नवी दिल्ली, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत भारताच्या शूर लेकींनी असामान्य पराक्रम दाखवला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे कौतुक केले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्य आयोजित 'लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलना'स संबोधित करताना ते बोलत होते.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर आपल्या संस्कृतीवरही हल्ला केला. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आहे, जे आता दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या सूत्रधारांसाठी एक दुःस्वप्न बनले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' ही भारताची सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी दहशतवादविरोधी कारवाई आहे. भारताच्या सैन्याने अशा ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले, ज्याची पाकिस्तानच्या सैन्यानेही कल्पना केली नव्हती. या कारवाईने हे स्पष्ट केले की दहशतवादाद्वारे प्रॉक्सी युद्धे आता सहन केली जाणार नाहीत. आता भारत शत्रूच्या हद्दीतही हल्ला करू आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाही मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या 'नारी शक्ती'चे प्रतीक बनले असून त्यामध्ये बीएसएफच्या लेकींनीही असामान्य पराक्रम गाजवला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पाकच्या गोळीस आता बॉम्बगोळ्यांनी प्रत्युत्तर दिले जाणार आहे. बीएसएफमध्ये कार्यरत भारताच्या शूर लेकींनी जम्मूपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेपर्यंत आघाडीवर होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. कमांड अँड कंट्रोल सेंटरपासून ते शत्रूच्या चौक्या नष्ट करण्यापर्यंत, बीएसएफच्या शूर मुलींनी असाधारण शौर्य दाखवले, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.