ब्रिटनचा इस्लामोफोबिया!

    15-Mar-2024   
Total Views |
Britain's Islamophobia


ब्रिटनच्या कट्टरताविरोधी आयोगाने नुकताच ‘ईशनिंदा विरोधातली सक्रियता आणि प्रतिक्रिया’ या विषयावर एक स्वतंत्र अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये असे पुराव्यासकट संदर्भित केेले की, ब्रिटनमध्ये पाकिस्तानमधला ‘तहरीक ए-लब्बैक’ हा दहशतवादी गट सक्रिय आहे. हा गट आणि इतर कट्टरपंथी दहशतवादी संघटना, मुस्लीम देशातील ईशनिंदा कायदा ब्रिटनमध्येही कार्यान्वित व्हावा, यासाठी काम करतात. ब्रिटनच्या कायद्याने हे सध्या तरी साध्य होणार नाही, याची त्यांनाही तशी पूर्वकल्पना. त्यामुळे ‘वेट आणि वॉच’ची भूमिका घेत सध्या तरी या संघटना ब्रिटनमधील मुस्लिमांना ईशनिंदेविरोधात हिंसा करायला उद्युक्त करतात. ईशनिंदेबाबत लंडनमध्ये काय वास्तव आहे?

२०२१ साली एका शिक्षिकेने शाळेत मोहम्मद पैगंबरांचे चित्र दाखवले म्हणून तिच्याविरोधात लाखोंचा मोर्चा निघाला. २०२२ साली ‘लेडी ऑफ हेवन’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले. वेकफील्ड येथे कुराणचा अपमान केला म्हणून एका विद्यार्थिनीविरोधातही आंदोलन झाले. या आंदोलनात हिंसा झाली नाही. मात्र, या घटनांतील आंदोलकांचे म्हणणे होते की, पाकिस्तानमध्ये जी ईशनिंदेची सजा आहे, तशीच सजा ईशनिंदा करणार्‍यांना मिळावी.असो. ब्रिटनमध्येच नव्हे, तर युरोप खंडात सध्या कट्टरपंथीयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ब्रिटनचे नागरिक म्हणतात की, ”त्यांना ‘लंडनीस्तान’ किंवा ‘ब्रिटनीस्थान’ नको आहे.” ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही म्हटले होते की, ”कट्टरपंथी संघटना ब्रिटनचे वातावरण बिघडवत आहेत.” मात्र, यावर लंडनचे महापौर सादिक खान यांचे म्हणणे की, ”मुस्लीम शांततामय जीवन जगतात. तरीसुद्धा त्यांना का स्वीकारले जात नाही? जगभरात आणि ब्रिटनमध्येही इस्लामोफोबिया का आहे?”तर सादिक खान यांच्याबाबत ब्रिटनच्या सुएला ब्रेवरमैन, ली एंडरसन, लिज ट्रस यांचे म्हणणे आहे की, ”सादिक खान यांना इस्लामवादी कंट्रोल करत आहेत.” यावर सादिक यांचे म्हणणे की, ”ते मुस्लीम आहेत आणि पाकिस्तानी वंशाचे आहेत म्हणून त्यांच्याशी दुजाभाव केला जातो. ”सादिक खान म्हणतात, त्याप्रमाणे खरेच का हा ब्रिटनचा काल्पनिक इस्लामोफोबिया आहे?

या अनुषंगाने ब्रिटनमधील दोन घटना पाहू ”अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर हल्ला करणार्‍यांना जन्नत मिळाली. आम्ही पण एक दिवस ब्रिटनच्या शाही घराण्याच्या पॅलेसला मशीद बनवू.” ब्रिटनमधील कट्टरपंथी दहशतवादी संघटना ‘अल मुहाजिरौन’चा प्रमुख आणि ब्रिटनमधल्या मुस्लिमांचा लाडका मौलवी अंजेम चौधरी याचे म्हणणे. ब्रिटनमधील मुस्लिमांची एक पिढी या अंजेमने कट्टरपंथी बनवली, असे ब्रिटनच्या समाजअभ्यासकांचे म्हणणे. दहशतवादी कृत्याबद्दल अंजेमला २०१६ साली पाच वर्षार्ंची शिक्षाही झाली होती. चांगले वागल्यावर शिक्षा कमी केली जाते, याचा फायदा घेत अंजेमने तुरुंगात अतिशय चांगली वर्तणूक दाखवली. पाच वर्षांची शिक्षा अडीज वर्षांवर येऊन तो तुरुंगातून सुटला. काही काळ स्वस्थ बसला. मात्र, ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वशांचे हिंदू ऋषी सुनक झाल्यावर त्याचा तीळपापड झाला. काफिर पंतप्रधान होणे, हे त्याच्या मनाला पटले नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये हिंदूंच्या विरोधात मुस्लिमांना चिथावण्याचे, भडकावण्याचे काम त्याने सुरू केले.

दुसरी घटना-सप्टेंबर २०२३ मध्ये ब्रिटनच्या लेस्टर शहरातली घटना. आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानचा पराभव झाला म्हणून ब्रिटनच्या मोहम्मद हिजाब या मौलवीन मुखवटा घालून ब्रिटनच्या मुस्लिमांना भडकावले. मोठ्या प्रमाणात जमलेल्या त्याच्या कौमच्या लोकांना तो सांगत होता- ”मी हिंदू म्हणून जन्मण्यापेक्षा कीडा म्हणून जन्मणे पसंत करेन. पण, आता या हिंदूंना जोर आलाय. रस्त्यावर यायला लागलेत. आपण त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरू देऊ का?” यावर त्या समुदायाने चेकाळत उत्तर दिले ”नाही नाही कधीच नाही.” मग हिंदूंना धडा शिकवण्यासाठी या समुदायाने दुर्गामातेच्या मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ पाहून हिंदूंनी घटनेचा निषेध करत शांततापूर्ण रॅली काढली. मात्र, जसे जगभरता होते तसेच झाले. या रॅलीवर घराच्या खिडकीतून, गॅलरीतून, छपरावरून दगड मारण्यात आले, पेटते बोळे फेकण्यात आले. या घटना म्हणजे हिमनगाचे टोक आहेत. मात्र, या घटनांवरूनही आपण समजू शकतो की, ब्रिटनचा इस्लामोफोबिया किती खरा किती खोटा!



-योगिता साळवी

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.