नवी दिल्ली, पहलगाम हल्ल्याविषयी भारताने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर कोलंबियाने भारतास पाठिंबा दिला आहे. कोलंबिया सरकारचा हा निर्णय सकारात्मक असल्याचे भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोलंबियाच्या पाकिस्तानसोबत उभे राहण्याच्या निर्णयाविषयी थरूर यांनी कोलंबियातच जाहिर नाराजी व्यक्त केली होती.
जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्ध भारताच्या पाकला उघड करण्याच्या प्रयत्नांना लक्षणीय यश मिळाले आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने कोलंबियामध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश केला. कोलंबियाने यापूर्वी आपल्या निवेदनात पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती, परंतु शशी थरूर यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले आहे.
भारतीय शिष्टमंडळाने कोलंबियाच्या उप परराष्ट्र मंत्री रोझा योलांडा विलाविचेंसिओ यांना भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर कोलंबियाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ आपले विधान मागे घेतले. भारताची भूमिका समजून घेण्याबाबत कोलंबियाच्या भूमिकेचे कौतुक करताना थरूर म्हणाले की, उप परराष्ट्र मंत्र्यांनी अतिशय विनम्रपणे सांगितले की त्यांनी ते विधान मागे घेतले आहे, ज्याबद्दल आम्हाला काळजी होती आणि आता त्यांना आमची भूमिका पूर्णपणे समजली आहे, ज्याला आम्ही खूप महत्त्व देतो, असे थरूर यांनी म्हटले आहे.