नवी दिल्ली : (Dr. Manmohan Singh) माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी ट्रस्ट स्थापन करून जागा देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा वितरीत केली जावी अशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी केलेली विनंती आज सकाळी केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृह अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला, आणि सरकार स्मारकासाठी जागा वितरीत करेल याबाबत त्यांना सांगण्यात आले. यासाठी ट्रस्ट स्थापन करून, जागा वितरीत करावी लागणार आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्या जाऊ शकतात, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने जागा द्यायला हवी, अशी मागणी करून केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात आला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा शोधता न येणे हा त्यांचा अपमान असल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या टिकेस प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासाचा मोठा पाया रचणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीए सरकार त्यांना योग्य सन्मान देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेस पक्षाला ही माहिती देण्यात आली. निदान आजच्या या दु:खाच्या काळात तरी राजकारण टाळायला हवे. मोदी सरकारने पक्षीय भावनांपेक्षा वर जाऊन सर्व नेत्यांचा आदर केला आहे, असेही त्रिवेदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.