कल्याणमधील 'ओरॅंगुटॅन'ला पाठवणार 'या' देशात

    16-Dec-2024
Total Views | 128
kalyan orangutan


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नोव्हेंबर महिन्यात कल्याणमधील वन्यजीव तस्करीमधून पकडलेल्या ओरॅंगुटॅनला इंडोनेशियाला पाठवण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता वन विभागाने पूर्ण केली आहे (kalyan orangutan). यासंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भात ही कागदपत्रे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवमान बदल मंत्रालयाने नेमलेल्या समितीकडे पाठविण्यात आली आहेत. सध्या हा प्राणी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आहे. (kalyan orangutan)
 
 
वन विभागाने ९ नोव्हेंबर रोजी पलावा सिटीमधील एका इमारतीमध्ये शनिवारी छापा टाकून विदेशी प्राण्यांची तस्करी उघडकीस आणली होती. कल्याण-शिळ फाट्यावरील एक्स्पिरिया मॉलजवळील पलवा सिटीमधील सवरना इमारतीतील एका खोलीवर टाकलेल्या छाप्यात काही विदेशी प्राणी आढळून आले. विदेशी साप, अजगर, कासव, सरडा आणि महत्वाचे म्हणजे ओरॅंगुटॅन या प्रजातीचे माकड वनकर्मचाऱ्यांनी यावेळी ताब्यात घेतले होते. या सर्व प्राण्यांची रवानगी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली होती. याबाबत मुख्य वन्यजीव रक्षकांनी ठाणे वन विभागाला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "या प्राण्याला मूळ अधिवासात/देशात परत पाठिवणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्राण्याच्या पुढील उचित काळजी घेणे बाबत हैद्राबाद व म्हैसूर आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान यांच्याशी संपर्क साधण्यात यावा आणि पुढील कार्यवाही करण्यात यावी." या पत्राची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याची तयारी ठाणे वन विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार आता या प्राण्याची रवानगी इंडोनेशियाला करण्यासंदर्भातील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 
 
इंडोनेशियामधील ओरॅंगुटॅन संदर्भातील काम करणारी एक संस्था आणि तज्ज्ञ यांच्याशी आमचे बोलणे झाले असून ते हा प्राणी स्वीकारण्यासाठी तयार आहेत, अशी माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. यासंदर्भातील पत्रव्यवहार पूर्ण झाला असून यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व कागदपत्र ही केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या (डब्लूसीसीबी) माध्यमातून केंद्रीय समितीला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121