जागतिक परिस्थितीत भारताला परमवैभवाप्रती नेण्याची शपथ घेतलेला एक नेता वेदांत व प्राचीन संस्कृतीचे आधुनिक काळाला अनुसरून पुनरुत्थान करण्यासाठी कटिबद्ध झाला असल्याने जग आज भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे.
'व्यक्ती तितक्या प्रकृती’ या नियमानुसार प्रत्येक मनुष्याचा स्वभाव, विचार, शरीराची ठेवण, त्वचेचा रंग, जीवनशैली, वैचारिक पातळी व प्रारब्ध यात वैचित्र असते. सुकृती व विकृती, सदाचार व दुराचार, सुजाण व अजाण, सुजन व दुर्जन हे वर्णन सार्थ करणारे लोक देशोदेशी पाहावयास मिळतात. प्राचीन काळापासून भारतवर्षात वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, पुराणे व जीवनशास्त्रे-आयुर्विज्ञान (लाईफ सायन्सेस) यांच्या माध्यमातून मनुष्याला सकलसृष्टीचे कल्याण साधणार्या मानवधर्माचे (धर्माला आज सनातन धर्म, हिंदू धर्म इत्यादी नावांनी संबोधले जाते.) पालन करण्यास उद्युक्त करण्याचे प्रयत्न ऋषी-मुनी, साधू-संत यांनी केले व अजूनही होत आहेत. पूर्वी राजे-महाराजे यांना त्यांचे गुरू राजधर्म अनुसरून राज्य कारभार करण्यासाठी मार्गदर्शन करत असत. त्यामुळे स्वतः धर्माचे पालन करून इतरांना धर्मपालन करण्यास प्रवृत्त करणार्या महापुरुषांना व साध्वी स्त्रियांना राजाश्रय मिळून त्यांचे दुष्टप्रवृत्तींपासून रक्षण करून यज्ञयाग, विद्यादान करण्यासाठी संरक्षण व प्रोत्साहन दिले जात असे. अधार्मिक दुर्जनांना, राजद्रोह्यांना, विधी नियम मोडणार्या दुराचारी भ्रष्टाचारी लोकांना कठोर शिक्षा केली जात असे. ऋषी-मुनीही आपल्या आत्मसामर्थ्याने दुर्जनांना शाप देत असत. त्यांना जर उपरती झाली तर उःशापदेत असत. तसेच वरदान व आशीर्वादही देत असत.
आजच्या लोकशाही राज्यव्यवस्थेत हे काम निवडणुकीद्वारा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडलेले सरकार करते. एकदा निवडून आल्यावर हे सरकार बहुमताने राज्यकारभार करते. या वर्तमानकाळातील राज्यकर्त्यांवर राजधर्माचे पालन करण्यासाठी धर्मसंस्थांचा अंकुश नसल्याने ही सरकारे मनमानी करून, भ्रष्टाचार करून जनतेला वेठीस धरू शकतात. त्यामुळे अनाचार वाढून सामान्य जनतेला अनेक अत्याचार सहन करावे लागतात. लोकशाही प्रणालीत न्यायसंस्थेवर हवा तसा अंकुश नसल्याने न्यायदानाच्या कार्याला प्रचंड विलंब होतो. न्यायालयातील खटले वर्षोनुवर्षे व पिढ्यान्पिढया चालत असल्याने न्यायदानालाच न्याय मिळत नाही. काही नतद्रष्ट विरोधक विरोधासाठी विरोध करून राष्ट्राच्या प्रगती व विकासाला खीळ घालतात. त्यामुळे खर्च वाढून अधोगती होत जाते. हे टाळण्यासाठी राज्यकर्त्यांवर व लोकप्रतिनिधींवर धर्माचा कठोर अंकुश असणे अत्यंत गरजेचे आहे. प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेत वेदान्तसूत्रे, श्रुती, स्मृती, पुराणे व जीवनशास्त्रे यांचा मोठा प्रभाव होता व त्यामुळे समाज सन्मार्गाने आपली प्रगती व विकास करण्यास सक्षम होत असे. ज्ञानसंपादनाच्या कार्यात तर्कप्रज्ञा व अंतःप्रज्ञा या दोन्ही मनःशक्ती सारख्याच महत्त्वाच्या आहेत. प्राचीन भारतात ज्ञानसंपादनासाठी मुख्यत्वे अंतःप्रज्ञेचा महत्त्वाचा सहभाग असे. आज अंतःप्रज्ञेच्या समर्थ प्रेरक शक्तीची व व्यापक दृष्टीची जाणीव ठेवून ती जीवंत, सुदृढ, जागरूक व जरूर असेल, अशा वेळी उपलब्ध व्हावी अशा दृष्टीने आपला शिक्षणक्रम तयार केला पाहिजे. आजच्या शिक्षणक्रमात तर्कबुद्धीचा समावेश आहे, त्याचप्रमाणे अंतर्मुखी चिंतन, अन्तःप्रज्ञाया शक्तींचीही योजकपणे जोपासना व संवर्धन करावयाची गरज आहे.
आपल्या आजच्या शिक्षणक्रमात केवळ श्रवण-पठणावर भर दिला जातो. श्रवण-पठण ही फक्त माहिती मिळवण्याची साधने आहेत. त्यांनी खरे ज्ञान मिळत नाही. खरे शिक्षण केवळ माहितीच देणारे नाही, तर मन घडवणारे व प्रगल्भ करणारे असे असले पाहिजे. युरोप अमेरिकेत आता विचारवंतांच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे त्यांच्याकडे (विशेषतः अमेरिकेत) अलीकडे प्राणायाम व ध्यान या योगक्रियांचा शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, सैन्यदले, अंतराळवीर, धर्मोपदेशक, जोगिणी (नन्स) यांच्या शिक्षणक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांपासून चांगले फायदे होतात, असे आढळून आल्यामुळेच युरोप-अमेरिकेत उत्साहाने यांचा शिक्षणक्रमात समावेश केला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीसारख्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमध्ये ध्यान या विषयावर संशोधन करून पीएचडी ही अत्युच्च पदवी मिळवता येते. चरकाने अत्यंत स्पष्ट शब्दांत, भारतातील महान ऋषींचा दाखला देऊन सांगितले आहे की, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ व परमार्थ योग्य तर्हेने आचरण्याकरिता प्रथम शरीर निरोगी असले पाहिजे. त्यामुळे निरोगी जीवनासाठी आयुर्वेदही नैसर्गिक उपचारप्रणाली अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेद ही जगातील रोगोपचार प्रणालीची जननी आहे. हजारो वर्षांपूर्वी अमितबुद्धी व्यासांनी महाभारताचा उपसंहार करताना मानवाची अधार्मिकतेकडे प्रवृत्ती पाहून खेदाने उद्गार काढले, “हात उंचावून मी सांगतो आहे की, धर्मामुळे अर्थ व काम हे साध्य होतात, मग धर्माचे अनुसरण का करू नये? पण, माझे कोणीच ऐकत नाही. आजही अधार्मिक प्रवृत्ती वाढत चालली आहे व आपण हात उंचावून जगाला सांगितले पाहिजे की, भारत हे धर्माचरण करणारे एक अध्यात्मिक राष्ट्र आहे.” धर्माचरण (धर्म म्हणजे रिलिजन नव्हे) हे शांतीपूर्ण, संपन्न व यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
वेदांत, आमची धर्मशास्त्रे, श्रुती, स्मृती, पुराणे, पूजा-प्रार्थना, योगासने, ध्यानधारणा हे आमचे धर्माचरण आजपर्यंत हजारो वर्षे काळाच्या खडतर कसोटीवर पारखून, तावून सुलाखून आलेले व टिकलेले व आज नावाजलेल्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनीही अत्यंत उपयुक्त ठरवलेले विचार, सिद्धांत व कृती असलेले ज्ञानभांडार आहे. या ज्ञानभांडारावर संशोधन करून त्याची आजच्या काळातील आवश्यकता व उपयुक्तता आता त्यांनी आम्हाला दाखवून द्यावी, त्याची उपयुक्तता आजच्या काळातही कृतीत आणण्यासारखी आहे, याकडे त्यांनी आमचे लक्ष वेधावे. तेव्हा आणि तेव्हाच त्या गोष्टींचे महत्त्व आम्हा भारतीयांना कळावे व पुष्कळदा त्यांनी दाखवून दिल्यावरही आम्ही त्यांकडे दुर्लक्ष करावे, ही एक बुद्धिभेद झालेल्या भारतीयांची अत्यंत गंभीर शोकांतिका आहे. गोर्या साहेब लोकांनी आपल्याच ज्ञानभांडाराची स्तुती केली की आपण त्याची उदो उदो करतो, ही आपली गुलामीची मानसिकता आता बदलणे गरजेचे आहे. आपल्या सुदैवाने २०१४ पासून एका साधू वृत्तीच्या द्रष्ट्या नेत्याच्या अधिपत्याखाली आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक सायन्स यांची कास धरून वेदांत व प्राचीन भारतीय जीवनशास्त्रे यांचे पुनरुत्थान करून धर्मशास्त्रांवर आधारलेली शिक्षणपद्धती निर्माण करून, स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेल्या नवभारताच्या निर्मितीचे काम मोठ्या जोमात सुरू झाले आहे. आपल्या धर्म, शास्त्रे, परंपरा, आहारपद्धती यांवर युरोप, अमेरिकेत अभ्यास व संशोधन चालू आहेच, पण याचे निष्कर्ष आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी भारतीय वेदशास्त्रसंपन्न शास्त्री, आधुनिक तंत्रज्ञानाचे जाणकार व संस्कृतचे जागतिक भाषांत भाषांतर करणारे भाषांतरकार या सर्वांना एकत्र करून आपल्या धर्म, वेदांत व जीवनशास्त्रांचे पुनरुज्जीवन व पुनर्लेखन करणे व आपण भारतीय जनतेने ते प्रथम आचरणात आणणे, हे जगापुढे आदर्श निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे.
एकविसाव्या शतकात जगातील काही अविचारी, अविवेकी, स्वार्थी, कायदे नियमांची चाड न बाळगणार्या राजकारणी, देशप्रमुख, शस्त्रास्त्रांचे उत्पादक, विविध रसायनांचे उत्पादक, यंत्रसामग्रीचे कारखानदार, कृत्रिम रासायनिक औषधनिर्मिती करणार्या फार्मा कंपन्या यांनी संगनमताने अनैतिक मार्गाने नफेखोरी करून पर्यावरण, आरोग्य व भारताची विश्वकल्याणकारी धर्मसंस्कृती यांचा नाश केला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जगातील सामान्य जनता शारीरिक व मानसिक आरोग्यावर व आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने त्रस्त व संभ्रमित आहे. ज्ञानावर जगातील सर्व लोकांचा अधिकार आहे. ते देशनिरपेक्ष आहे. त्याला देशाच्या मर्यादेचे बंधन नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तर ज्ञानाला देश, काळ, भाषा, रिलिजन यांचे बंधन नाही. योगविद्येवर भारताचे स्वामित्व व अणुबॉम्बवर किंवा अणुशक्तीवर अमेरिकेचे स्वामित्व आहे, असे नाही. ज्यांना ज्यांना जगात कोठेही उपलब्ध झालेल्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असेल, त्यांनी तो करावा व ज्यांना त्यात संशोधन करून भर घालता येईल, त्यांनी ती घालावी. तरीसुद्धा ज्या देशातील ज्ञानवंतांनी जगातील अत्यंत मोलाच्या अर्थपूर्ण, मार्मिक व अंतःप्रतिभापूर्ण ज्ञानाचा शोध लावला, त्या देशातील त्यांच्या वैचारिक व सांस्कृतिक परंपरेवर वारसाहक्क असणार्यांनी पिढ्यान्पिढ्या, अनेक शतके, त्या ज्ञानाविषयी उदासीन राहावे, त्याची उपेक्षा करावी व हेटाळणीही करावी - कारण इतर विचारसरणीचे लोक करतात म्हणून- व तेच अनेक शतकांनंतर इतर देशांनी अत्यंत उत्सुकतेने घेण्याचा प्रयत्न करून त्याची मूळची शास्त्रीय बैठक शोधून काढावी व परत आम्हालाच सांगावे की, पाहा ही तुमची योगविद्या, फार उत्कृष्ट व शास्त्रशुद्ध व नित्य आचरणात आणण्याजोगी विचारसरणी आहे! या आपल्या दुर्दैवी विचारांचा आता आपण त्याग करून, आपल्या या ज्ञानभंडाराचे आधुनिकीकरण करून मूळ विचारांना धक्का न लावता पुनरुज्जीवन करणे व त्याचे जगभरात वितरण करणे, हे आपल्यावर नियतीने सोपवलेले दायित्व आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत, परित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे
या भगवान श्रीकृष्णाच्या आश्वासनानुसार व स्वामी विवेकानंदांनी मार्गदर्शित केलेल्या मार्गानुसार वेदांत, आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक विज्ञान यांची कास धरून आखलेल्या मार्गाने दि. २६ मे या शुभदिनापासून भारतात एका साधुवृत्तीच्या महापुरुषाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या उद्देशाने एका ज्ञानयज्ञाचा शुभारंभ केला आहे. मे २०१९ पर्यंत या यज्ञकुंडाभोवतीच्या परिसराची साफसफाई व यज्ञात विघ्न आणणार्या असुरांचा संहार करण्याचे काम केले गेले. मे २०२४ पर्यंत रामललाच्या आशीर्वादाने रामराज्याचा पाया रचण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले. आता जून २०२४ पासून या ज्ञानयज्ञाचा परिणाम म्हणून अनेक प्रगत व विकसनशील देशांत योगविद्या व ध्यानविद्या या भारतीय ज्ञानसंपदेचा शिक्षणक्रमात समावेश केला गेला असून, त्यांचा वापर दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यास प्रारंभ झाला आहे. युगंधर श्रीकृष्णाच्या साक्षीने व आशीर्वादाने पुढील पाच वर्षांत देव-देश-धर्माच्या ज्ञानमंदिरावर सुवर्णकलशाची विधिवत स्थापना होईल व दि. १५ ऑगस्ट २०४७ या शुभदिनी या महान ज्ञानयज्ञाची सांगता होऊन त्याची फलश्रुती म्हणून विकसित, शक्तिशाली, सुसंस्कृत, सुसंपन्न, धार्मिक व अध्यात्मिक भारताच्या नेतृत्वाखाली जगात एका नव्या संस्कृतीचा उदय होण्यास प्रारंभ झालेला असेल. विश्वगुरू भारताच्या प्रयत्नांनी जगात शांती, सुसंपन्नता व अध्यात्मिकता नांदेल, हे विधिलिखित प्रत्यक्षात येईल. या परमपवित्र यज्ञकार्यात तन-मन-धनपूर्वक सहभागी होण्याचे परमभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. त्यासाठी आपण या ज्ञानयज्ञविधींचा अभ्यास करून या पवित्र ज्ञानयज्ञात सहभागी होणे, हे सकल विश्वाच्या व आपल्या भावी पिढ्यांच्या हिताचे ठरणार आहे. विश्वकल्याणाचे हे महान शुभकार्य संपन्न करण्यासाठी संपूर्ण मानवजातीला शुभेच्छा!