शेपूट वाकडी ती वाकडीचं!

    05-Mar-2024   
Total Views |
Shahbaz Sharif

रविवार, दि. ३ मार्च रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची दुसर्‍यांदा निवड करण्यात आली. पंतप्रधानपद मिळताच, शरीफ यांनी संसदेत एक लांबलचक भाषण दिले. या भाषणात त्यांनी स्वत:चा उल्लेख ‘विरोधीपक्ष नेता’ असा करून स्वत:चाच हशा करून घेतला. त्यांचे हे शब्द अनावधानाने निघाले असले, तरी सत्य हेच. पाकिस्तानच्या जनतेने शाहबाज आणि त्यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांना विरोधी पक्षामध्ये बसण्याचाच कौल दिला. पण, पाकिस्तानी सैन्याच्या कृपेने त्यांना सत्ता मिळाली आणि शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधानपदी विराजमान होताच, त्यांनी काश्मीरची पॅलेस्टाईनसोबत तुलनाही करून टाकली. त्याचबरोबर काश्मीर आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी संसदेत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा केली.

‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीचं’ अशी मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण पाकिस्तानच्या बाबतीत एकदम चपखलपणे बसते. शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्यासाठी, ज्या निवडणुकांचे नाटक पाकिस्तानमध्ये रचण्यात आले, त्यासाठीसुद्धा पाकिस्तानला दुसर्‍या देशांकडून कर्ज घ्यावे लागले, अशी कबुली खुद्द शाहबाज यांनी दिली. पाकिस्तान सध्या ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या मदतीवर आपले दिवस काढत आहे, तरीही काश्मीरला तथाकथित स्वातंत्र्य मिळवून द्यायची भाषा शाहबाज करीत आहेत. काश्मीरवर शाहबाज बोलत असले, तरी शब्द मात्र पाकिस्तानी सैन्याचे!पाकिस्तानमध्ये महागाईने नवा उच्चांक गाठला. दुसरीकडे, इमरान खान यांना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, पाकिस्तानी सैन्याची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत आहे.

सैन्याच्या थेट राजकीय सहभागामुळे पाकिस्तानमधील तरुणांमध्ये रोष वाढत आहे. त्यातच बलुचिस्तानची स्वातंत्र्य चळवळ शस्त्रांच्या जोरावर संपवण्यात, पाकिस्तानी सैन्याला अपयश आले आहे. इराण आणि अफगाणिस्तानसोबत सीमेवर अशांतता आहे. या सर्व मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, शाहबाज पुन्हा एकदा काश्मीर राग आळवताना दिसले.शाहबाज काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना, पाकव्याप्त काश्मीरला विसरून जातात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात रालोआ सरकारने ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर, काश्मीरमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांना साधे गव्हाचे पीठ उपलब्ध नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनेसुद्धा पाकव्याप्त काश्मीर आणि खैबरपख्तुनख्वा भागात झाली. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काश्मीरच्या विकासासाठी १४.१६ अब्ज डॉलर दिले. दुसरीकडे, पाकिस्तान ‘आयएमएफ’कडे तीन अब्ज डॉलरची भीक मागत आहे.
 
भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये २ हजार, ८१२ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून काश्मिरी जनतेचा सरकारच्या मदतीने मोफत उपचार होतो. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये फक्त २३ रुग्णालये आहेत. भारताच्या काश्मीरमधील सर्व घरांना २४ तास, सात दिवस कायमस्वरुपी वीज मिळते. दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण होणारी वीज पाकिस्तानच्या इतर प्रातांना पाठवून, स्वत: पाकव्याप्त काश्मीर मात्र अंधारात. या सर्व घटनांमुळे पाकव्याप्त काश्मिरी जनतेमध्ये असंतोष उसळत आहे. या असंतोषाचाच परिणाम म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर रॅली आयोजित केल्या जात आहेत. या रॅलीद्वारे भारतात सामील होण्याची मागणी केली जात आहे.

पाकिस्तानी सैन्य आणि नेते पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या असंतोषाकडे दुर्लक्ष करून, भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जगभरातील देश काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. पाकिस्तानचे तरूण पाकिस्तानमध्ये आपले अंधकारमय भविष्य पाहून, देश सोडण्याच्या तयारीत आहेत. याकडे लक्ष न देता, शाहबाज काश्मीर राग आवळत आहेत. याचे कारण आहे, त्यांना आपल्या मालकांना म्हणजेच पाकिस्तानी सैन्याला खूश करायचे आहे आणि ते करतच राहतील. भारतासाठी त्यांचे वक्तव्य म्हणजे ’हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार’ या हिंदी म्हणी प्रमाणेच आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.