मराठी संतांनी रामाला परब्रह्म म्हणून आराध्य मानून त्याची स्तुतिस्तोत्रे गायली आहेत. पण, संत एकनाथ आणि संत समर्थ रामदास यांनी रामकथेकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले आणि परवशतेने गांजलेल्या, पिचलेल्या, आत्मस्वाभिमानहीन हिंदू समाजात पराक्रमी पुरुषार्थी कोदंडधारी रघुवीराचे गुणगान करीत क्षात्रतेजाचे जनजागरण केले. या दोन रामकथाकारांनी ‘देवबंधमोचक’ योद्धा रामाचे विजिगीषू दर्शन आपल्या साहित्यातून घडवले. ‘राम कर्ता’ हा त्यांचा निष्ठाभाव आदर्श व अनुकरणीय आहे.
रामकथेचा राष्ट्रीय दृष्टिकोन
रामकथेचा उलगडा समर्थ रामदासांनी राष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेला आहे व तसाच तो संत एकनाथांनी केलेला होता. अनेक वर्षांच्या परधर्मियांच्या जुलुमी राजवटीखाली पिचलेल्या एतद्देशीय प्रजेच्या मनात स्वधर्माबद्दल स्वाभिमान जागृत करण्याचा म्हणजेच राष्ट्रीय दृढभावाचा वन्हि चेतवण्याचा कर्मयज्ञ समर्थ रामदासांना मांडावयाचा होता व त्यासाठी दुष्टांचा संहार करून, सज्जनांच्या रक्षणाद्वारे धर्मचेतना जागविणारी सशस्त्र देवता समर्थांना हवी होती आणि कोदंडधारी रामचंद्र त्यासाठी अत्यंत सार्थ ठरणारी देवता होती. देवद्रोही नीतीभ्रष्ट रावणाचा संहार करून स्वधर्माची गुढी उभी करणारे प्रभू रामचंद्र हे ‘देवबंधविमोचक’ होते. प्रभू रामाने सर्वसामान्य वानरांना साथीला घेऊन बलाढ्य क्रूरकर्मा रावणाचा पराभव करून केवळ सीतामातेचीच सुटका केली असे नसून रावणाच्या बंदीशाळेत बंदी असलेल्या शेकडो देवांची मुक्तता केलेली आहे. त्यामुळेच एकनाथांप्रमाणे रामदासांनी ‘देवबंधमोचक’ म्हणून रामचद्रांवर स्तुतिसुमने उधळीत त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले आहेत. रावणाने सर्व देवांना बंदीवासात टाकले होते व त्यांची अवस्था सांगकाम्या घरगड्यासारखी करून टाकली होती. त्याचे वर्णन नाथांच्या व समर्थांच्या वाङ्मयात आढळते.
इंद्र चारी चंद्र छत्रधारी। यम पाणी वाहे घरी।
वायु सर्वदा पूजे वोसटी। विधी तेथे करी दळणकांडा।
नवग्रहची पीडा गाढी। ते रावणे घातले बांधवडी।
एवढेच नव्हे तर गणपती रावणाच्या बंदीवासात गाढवाचे कळप सांभाळतोय. प्रजापतीला निरोप्याचे काम दिलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी ‘लघुरामायणात’ नेमके असेच वर्णन केलेले आहे.
गणेश, गाढवे वळी।
परोपरी विटंबना। वंदेल कोण रावणा।
उदंड देव पीडिले। मदे पदासि खंडलो॥
रावणाच्या पीडाकारक बंदीवासातून सर्व देवांची सुटका रामाच्या पराक्रमाने झाली. अशा ‘परित्राणाय साधूनाम। विनाशाय च दुष्कृताम् ।’ बाणा असलेल्या कोदंडधारी रामाचे समर्थांनी ठिकठिकाणी चेतनादायी - स्फूर्तिदायी शब्दचित्र उभे केले व समाजात स्वधर्माविषयी, स्वदेशाविषयी स्वत्वाची भावना जागृत केली.
राम धर्माचे रक्षण। संरक्षण दासाचे॥
रामे ताटिका वधिली। राम सीता उद्धरली॥
रामे पाषाण तारिले। रामे दैत्य संहारिले।
रामे बंद सोडविल। आनंदले सुखर॥2॥
रामे रक्षिले भक्तासी। रामे सोडविले देवासी।....
आपणास राम या प्राप्त संकटकाळातून सोडवू शकतो, फक्त आपणही प्रयत्न केले पाहिजेत. प्रभू रामचंद्राचे वर्णन करताना अनेक ठिकाणी समर्थांना ‘पायी ब्रीदाचा तोडर’ असे करून रामरायाचे ब्रीदच आहे की दुर्जनांचा संहार, भक्तांचे रक्षण याची पुन्हा आठवण करून दिलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। अशा सुभाषितवजा उपदेशाचा समर्थांनी पुनःपुन्हा वर्षाव केला व अखेर त्याच्या या प्रयत्नांना रामकृपेने स्वराज्य प्राप्तीचे फळ लाभते. स्वराज्याचे जे स्वप्न त्यांनी ‘आनंदवनभुवनी’ काव्यात पाहिले ते सत्यात उरलेले पाहण्याचे भाग्य समर्थांना लाभले. हे रामकृपेचेच वरदान नव्हे काय?
दासबोधातील ‘राम कर्ता’
समर्थांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यातील समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणून ‘दासबोध’, ‘आत्माराम’ आणि ‘मनोबोध’(मनाचे श्लोक) यांना एक विशेष महत्त्व आहे. दासबोधाच्या प्रारंभी जे ‘नमन’ आहे त्यामध्ये रामदासांनी गणेश, शारदा, सद्गुरू, संत आणि कुलदैवत हे सर्व काही माझा रामच असल्याचे स्पष्ट कथन केलेले आहे.
गणेश, शारदा सद्गुरू। संत सज्जन कुळेश्वरू।
सर्वहि माझा रघुवीरू। सद्गुरू रूपे॥
‘आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः।’ हे वचन समर्थांच्या समग्र साहित्याचे अधिष्ठान आहे. ‘दासबोध’ व ‘आत्माराम’ या ग्रंथांना समर्थांनी ‘माझे स्वरूप स्वतः सिद्ध ।’ म्हटलेले आहे.
संत रामदास स्वामींनी जे जे कार्य केले, ते ते प्रभू रामाला स्मरून केले आणि त्या कार्याचे श्रेय स्वतःकडे न घेता रामचरणी अर्पण केले. ‘राम कर्ता’ हा त्यांचा एकूण कार्यभाव आहे. या विषयाच्या त्यांच्या अनेक काव्यरचना, पदे आहेत. दासबोधाच्या दशक 6 समास 7 मध्ये ते म्हणतात -
आमुचे कुळी रघुनाथ। रघुनाथे आमुचा परमार्थ।
जो समर्थाचा समर्थ। देवां सोडविता॥21॥
माझा राम देवांचा देव, समर्थांचा समर्थ आहे. ज्याने देवबंध विमोचन केलेले आहे. रामदास येथे रामाला ‘समर्थ’ म्हणून गौरवितात आणि पुढे आपल्या रामरूप कार्याने स्वतःही रामदासाचे, समर्थ रामदास होतात. उपासनेने दासाचे रामरूप होणे, दासाचे समर्थ होणे याचेच हे दर्शन आहे.
मनी धरावे ते होते। विघ्न अवघे नासोन जाते।
कृपा केलिया रघुनाथे। प्रचित येते ॥30॥
रघुनाथ भजने ज्ञान जाले। रघुनाथ भजने महत्त्व वाढले।
म्हणौनिया तुवां केले। पाहिजे आधी॥31॥
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे। ते तत्काळाचे सिद्धी पावे। (दासबोध 6/7)
संत रामदासांचे हे प्रत्ययाचे बोल आहेत. ते पारमार्थिकांएवढेच व्यावहारिक जगात गृहस्थांनाही उपयुक्त व लाभाचे आहेत. या श्लोकातून समर्थ आपणास गीता प्रणित निष्काम कर्म योगाचीच शिकवण देतात. ‘रघुनाथ स्मरोनी कार्य करावे।’ हे समर्थांच्या सकल कार्याचे मुख्य सूत्र आहे. तोच यशाचा, सुखाचा शाश्वत मार्ग ते उपासकांना दाखवतात. दासबोधाच्या शेवटी समारोपाच्या ओव्या मध्ये ‘राम कर्ता’ हाच भाव समर्थांनी प्रकट केलेला आहे.
भक्तांचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीने।
समर्थ कृपेची वचने। तो हा दासबोध॥
या ठिकाणी ‘राम’, ‘रघुनाथ’, ‘रघुवीर’ या नावांऐवजी समर्थ ‘दाशरथी’ अशा विशेषनामाची योजना करतात. एरवी आत्मारामाचा आग्रह करणारे समर्थ ठे राजा दशरथाचा पुत्र, अयोध्येचा राजा श्रीरामाचा निर्देश करतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.
धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले, आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ’ भाग-5)