गडचिरोली - हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर; कळपातील संख्या वाढता वाढता वाढे

    18-Apr-2024   
Total Views |
gadchiroli elephant


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर पडली आहे (gadchiroli elephant). बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी या कळपातील माद्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला आहे (gadchiroli elephant). त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या २६ झाली आहे. (gadchiroli elephant)
 
२०२१ साली छत्तीसगढ येथून २३ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. तेव्हापासून हा कळप गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वावरत आहे. मध्यंतरीच्या काळात या कळपातील एका मादीचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर एक टस्कर हा कळपापासून स्वतंत्र झाला. सद्यपरिस्थितीत हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये वावरत असून गेल्या आठवड्यात या कळपात पिल्लाचा जन्म झाला होता. त्यानंतर बुधवारी रात्री या कळपामध्ये अजून दोन पिल्लांचा जन्म झाल्याची माहिती 'स्टाईप्स अॅण्ड ग्रीन अर्थ फाऊंडेशन'चे (एसएजीई) प्रमुख सागनीक सेनगुप्ता यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'एसएजीई' ही संस्था वन विभागाच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात हत्ती व्यवस्थापनाचे काम करत आहे. २०२१ पासून या कळपात ५ पिल्लांचा जन्म झाला असून बुधवारी रात्री जन्मास आलेली पिल्ले आम्ही ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने टिपल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले.
 
 
गडचिरोलीमधील हत्ती सध्या धानाच्या म्हणजेच भाताच्या शेतीचे नुकसान करत आहेत. जंगलातील बांबू आणि मोहाच्या झाडांवर ताव मारत आहेत. छत्तीसगढ म्हणून आलेला हा हत्तींचा कळप आता गडचिरोलीमध्ये स्थायिक झाला असून तो पुन्हा याठिकाणाहून स्थलांतर करण्याची शक्यता धूसर असल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले. याला त्या त्या राज्यातील अनेक कारणे कारणीभूत आहेत. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती अधिवास क्षेत्रात खाणकाम सुरू झाले आहे. तर ओडिशा राज्याने पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढला जोडणाऱ्या हत्ती भ्रमणमार्गामध्ये कालवे बांधले आहेत. गडचिरोलीमधून हत्तीच्या कळपाचे स्थलांतर होण्याऐवजी भविष्यात छत्तीसगढमधील ३५ हत्तींचा कळप महाराष्ट्रात येण्याची शक्यता सेनगुप्ता यांनी वर्तवली आहे.
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.