‘२१ पॅरा एस एफ बटालियन’ची शौर्यगाथा

    17-Feb-2024   
Total Views |
21 Para SF Battalion


दि. १४ जानेवारीला ‘आर्मी डे’ हा वेस्टर्न कमांडमध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना आणि युनिट्सना ‘शौर्य पुरस्कार’ आणि ‘युनिट साईटेशन’ने गौरवण्यात येते. ‘युनिट साईटेशन’ हे युनिटला गेल्या काही वर्षांतील केलेल्या, अत्यंत पराक्रमी दहशतविरोधी कारवाई करता दिले जाते. या वर्षीचे ‘जिओसी इन सी ईस्टर्न कमांड’चे ‘युनिट साईटेशन’ हे ‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ या बटालियनला प्रदान करण्यात आले. आजचा हा लेख हा या फॉर्सेस यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी, जो अत्यंत धोकादायक होता आणि ज्याला माध्यमांमध्ये फारशी प्रसिद्धीही मिळाली नाही.

‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’चे अनेक सैनिक हे मराठा असून ते ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा भाग आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपले टोपण नाव ‘वाघनख’ असे ठेवले आहे. आपल्याला आठवत असेल की, वाघनखांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.

‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या दहशतवादी तळावर हल्ला


‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ने म्यानमारमधील ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या मणिपूर खोर्‍यातील दहशतवादी गटाच्या तळावर हल्ला केला आणि त्यांचे अनेक दहशतवादी ठार मारले. ही एक अत्यंत कौतुकास्पद कारवाई. कारण, या दहशतवादी गटाने मागच्या वर्षी ‘आसाम रायफल’चे कमांडिंग ऑफिस कर्नल त्रिपाठी, त्यांच्या पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाला आणि चार इतर जवानांना एका घातामध्ये मारले होते.मणिपूरमधील प्रमुख बंडखोर गटांपैकी एक ’पीएलए’ १९७० पासून भारतापासून अलिप्त होण्यासाठी लढा देत आहे. तिबेटची राजधानी ल्हासाजवळील लष्करी छावणीत याच्या संस्थापकांना चिनी सैन्याने मूलतः प्रशिक्षण दिले होते.
म्यानमार सैन्य ‘तत्माडॉ’ (Tatmadaw) आता सशस्त्र बंडाच्या रुपात आपल्या अंतर्गत अशांतता हाताळण्यात व्यस्त आहे. अलीकडच्या काही महिन्यांत चीन आणि काचिन यांसारख्या राज्यांमध्ये जुंटा सैन्यावर आणि लष्करी प्रतिष्ठानांवर अनेक समन्वित हल्ले सुरू आहेत.

म्यानमार सीमेवर अत्यंत घनदाट जंगल असून जंगलाच्या आत दहशतवादी गटांचे अड्डे असतात. तिथे म्यानमार सैन्याचा फारसा प्रभाव नाही. तिथे जाणे अत्यंत धोकादायकही ठरु शकते. कारण, प्रत्येक कॅम्पच्या आजूबाजूला आणि येण्या-जाण्याच्या रस्त्यावर तिथल्या दहशतवादी गटांचे लक्ष असते. जंगल घनदाट असल्यामुळे, दहशतवाद्यांशी समोरासमोर सामना झाला, तर आपल्याला साहाय्य करायला, इतर सैन्य मदतीला येण्याची शक्यता फारच कमी असते. येण्याच्या तसेच जाण्याच्या मार्गावर माईन्स म्हणजे सुरुंग लावले असतात. त्यामुळे सुरुंगावर पाय पडल्यास जखमी होण्याचा किंवा जीव जाण्याचाही मोठा धोका असतो. अशा धोक्याला सामोरे जाऊन, दहशतवादी गटाच्या तळांवर हल्ला करणे, ही अत्यंत शौर्यपूर्ण कामगिरी. या दहशतवादी तळावरती कर्नल त्रिपाठींवरती ज्यांनी हल्ला केला होता, त्यातले अनेक दहशतवादी नेते मारले गेले. अशा क्रूर दहशतवाद्यांना मारून आपण ’पीएलए’ या दहशतवादी गटाला मोठा धडा शिकवला आहे.
 
‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ अत्यंत मानसिक दबावाखाली...
 
’२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’चे हे काम अजून जास्त कौतुकास्पद आहे; कारण त्यांच्यावरती नागालॅण्ड सरकार आणि पोलिसांनी खटला चालवण्याची तयारी सुरू केलेली आहे. यामुळे ’२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ अत्यंत मानसिक दबावाखाली होती. अशा परिस्थितीमध्ये एक नवे ऑपरेशन आणि तेही म्यानमारच्या आत घुसून यशस्वीरित्या पार पाडणे, हे अत्यंत पराक्रमी कृत्य समजले पाहिजे.नागालॅण्ड सरकारने एक मोठा प्रपोगंडा चालवला होता की, ’२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ने नागालॅण्डच्या निरपराध नागरिकांना क्रूरपणे ठार मारले जे की, पूर्णपणे असत्य होते. अनेक वेळा या राज्यातील राजकारणी हे जास्त सैनिकीविरोधी कारवाया करतात आणि दहशतवादी कृत्यांविषयी काहीही बोलत नाही.

‘त्या’ प्रकरणाचा थोडासा इतिहास

नागालॅण्डमधील मोन जिल्ह्यातील तिझित परिसरातील ओटिंग गावाजवळ अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर, लष्कराच्या ’२१ पॅरा एस एफ’ने घात लावला होता. संशयित अतिरेकी समजून, वाहनाला थांबविण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, वाहन न थांबल्याने, भरधाव वेगाने पुढे गेल्याने त्यांनी वाहनावर गोळीबार केला. त्यात आठपैकी सहा ठार जण झाले. ते सर्व खाण कामगार होते, हे लक्षात येताच, त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केले. त्यांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सदनात निवेदनाद्वारे सांगितले होते.त्यानंतर काही गावकरी ‘२१ पॅरो कमांडों’वर शस्त्रासकट चालून आले. स्वयंसंरक्षणाकरिता केलेल्या फायरिंगमध्ये पुन्हा सहा नागरिक ठार झाले. त्याशिवाय एक जवान ठार झाला. अनेक जण जखमी झाले.

लष्कराची ‘२१ पॅरा कमांडो’ युद्ध युनिट आहे. २०१५ साली ‘ऑपरेशन हॉट परस्यूट’अंतर्गत म्यानमारच्या आत घुसून, दहशतवादी प्रशिक्षण शिबीर याच युनिटने उद्ध्वस्त केले होते. गुप्तहेरांकडून 'NSCN'(K)चे बंडखोर ओटिंग गावाजवळून जाणार होते, अशी सूचना होती. त्यामुळे ते सापळा रचून वाट पाहत होते. परंतु, त्यांच्या हातून चुकीच्या ओळखीमुळे सामान्य मजूर, जे बोलेरो गाडीतून घराकडे जात होते, ते मारले गेले.हे मजूर कोनयाक जनजातीचे होते. कोनयाक नागांची जनसंख्या तीन लाखांवर आहे. अनेक नागा गट या भागात सक्रिय आहे. यात कोनयाक व म्यानमारमधील नागा बहुतांश आहेत व हे म्यानमारमधून ये-जा करीत असतात. एनएससीएन (आयएम) मुख्य प्रभावशाली गट, तसेच एनएससीएन(के), एनएससीएन (के-२०) ए, एनएससीएन (निकी, सुमी) गट, एनएससीएन (एनके), एनएससीएन (केया), एनएससीएन (केएन) अशा सर्व प्रकारच्या बंडखोर संघटना आहेत. चीनची या संघटनांना मदत आणि फूस आहेच.ईशान्येत वावरणार्‍या ‘आसाम रायफल्स’ व भारतीय सैन्यावरही प्रचंड ताण असतो. म्यानमारला लागून असलेल्या नागालॅण्डच्या मोन जिल्ह्यात ‘आफ्स्पा’ कायदा लागू आहे. यामुळे केंद्र सरकारची परवानगी न घेता, लष्कराविरोधात गुन्हा दाखल केला गेला जाऊ शकत नाही. पण, नागा पोलिसांनी स्वतःहून भारतीय लष्कराच्या विशेष दलाच्या तुकडीविरोधात हत्येची तक्रार दाखल केली. ‘आफस्पा’मध्ये जर कार्यरत असणार्‍या सैनिकांवर चार्जशीट दाखल करण्यात आली, तर ते देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेवर घाला घालण्यासारखे असेल.

‘फायटिंग स्पिरिट’ कौतुकास्पद!

मात्र, ’२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ने याआधी आलेल्या अपयशाची परवा न करता, पुन्हा एकदा म्यानमारमध्ये दहशतवादी गटात वरती हल्ला करून, त्यांना एक मोठा धक्का दिला. त्यांचे ’फायटिंग स्पिरिट’ हे म्हणूनच कौतुकास्पद आहे.लष्करी अधिकारी-जवान हेसुद्धा या देशाचे नागरिक आहेतच. त्यामुळे कोणाही नागरिकाला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो अधिकार असतो, तो त्यांनाही आहेच.जंगलातील जीवन-मरणादरम्यान लोंबकळणार्‍या अशा युद्धाचे पोस्टमॉर्टम वातानुकूलित अभ्यासिकांमध्ये दिवाणखान्यात करून, जवानांना गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या छंदात काही राजकारणी, पोलीस, मानवाधिकार कार्यकर्ते मग्न असतात. त्यांना जखमी आणि मरण पावलेल्या सैनिकांच्या‘मानवी हक्का’ची तसूभरही चिंता नसते. जो देश सैनिकांचे रक्षण करत नाही, त्या देशाची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात येते, हे लक्षात घ्यायला हवे.

भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करा

मिझोराम, मणिपूर, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशमधून जाणारी १ हजार, ६४३ किमी लांबीची भारत-म्यानमार सीमेजवळ दोन्ही बाजूने राहणार्‍या लोकांना कागदपत्रांशिवाय दुसर्‍याच्या प्रदेशात १६ किमी प्रवेश करण्याची मुभा देणारी मुक्त हालचाल व्यवस्था आता रद्द केली आहे. संपूर्ण सीमेवर कुंपण घालण्यात येईल. बंडखोरी, तस्करी आणि अमली पदार्थांच्या व्यापारावर थांबवण्याच्या उद्देशाने भारतीय बाजूवर हल्ले करण्यासाठी आणि नंतर म्यानमारमध्ये पळून जाण्यासाठी, बेकायदेशीर स्थलांतरितांच्या ओघाला आळा घालण्यासाठीचे नेटवर्क पंगू करण्यासाठी, बंडखोर गटांकडून वापरल्या जाणार्‍या मुक्त ये-जा थांबवली गेली. दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर मिझोरामच्या विविध भागांमध्ये ६० हजारांहून अधिक निर्वासित राहत आहेत. थोडक्यात, भारत-म्यानमार सीमा अत्यंत धोकादायक बनली आहे. ईशान्य भारतातील तैनात भारतीय सैन्य, ‘आसाम रायफल्स’ची जबाबदारी अजून वाढणारच आहे.’२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुकच करायला पाहिजे आणि अशा करूया की, येणार्‍या काळामध्ये सुद्धा ते अशाच प्रकारची चमकदार कारवाई करत राहतील.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.