विदेशातील शिक्षणाचे पूर्वीपासूनच भारतीयांना आकर्षण राहिले असून, आजही पदव्युत्तर व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अमेरिका, युके, ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडे दिसतो. त्यानिमित्ताने यामागची नेमकी कारणे, विद्यार्थी-पालकांची मानसिकता यांचा उहापोह करणारा हा लेख...
साधारणतः पदवी पात्रतेनंतर विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी संशोधनासह उच्च शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठ वा संशोधनासाठी जातात. गेल्या काही वर्षांत या संख्येत वाढ होत आहे. यंदादेखील पाश्चिमात्य देशांसह विविध देशांमध्ये उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय संख्येत वाढ होतानाच दोन बाबी प्रकर्षाने समोर आल्या. एक म्हणजे, पूर्वी महानगर-मेट्रो शहरांतूनच विद्यार्थी विदेशात पुढील शिक्षणासाठी जात असत, तर यावर्षी महानगरे वा राजधान्यांची मोठी शहरे सोडल्यास, अन्य शहरांमधून वा प्रसंगी विविध राज्यांच्या जिल्हास्थानांपासूनसुद्धा विदेशात पुढील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय स्वरुपात वाढ झाली असून, त्याचवेळी चीनच्या विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकडे भारतीय विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. शैक्षणिक संदर्भात या दोन्ही बाबी महत्त्वाच्या व दीर्घकालीन स्वरुपात परिणामकारक ठरणार्या आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याच्या संख्येत लक्षणीय स्वरुपात वाढ झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विदेशी शिक्षणसंस्था व विद्यापीठांनी स्वागत केले आहे. भारतीय शिक्षण, शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांचा दर्जा या सार्यांना यानिमित्ताने पोचपावती मिळाली आहे. यावेळचे अन्य वैशिष्ट्य म्हणजे, भारतातील विदेशात उच्च शिक्षणासाठी वा संशोधनासाठी जाणार्या विद्यार्थ्यांमध्ये महानगरांमधून जाणार्या विद्यार्थ्यांच्या जोडीलाच, इतर मोठी शहरे व काही ठिकाणी तर जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांचा सहभाग, संख्या व उत्साह बरोबरीने दिसतो. त्यातील काही विद्यार्थ्यांनी विदेशातील संशोधन-शिक्षणासाठी उपलब्ध असणार्या विविध शिष्यवृत्तींशिवाय विदेशातील व उच्च शिक्षणासाठी विविध बँकांमध्ये उपलब्ध असणार्या विशेष शिष्यवृत्तींसह शैक्षणिक कर्जाचादेखील प्रसंगी फायदा घेतला आहे. यावरून या विद्यार्थी व त्यांच्या पालकांची विदेशी शिक्षणासाठी असणारी जिद्द व तयारीच दिसून येते.
भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिक्षण-संशोधनासाठी मदत-मार्गदर्शन करणार्या ‘लिव्हरेजन एज्यू’ या संस्थेचे मुख्याधिकारी अक्षय चतुर्वेदी यांच्यानुसार, कोरोना काळानंतर विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अक्षय चतुर्वेदी यांच्यानुसार, या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा दुपटीने वाढ झाली असून त्यांच्या मते, विद्यार्थ्यांच्या विदेशात जाणार्या मोठ्या संख्येमागे वाढीव शिष्यवृत्ती व आर्थिक साहाय्य या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. उच्च शैक्षणिक मार्गदर्शक संस्था असणार्या ‘कॉलेजीफाय’ या अन्य संस्थेचे मुख्य व्यवसाय प्रमुख आदर्श खंडेलवाल यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीहून अधिक वाढ झाल्याची पुष्टी केली असून, त्यांच्या मते भारतीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशी जाण्याचे वाढते प्रमाण व टक्केवारीमध्ये झालेली वाढ बहुविध स्वरुपात महत्त्वाची व उत्साहवर्धक ठरली आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच 2023 साली भारतातून अमेरिकत पुढील शिक्षणासाठी जाणार्यांच्या संख्येत अकल्पितपणे वाढ झाली आहे. ‘आयडी एज्युकेशन’ या शैक्षणिक क्षेत्रातील सल्लागार संस्थेचे दक्षिण आशिया क्षेत्र प्रमुख पीयुषकुमार यांच्या मते, गेल्यावर्षी आपल्याकडून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कोरोनापूर्व काळातील संख्येएवढी होती व ही बाब या क्षेत्रातील जाणकारांच्या मते अनपेक्षित ठरली. याशिवाय, अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठी शहरे व महानगरांव्यतिरिक्त इतर शहरे व क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे 30 टक्के होते, ही बाब यावेळी लक्षणीय ठरली आहे.
याउलट, ‘यॉकर स्टडी अॅब्रॉड कन्सलटन्सी’चे सहसंस्थापक सुमीत जैन यांच्या मते, भारतातून उच्च शिक्षणासाठी चीनमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय स्वरुपात व झपाट्याने कमी झाली असून, त्याची परिणामकारक झळ चिनी शैक्षणिक संस्था व थेट सरकारला बसली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येतील ही घसरण जागतिक स्तरावरील परिस्थितीचा परिणाम असल्याचे मानले जाते. याच्याच जोडीला अमेरिकेसह युरोप व अन्य पाश्चिमात्य देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांपासून चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण सुरू असून, त्यामुळे रिकाम्या वा उपलब्ध असणार्या अभ्यासक्रमांसाठी भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्यादृष्टीने प्राधान्याची भूमिका घेण्याकडे या पाश्चिमात्य संस्थांचा वाढता कल आहे. परिणामी, याचा फायदादेखील भारतातील विद्यार्थ्यांना होत आहे.
त्याशिवाय अमेरिकेने वर्णविद्वेषाच्या संदर्भात जे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, त्यांचा अप्रत्यक्ष फायदा भारतीयांसह आशियाई विद्यार्थ्यांना होत असून भविष्यात याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम विशेषतः अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर होणार आहेच. त्यामुळे अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणार्या वा प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निश्चितपणे वाढ होणार आहे. संख्यात्मक संदर्भात सांगायचे झाल्यास, यावर्षी मार्चअखेरपर्यंत ‘अपग्रेड’ या शैक्षणिक अॅपद्वारा दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसह युरोपातील 20 विभिन्न उच्च शिक्षण संस्थांच्या 841 अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर वा संशोधनपर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुमारे 1 लाख, 25 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज केले आहेत. कोरोनापूर्व म्हणजेच 2019-20 मधील या प्रवेशांसाठी अर्ज करणार्यांच्या तुलनेत ही संख्या सुमारे 21 टक्क्यांनी अधिक असून, हा तपशील व आकडेवारी पुरेशी बोलकी ठरते.
या अनुषंगाने विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात दोन मुद्दे प्रामुख्याने पुढे येतात. एक म्हणजे, जागतिक संदर्भात बदलती आर्थिक-व्यावसायिक स्थिती. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन डॉलरची जागतिक दादागिरी व भारतीय रुपयाची सध्याची व तत्कालीन स्थिती ही बाब समाविष्ट असते. या आर्थिक बदलांचा परिणाम भारतीय पालकांच्या खर्च-खिशावर प्रत्यक्ष व थेटपणे होत असतो. त्याच्याच जोडीला भारतीय पालकांसमोर निर्माण होणारा चिंतायुक्त प्रश्न म्हणजे, विदेशातील महागड्या उच्च शिक्षणानंतर आपल्या मुलाला अपेक्षित व समाधानकारक नोकरी मिळेल अथवा नाही. त्याशिवाय प्रत्येकच पालकाला स्वाभाविकपणे पडणारा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे, नेहमीच अमेरिकेसह युरोपीय देशांना जिहादी-वर्णद्वेषी संघर्षविद्वेषाला तोंड द्यावे लागते व त्यामध्ये जीवितहानी हा एक समान मुद्दा असतो. त्यामुळे एवढे सारे प्रयत्न करूनही आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी भारतीय पालकांना कायम असते.
असे असले, तरी भारतातून पाश्चात्य देशांमध्ये पदव्युत्तर व उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत होणारी वाढ उत्साहवर्धक ठरते. विशेषतः चिनी विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेत माघारी टाकून भारतीय विद्यार्थ्यांची वाढती संख्या भारत व भारतीय या उभयतांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. यातूनच भारतीय विद्यार्थ्यांना केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरील व्यावसायिक व व्यवस्थापन नेतृत्व कौशल्याला मोठी चालना मिळताना दिसते.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
9822847886