सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार? 'या' दिग्गज मंडळींनी भरला अर्ज
28-May-2024
Total Views | 270
मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ३,००० हून अधिक अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षकासाठीचे बहुतांश अर्ज हे बनावट आहेत. त्यांची वर्गवारी करताना बीसीसीआयला आता अडचणी येत आहेत. यातील अनेक अर्ज बनावट नावानेही करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दि. १३ मे २०२४ पासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी ३००० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
बीसीसीआयने दि. १३ मे २०२४ रोजी सोशल मीडियाद्वारे नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. हे अर्ज गुगल फॉर्मद्वारे दिले जाणार होते. या गुगल फॉर्मद्वारे दि. २७ मे २०२४ पर्यंत अर्ज सादर करायचे होते. बीसीसीआयला दिलेल्या अर्जात वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरायची होती पण ती कोणीही भरू शकते. अशा परिस्थितीत या लिंकचा वापर करून बहुतांश बनावट अर्ज भरण्यात आले. ज्यांनी हे भरले ते माजी क्रिकेटपटू किंवा अनुभवी प्रशिक्षक नसून सामान्य इंटरनेट वापरकर्ते होते.
अनेकांनी बनावट नावाने बनावट अर्ज केले. लोकांनी हरभजन सिंग, महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या माजी क्रिकेटपटूंच्या नावाने बनावट फॉर्म भरले. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने अर्ज करण्यात आला आहे. या बनावट अर्जांच्या महापूरात बीसीसीआयला आता योग्य स्पर्धक शोधणे कठीण जात आहे. या प्रक्रियेद्वारे कोणत्याही अनुभवी दावेदाराने अर्ज केला आहे की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.
याआधी २०२२ मध्येही बीसीसीआयला ५००० अर्जांमधून योग्य अर्ज शोधावा लागला होता आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पुढील प्रशिक्षकाचा कार्यकाळ सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर सुरू होईल आणि २०२७ पर्यंत चालेल. ५० षटकांचा विश्वचषकही २०२७ मध्ये होणार आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नाव भारतीय पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.