मधु‘विलासा’ची निसर्गगोडी...

    27-Feb-2024
Total Views |
Vilas darade
 
शास्त्रीय पद्धतीने मधसंकलन व विक्री करत ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळवणार्‍या वनवासी पाड्यावरील विलास दरोडे यांची ही यशोगाथा...

नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यातील हनुमंतपाडा हा वनवासी भाग. येथील विलास दरोडे यांची तीन एकरवर पसरलेली जिरायती शेती. नागली, भात, उडीद आदी पिके ते घेतात. वडिलांची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची असल्याने, विलास यांनी संघर्षातून २०१४ साली ‘राज्यशास्त्र’ विषयात पदवी घेतली. २०१५ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी विलास यांच्यावर आली. नोकरीच्या शोधात त्यांनी सैन्य, पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. कमी शेती व शासकीय नोकरीच्या संधी न मिळाल्याने, त्यांनी वन विभागात वनमजूर म्हणून रोजंदारीवर अनेक वर्षं काम केले. यात उत्पन्न अत्यल्प असल्याने पूरक व्यवसायाची संधी ते शोधत होते. २०१८ मध्ये त्यांना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या ठिकाणी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘मधुमक्षिका पालन व मध संकलन’ या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाची संधी मिळाली. ही संधी त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी देणारी ठरली.

प्रशिक्षणानंतर मधुमक्षिकापालनाचा शास्त्रीय दृष्टिकोन विलास यांच्यापाशी निर्माण झाला. पूर्वी त्यांच्या भागात जाळपोळ करून मध काढले जात असे. त्यामुळे मधमाश्यांची मोठ्या प्रमाणात हत्या होत असे व मधही वाया जात असे. पण, प्रशिक्षणामुळे अनेक नवनवीन गोष्टी त्यांना समजल्या. त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मध काढण्यास सुरुवात करत इतर समाज बांधवांमध्येही जनजागृतीचे काम केले. तसेच पोळ्यातील फक्त मधाचा भाग काढून घेत पोळ्याला कोणीतीही इजा न पोहोचवता काम करण्याला त्यांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे, फक्त २० दिवसांत मधमाश्या पुन्हा तेवढंच मध जमवत असल्याचे पाहून ते खूप सुखावले गेल्याची भावना व्यक्त करतात. याने त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की बसली की, काहीही झाले तरी पोळ्यामधील फक्त मधाचा भाग काढायचा व हे करताना एकही मधमाशीचा जीव जाता कामा नये, अशी खुणगाठ बांधली.

खादी व ग्रामोद्योग विभागाकडून मधमाशांचे पोळे काढणे व मधसंकलन या बाबींसाठी संरक्षक पोशाख व साहित्याचे ७० हजारांचे कीट त्यांना मिळाले. विलास मग नाशिक जिल्ह्यासह ठाणे, पालघर, जळगाव व धुळे जिल्ह्यातील वन्यभागात मधसंकलन करू लागले. पहिल्याच वर्षी त्यांचे ५०० किलोवर मधसंकलन झाले. कौशल्याला अनुभवाची जोड व खादी-ग्रामोद्योग विभागाचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.पेठ तालुक्यात झाडे-झुडपे, डोंगर कड्याकपार्‍यांमध्ये आग्या, सातेरी व फुलोरी या जातींच्या मधमाशांच्या वसाहती आढळतात. हीच बाजू ओळखून विलास तिन्ही जातीपासून मे ते जुलै, सप्टेंबर ते नोव्हेंबर व फेब्रुवारी ते मार्च अशा तीन टप्प्यात मधसंकलन करतात. विलास यांनी पोळ्यांतून केवळ मधच न काढता मेणही काढले. पोळ्यातील मेणावर आवश्यक प्रक्रिया करून वड्यांच्या स्वरुपात त्याची विक्री केली. वनवासी लोकांच्या पावरी, तारपा आदी वाद्यनिर्मितीसाठी मेणाची आवश्यकता असल्याने त्यास मागणी ही अधिक असल्याचे ते सांगतात. तसेच काही वनवासी भांड्यांनाही मेण लावतात. याकामी त्यांची आई सुमित्राबाई, भाऊ दत्तू व गिरिधर यांची शेतीत समर्थ साथ. तसेच पत्नी मंगला किराणा दुकान चालवित असून त्या ठिकाणीही मधाची विक्री ते करतात.

क्षमताविकास, ज्ञान, अनुभव, कौशल्य, सातत्य या जोरावर विलास आज खादी-ग्रामोद्योगच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. २०० हून अधिक तरुणांना त्यांनी मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यातूनही त्यांना थोड्याफार प्रमाणात मानधन मिळते. शेतीत परागीभवन प्रक्रिया महत्त्वाची असते. त्याचे महत्त्व व सातेरी मधमाशीच्या वसाहती शेतात ठेवण्यासाठी विलास मार्गदर्शन करतात.शहरी भागात इमारती, कार्यालये या ठिकाणी आग्या मधमाशांची पोळी दिसून येतात. मधमाशांना कोणतीही इजा न पोहोचवता शास्त्रीय पद्धतीने अशी पोळी काढून सर्व मधमाशा जाळीत भरून त्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत ते त्यांचा मागोवा घेत असतात. आजवर तब्बल २२२ मधमाशांच्या वसाहती त्यांनी यशस्वीरित्या स्थलांतरित केल्या आहेत.

“जगात मधमाशी अस्तित्वात आहे म्हणून मानव जात टिकून आहे. मधमाशी संपुष्टात आली, तर मानव जात ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मधमाशीसह शेतीला आवश्यक असणार्‍या अनेक कीटकांचे संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे. आज शेतीतील पिकांवर होणार्‍या रासायनिक फवारणीमुळे मधमाश्यांवर फार गंभीर परिणाम होत असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याची स्थिती आहे. तसेच, मधमाश्यांमधील आक्रमकतादेखील वाढल्याचा अभ्यास आहे. शेतकर्‍यांनी आता पारंपरिक शेतीकडे वळले पाहिजे. कमीतकमी अपमार्जके वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायातून आर्थिक प्रगतीसह प्रतिष्ठा मिळाली. कोणत्याही बँकेकडून कर्ज, शासकीय अनुदानाची गरज भासली नाही. केवळ कष्टाची तयारी पाहिजे,” असे ते आवर्जून सांगतात. विलास दरोडे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.


-गौरव परदेशी


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121