, हे कळत नाही. त्या धुंद वयात वेदांगी दिवस-रात्र सायकल प्रवास करत होती. हे वाचून खरंतर आपल्याला नवल वाटेल पण, तिच्यासाठी हे स्वप्न होतं. एका सायकलवेडीचं स्वप्न. वेदांगीने केलेल्या या स्वप्नपूर्तीमुळे अवघ्या २० व्या वर्षी सर्वात कमी दिवसांत सायकलवरून जगाची सफर करण्याचा मान तिने पटकावला. २९ हजार किमींचा प्रवास तिने १५९ दिवसांत पार केला आणि असं करणारी ती आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे. हे आकडे वाचून खरंतर कोणाचेही डोळे भिरभिरतील पण, वेदांगी मात्र तिच्या या ध्येयावर ठाम होती. तिच्या मते, “कोणतीही स्वप्नं ही अशक्य नसतात. त्यामुळे हे माझ्याकडून होणार नाही, अशी जराही शंका मला वाटली नाही.” आपल्या स्वप्नाबद्दल आणि ध्येयाबद्दल २० व्या वर्षी एवढी ठाम मते असणारी फार मोजकी मुले असतात.

 

सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणे ही संकल्पना भारतात तेवढी कुणाला ज्ञात नाही. ही प्रदक्षिणा म्हणजे एका देशाच्या एका कोपऱ्यातून सुरू केलेला प्रवास हा दुसऱ्या कोपऱ्यात संपवणे. ही प्रदक्षिणा काहीजण धावत, चारचाकी, दुचाकी चालवतही करतात. पण सायकलवरून जगातल्या १४ देशांची सफर करण्याचा विक्रम याआधी संपूर्ण आशिया खंडात कोणी केलेला नाही, तो केला पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने. जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या पर्थ येथून सुरू केलेला हा २९ हजार किलोमीटरचा प्रवास १५९ दिवसांनी म्हणजे, २३ डिसेंबरला संपला. या प्रवासात तिने ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कॅनडा, आइसलँड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड यासारख्या एकूण १४ देशांचा प्रवास केला आहे. याबद्दल एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वेदांगी सांगते की, “मी दिवसाला ३०० किलोमीटर सायकल चालवायचे. या सर्व प्रवासादरम्यान मला काही चांगले आणि काही वाईट अनुभव आले. पण मी खचले नाही. काही हजार किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर माझे मन सुन्न झाले होते. फक्त मी पॅडल मारत होते.” या प्रवासाकरिता वेदांगीने दोन वर्षांपासून तयारीला सुरुवात केली होती.

 

वेदांगी सध्या लंडनमधील एका विद्यापीठातून स्पोर्टस मॅनेजमेंट विषयातील पदवी घेत असल्यामुळे तिला नवीन तंत्रज्ञानासह प्रशिक्षण तर मिळाले होते. या जगप्रवासात आपल्यासोबत काय होईल, याची तिला कल्पना नव्हती. असेच काहीसे प्रसंग तिच्या वाट्याला आले. १४ देशांचा प्रवास करताना कॅनडामध्ये तिच्या सायकलमागे कधी कुत्रे लागले, तर स्पेनमध्ये भुरटे चोरही मागे लागले. अशा प्रसंगांतून स्वत:ची यशस्वी सुटका करत तिने आपला प्रवास सुरू ठेवला. पण रशियात असताना वेदांगीचा आत्मविश्वास काहीसा ढासळला होता, जेव्हा उणे २ अंश वगैरे तापमानात संपूर्ण बर्फाच्छादित परिसरात तिला सायकल चालवावी लागली आणि एकटे राहावे लागले. तरी, तिने हिंमत न सोडता आपला प्रवास सुरूच ठेवला. त्यानंतर वेदांगीने अगदी ० ते ३८ अंश तापमानातही सायकलस्वारी केलीवेदांगीच्या या प्रवासावर तिचे बाबा अभिमानाने म्हणतात की, “जगभरात अतिशय मोजक्या लोकांनी हे अवघड आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वेदांगी हे करू शकली याचा मला अभिमान आहे.” वेदांगीसाठी खरंतर तिचे आई-बाबा प्रेरणास्थानी आहेत. कारण तिच्या मते, “मी हे सगळं करू शकले. कारण, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून, वयाच्या १९व्या वर्षापासून जगभरात एकटं फिरण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय हे केवळ त्यांना जातं.”

 

याआधी ब्रिटनच्या ३८ वर्षीय जेनी ग्राहम यांनी सर्वात कमी दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. जेनी यांना या सफरीसाठी १२४ दिवस लागले होते. हा विक्रम तोडणे वेदांगीला जमले नसले तरी, सायकलवरून जगप्रवास करणारी वेदांगी आशिया खंडातील एकमेव खेळाडू ठरली. आतापर्यंत वेदांगीने अनेक सायकल चालवण्याचे विक्रम केले असले आहेत. तरीसुद्धा हा तिच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० यात्रा तिने एकटीने केल्या आहेत. अशा या ध्येयवेड्या वेदांगीच्या यादीत अजून बरेच विक्रम आहेत आणि तिने जगातील सर्व रस्ते आपल्या सायकलने पालथे घालावेत, याकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून वेदांगीला शुभेच्छा...

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/