जय भीम, लाल सलाम : जेएनयु आणि सत्य

    30-Mar-2024   
Total Views |
JNU United Left Pannel Won Election


‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन’ निवडणुकीमध्ये ’युनायटेड लेफ्ट’ पॅनल विजयी झाले. मग काय, रा. स्व. संघाच्या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीमुळे सदैव पराजित आणि भयभीत असलेल्या कम्युनिस्ट आणि त्यांच्या समविचारी संघटनांच्या लोकांनी जेएनयुमध्ये ’जय भीम’, ’लाल सलाम’ घोषणा दिल्या. ’जय भीम’ आणि ’लाल सलाम’ यांचा संबंध काय? या निवडणुकीत जिंकलेल्यांचे सत्य काय? त्यांच्या समर्थकांचे मनसुबे कोणते? याचा मागोवा घेणारा हा लेख...

‘जय भीम’, ’लाल सलाम’ अशा घोषणा जेएनयुमध्ये नुकत्याच कानावर पडल्या. कारण, जेएनयुत ‘स्टुडंट युनियन’ निवडणुकीमध्ये ’युनायटेड लेफ्ट’ पॅनल विजयी झाले. या पॅनलमध्ये कम्युनिस्टांशी बांधिल असलेल्या ’ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’, ’डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन’, ’स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि ’ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ या संघटना एकत्रित होत्या. कम्युनिस्ट जेएनयुमध्ये जिंकले. तेव्हा सर्व या लेफ्ट पॅनलच्या विद्यार्थ्यांनी घेाषणा दिल्या की, ’जय भीम’, ’लाल सलाम.’ ’जय भीम’सोबत ’लाल सलाम’च्या घोषणा ऐकून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कम्युनिस्टांसंदर्भातले विचार आठवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ”मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही कम्युनिस्टांपासून सावध राहा. आपल्या ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन’चा उपयोग कम्युनिस्टांना त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी करून देऊ नका. कम्युनिस्ट आता आपल्या संघटनेमध्ये घुसून, त्यांची काम करत आहेत. काही वर्षांपासून मी पाहतो आहे की, कम्युनिस्ट कामगारांचे नुकसान करत आहेत. मला पूर्ण खात्री पटली आहे की, कम्युनिस्ट कामगारांचे शत्रू आहेत. हिंदुस्थानाच्या कम्युनिस्टांकडे कोणतीच नीती नाही. माझा पक्ष कधीच कम्युनिस्टांसोबत जाणार नाही. कारण, माझा कम्युनिझमवर विश्वास नाही.” तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्स आणि बुद्धाच्या विचारसरणीबद्दलही स्पष्ट मत मांडले होते. त्यांनी बुद्धांनी दिलेल्या मानवतावादी विचारांचे महत्त्व विशद केले.

त्याचवेळी ते म्हणाले होते की, ”जो जीवनमार्ग अल्पजीवी आहे, भरकटवणारा आहे, अराजकतेकडे नेणारा आहे, त्याचे समर्थन करणार नाही.” याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वार्थाने मार्क्स विचारसरणीचे समर्थक नव्हतेच. उलट मार्क्सच्या विचारांपासून आणि त्याच्या समर्थकापासून समाजाने सावध राहावे, असे त्यांना वाटे. साधारण १९५०च्या आसपास डॉ. बाबासाहेबांनी कम्युनिस्टांबाबत जी भीती व्यक्त केली होती, ती भीती जेएनयुमध्ये खरी ठरली आहे का? कारण, ’लाल सलाम’ आणि कम्युनिस्टी विचार समाजात रूजत नाही, म्हटल्यावर डाव्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणार्‍या संघटना आणि व्यक्तींना हाताशी घेतले, असे चित्र दिसते. या व्यक्ती, या संघटनांच्या आड कम्युनिस्ट ‘लाल सलाम’चा अजेंडा पुढे करतात. खरे तर बाबासाहेबांनी कधीच कुणाला ‘सलाम’ केला नाही आणि हे लोक बाबांच्या नावापुढे ’लाल सलाम’ करतात. खरे तर ‘लाल सलाम’सोबत बाबासाहेबांचे नाव घेतात, ते खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे शत्रू आहेत.

असो. जेएनयुत ‘स्टुडंट युनियन’च्या निवडणुकीमध्ये ’युनायटेड लेफ्ट पॅनल’तर्फे ऑल ’इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ माध्यमातून अध्यक्ष म्हणून धनंजय जिंकून आला. धनंजय जिंकल्यावर सर्वच क्षेत्रांतील कम्युनिस्टांनी मुलाखती-बातम्या प्रसिद्ध करण्याचा धडाका सुरू केला की, कम्युनिस्टांमुळे जेएनयुमध्ये तब्बल २८ वर्षांनी दलित विद्यार्थी अध्यक्ष झाला. धनंजय दलित आहे, याचेच भांडवल तमाम डाव्यांनी केलेे. पण, डाव्यांनी दलित म्हणून ज्या धनंजयची प्रसिद्धी केली, त्या धनंजय याने जिंकून येताच काय म्हणावे? तर शिष्यवृत्ती, महिला सुरक्षा कॅम्पस वगैरे वगैरे तोंडी लावण्यापुरते म्हटले. ते त्याला म्हणणे भागच होते म्हणा. पण, त्याने त्याच्या ’युनायटेड लेफ्ट पॅनल’चे निर्धार सांगितला. तो म्हणाला की, ”या देशात मुस्लीम असणे, हा गुन्हा आहे.
 
आम्ही शरजील उस्मान आणि उमर खालिदसाठी लढू.” काय म्हणावे? डाव्यांनी ज्याला दलित म्हणून प्रसार केला, त्या धनंजयला जिंकून येताच आठवण झाली, ती भारताचा ’चिकन नेक’ म्हणजे ‘सिलिगुडी कॉरिडोर’ची, उर्वरित भारतापासून वेगळा करण्याची देशद्रोही इच्छा असणारा शरजिल इमाम आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार!’ अशी विकृत मानसिकता असणार्‍या उमर खालिदची? तसेच धनंजयला ’मुस्लीम खतरे मे हैं’ वगैरेही वाटते. आपण जिंकलोय, तर आपल्या समाजातील खरोखर शोषित, वंचित आणि संधीपासून दूर असलेल्या आपल्या बांधवांसाठी काही करावे, असे धनंजय याला वाटले नाही? त्याला चिंता शरजील आणि उस्मानची? आणखीन एक त्याला आणि त्याच्या कम्युनिस्ट सोबत्यांना रोहित वेमुलाचीही सारखी आठवण येते. पण, मुंबई आयआयटीमध्ये आत्महत्या केलेल्या दर्शिलची आठवण येत नाही. का? तोही तर विद्यार्थी होता. तोही मागासवर्गीय समाजाचा होता. पण, त्याच्या आत्महत्येबद्दल यांना काही सोयरसुतक नाही. कारण, स्पष्ट आहे की, दर्शिलच्या आत्महत्येमध्ये आरोपी असलेला व्यक्ती गैरहिंदू आहे.

या ’युनायटेड लेफ्ट पॅनल’ला समर्थन करणारे कोण, याचा मागोवाही घेऊया. ‘युनायटेड लेफ्ट पॅनल’मध्ये ’ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ सामील आहे. या असोसिएशनला शुभेच्छा देणारे कोण, तर प्रा. नलिनी सुंदर. नलिनी सुंदर हिच्या नावाशी बस्तरची ती घटना जोडली गेली आहे. बस्तरच्या गावात शामनाथ बघेल याने गावातल्या लोकांना नक्षल्यांविरोधात एकत्र करत, ’तांगिया सेना’ बनवली होती. तेव्हा बस्तरमधील त्या गावामध्ये अभ्यास करण्यासाठी म्हणे नलिनी आणि इतर काही लोक गेले होते. त्यानंतर नक्षल्यांनी शामनाथ बघेलची हत्या केली. बघेलची पत्नी विमला हिने पोलिसांना सांगितले की, काही लोक त्यामध्ये एक महिलाही आली होती, तिने शामनाथला सांगितले की, ”नक्षल्यांच्या विरोधातले काम थांबव.” त्यानंतरच त्याची हत्या झाली. त्यावेळी संशयित आरोपी म्हणून नलिनी सुंदर हिचे नाव आले होते. मात्र, पुराव्या अभावी नलिनी सुटली.

त्यानंतर २०१७ साली पोडीयम पंडू या हिंस्र नक्षल्याने शरणागती पत्करली आणि त्याने सांगितले की, “तो हिंस्र माओवादी आणि शहरी नक्षलवादी लोकांचा मध्यस्त म्हणून काम करायचा.” त्यावेळी त्याने प्रा. नलिनी सुंदर आणि बेला भाटिया यांचे नाव घेतले. इतकेच काय? ’बस्तर ः द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात ज्या ‘सलवा जुडूम’बद्दल आपण पाहिले, ती ‘सलवा जुडूम’ पद्धती बंद करावी, गावातल्या आदिवासींना नक्षल्यांविरोधात हत्यार देऊ नये, यासाठी न्यायालयात २००७ साली याचिका टाकणारीही प्रा. नलिनी सुंदरच. त्या याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने नक्षलीविरोधातली ‘सलवा जुडूम’ अभियान बंद करण्याचे आदेश दिले, तर अशा नलिनी सुंदर! ’लेफ्ट पॅनल’चे हे असे समर्थक फक्त हिमनगाचे टोक आहेत. हे तर केवळ ट्रेलर आहे, चित्रपट तर शब्दातीत असेच म्हणावे लागेल.

विषयांतर झाले; पण सांगायला हवे होते, तर या निवडणुकीमध्ये ’लेफ्ट पॅनल’च्या विरोधात असलेल्या अभाविपचा अध्यक्षपदाचा उमेदवार होता-उमेश चंद्र अजमीरा. खर्‍या अर्थाने शोषित आणि पीडितही. प्रचंड नकारात्मक परिस्थितीतून तो तगला आणि जगलाही. तो चार वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या पित्याची हत्या नक्षल्यांनी केली होती. त्यानंतर उमेशच्या आईवर धर्मांतरण करण्यासाठी, जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे तीसुद्धा देवाघरी गेली. उमेश ही निवडणूक जिंकू शकला नाही. पण, ही निवडणूक म्हणजे काही देशाच्या अंतिम कल्याणाची निवडणूक नव्हती. मात्र, या पार्श्वभूमीवर हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे की, जेएनयुच्या या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात काय घोषणा देण्यात आल्या, तर ’मिले फुले-कांशीराम, हवा में उड़ गए जय श्री राम’ , ‘ब्राह्मणवाद से आज़ादी’ आणि ‘फ्री फिलिस्तीन’अशा घोषणा देण्यात आल्या. असा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होता. काय म्हणावे? जेएनयुमध्ये अभाविपच्या विरोधात असणार्‍या त्या विद्यार्थ्यांना पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीतल्या मुस्लिमांची (ज्यामध्ये काही दहशतवादीही असतील) चिंता आहे.

मात्र, देशातल्याच हिंदू ब्राह्मण आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान भगवान श्रीरामांचा द्वेष आहे. जेएनयुच्या या निवडणुकीमुळे भाजपविरोधी पक्षांनी मत मांडली. बिहारचे लालू कुटुंब म्हणा, उत्तर प्रदेशचे अखिलेश म्हणा आणि देशभरातले त्यांना साथसंगत करणारे राजकीय नेते म्हणा, सगळ्यांनाच अभाविप विजयी झाली नाही, याचा आनंद झाला. लोकसभा निवडणुकीतही असेच होईल आणि मोदी, भाजप न जिंकता विरोधी पक्ष जिंकेल असेही त्यांनी म्हटले. हे सगळे विरोधी पक्ष अभाविपचा संबंध रा. स्व. संघ आणि रा. स्व. संघाचा संबंध भाजपशी जोडतात. रा. स्व. संघ विचारसरणी ही राष्ट्रनिष्ठ आहे. देशाला समाजाला जोडणारी आहे. पण, राष्ट्रापेक्षाही मार्क्सला बांधिल असलेले डावे रा. स्व. संघाला विरोधच करतात. या निवडणुकीतले एक तथ्यही महत्त्वाचे आहे. ते म्हणजे, जेएनयुच्या निवडणुकीमध्ये अभाविपला विजय मिळवता आला नाही.पण, यंदाच्या निवडणुकीत भरघोस मतदान झाले. कम्युनिस्टांच्या समोर अभाविपने चांगली लढत दिली. विजय जरी मिळाला नसला, तरी भविष्यातील विजयाकडे अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठ युवापिढीची घोडदौड सुरू झाली, हे नक्कीच. तसेच ’जय भीम’ म्हणत ‘लाल सलाम’चे कारस्थान कसे आणि कोण रचते, त्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोण करते, हेसुद्धा देशासमोर पुनश्च आले!

९५९४९६९६३८


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.