नुकतेच दिवंगत झालेले ख्यातनाम उद्घोषक अमीन सायानी १९९८ साली मुंबईतील गावदेवी नगराच्या गुरुदक्षिणा समर्पण उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.रा. स्व. संघाच्या उत्सवांत बौद्धिक वर्गात किंवा अन्य कार्यक्रमांतही समाजातील प्रतिष्ठित, ख्यातनाम अशा व्यक्तींना बोलवण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. यात त्या व्यक्तींना संघाची कार्यपद्धती, शिस्त कार्यकर्त्यांचा परस्पर व्यवहार पाहायला मिळावा, असा हेतू असतो. अशा अनुभवांतून त्या व्यक्तींच्या मनात संघाबद्दल एक अनुकूल भावना निर्माण होते, काही पूर्वग्रह गैरसमज असतील,तर ते दूर होतात, असा आजपर्यंतचा अनुभव.
रा. स्व. संघाच्या रचनेनुसार, १९९८ साली मुंबई महानगरात गिरगाव भागात गावदेवी हे एक नगर होते. (आता ही रचना बदलली आहे.) १९९२-९३ साली अयोध्या आंदोलन, मग बॉम्बस्फोट, दंगली या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ प्रेरणेतून ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन केले जात आहे. गावदेवी नगराचे तत्कालीन कार्यवाह शशांक मंडलीक (आता कै.) हे मोठे कल्पक होते. गावदेवी नगर परिसरातल्या अनेक ख्यातनाम व्यक्तींना त्यांनी योजनापूर्वक महाआरतीसाठी आमंत्रित केले होते.
अमीन सायानी त्यावेळी केम्प्स कॉर्नरजवळ राहत असत. शशांक मंडलीक यांच्या प्रयत्नांतून ते प्रथम महाआरतीत सामील झाले होते.
नंतरही हा संपर्क सुरू राहिला. मग १९९८ साली गावदेवी नगराच्या गुुरुदक्षिणा समर्पण उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलावण्याचे ठरले. त्यांना स्पष्टपणे कल्पना देण्यात आली की, तुमच्या आवाजासाठी लोक तासन्तास तुमचे निवेदन ऐकत राहतात. इथे तसा प्रकार नाही. आमचे प्रमुख वक्ते वेगळे आहेत ते साधारण ४० ते ४५ मिनिटे बोलतील. त्यानंतर फक्त पाच ते सात मिनिटे तुम्ही प्रमुख पाहुणे तुमचे विचार मांडायचे आहेत. तुम्हाला जे वाटेल ते नि:शंकपणे बोला.अमीनभाईंनी हे आमंत्रण स्वीकारले. ते वेळेवर उपस्थित राहिले. प्रमुख वक्ते रमेश पतंगे यांचे मराठीतले वक्तव्य त्यांनी व्यवस्थित ऐकले, ग्रहण केले. मग तेच सूत्र पुढे ओढून घेत त्यांनी आपले भाषण खरोखरच पाच मिनिटांत आटोपले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मी त्यांचे नाव, ‘अमीन सयानी’ असे उच्चारले होते. त्याबाबत मात्र, त्यांनी मुद्दाम खुलासा करीत सांगितले की, “माझे नाव सयानी नव्हे तर, सायानी आहे.आम्ही गुजराथी खोजा मुसलमान आहोत. माझा जन्म मुंबईचा आणि संपूर्ण करिअर मुंबईतच. त्यामुळे मला मराठी चांगली समजते. थोडीशी बोलताही येते.”इतर अनेक चांगल्या मुसलमान धर्मीयांबद्दल जो अनुभव बरेचदा येतो, तोच नंतरच्या काळात अमीन सायांनीबद्दलही आला. कुठून त्यांच्यावर दबाव आला की काय झाले न कळे. पण संघापासून दूर गेले.
मल्हार कृष्ण गोखले