इस्लामी शक्तींचा अपप्रचार

    13-Nov-2024
Total Views | 54
congress leader syed azim pir khadri statement

 
काँग्रेस पक्ष आणि त्यांची मुस्लीम तुष्टीकरणाची धोरणे हा विषय देशासाठी नवीन नाहीच. एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाने वागण्यासाठी बाध्य करणार्‍या काँग्रेसला, गेल्या पाऊणशे वर्षांत मुस्लिमांच्या गळी सर्वधर्मसमभावाचे तत्त्व उतरवण्यात अपयशच आले. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक खैरातींचे वाटप करून सुद्धा, भारतातील मुस्लीम काही केल्या सर्वधर्मसमभाव न्यायाने वागण्यास तयार नाही, हे आजची परिस्थिती. आजमितीला गेल्या दोन ते तीन पिढ्या सर्वधर्मसमभावाचा आणि धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या जनुकांमध्ये इतकी मुरली आहे की, हिंदूंची नवजात पिढी स्वत:ला हिंदू म्हणवण्यासाठीही विचार करू लागली आहे. त्याचवेळी मात्र या देशातील धर्मांध मुस्लीम सातत्याने इस्लाम आणि त्यातील ‘जिहाद’सारख्या गोष्टींवर उघड उघड धमक्या देताना दिसतात. या धमक्यांचे समाजावरील दूरगामी परिणाम हे काय असतील, हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाहीच. मुळातच सामाजिक सौहर्दता, बंधुभाव या सगळ्याच गोष्टी जितक्या ऐकायला छान आहेत, तितक्याच त्या अनुभवायला देखील छान आहेत. पण, केव्हा? याचे उत्तर यावर भाषणे ठोकणारे देत नाहीत. तर, दुसरीकडे काँग्रेस लांगूलचालनाचा उत्तम नमुना पेश करताना, प्रत्येक गोष्ट इस्लामच्या दावणीला बांधायला निघाली आहे. देशाच्या भूभागापासून सुरू झालेला प्रवास, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन ठेपला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते सय्यद आजीम पीर खादरी यांनी, डॉ. आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारायला तयार असल्याचे नुकतेच विधान केले. तसेच, “असे जर झाले असते तर, रामाप्पा रहिम झाले असते, डॉ. जी परमेश्वरा ’पीर साहेब’ झाले असते, हनुमंत गौडा हसन झाले असते आणि मंजुनाथ तिम्मापूर हे ’मेहबूब’ झाले असते,” असे वादग्रस्त विधानही सय्यद यांनी केले. त्यामुळे कर्नाटकात मोठाच वादंग निर्माण झाला. प्रकरण अंगाशी येतंय हे समजताच, सय्यद यांचे हे व्यक्तिगत मत असून, काँग्रेस पक्षाशी त्याचा संबंध नसल्याचे नेहमीप्रमाणे कर्नाटक काँग्रेसने स्पष्ट केले. सध्या आंबेडकर चळवळीवर डाव्यांचा डोळा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही चळवळ ‘हायजॅक’ करून, कालांतराने आंबेडकरी तरूणांचा बुद्धिभेद करत मुस्लीम समाजाशी जोडण्याचा डाव आखला जात आहे. ‘जय भीम, जय मीम’सारख्या घोषणादेखील त्याचसाठी. सय्यद यांचे हे वक्तव्य फक्त भात किती मुरला आहे? यासाठीच असून, ते हिमनगाचे टोक आहे हे निश्चित.

डॉ. आंबेडकरांचा प्रहार


आजमितीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि इस्लाम यांना जोडण्याचा नसता खटाटोप देशातील काही धर्मांध शक्ती वारंवार करीत असून, त्यानिमित्ताने इस्लाम विषयीचे डॉ. आंबेडकरांचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याआधी दोन दशकांचे डॉ. आंबेडकरांचे चिंतन त्यामागे आहे. हिंदू धर्माचा त्याग करताना, दुसरा कोणता धर्म स्वीकारायचा याबाबत डॉ. आंबेडकर यांचे विचार सुस्पष्ट होते. भारतीय मातीशी नाळ जुळलेला धर्मच त्यांना हवा होता. त्यामुळे त्यांनी इस्लाम स्वीकारण्याचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया’ या 1945 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात डॉ. आंबेडकर म्हणतात, ”हिंदू धर्म लोकांना विभाजित करतो तर, इस्लाम लोकांना एकत्र बांधतो असे म्हटले जाते. हे फक्त अर्धसत्य आहे. कारण, इस्लाम जसा बांधून ठेवतो तितक्याच असह्यपणे विभाजित करतो. इस्लाममध्ये मुस्लीम आणि गैर-मुस्लीम यांच्यात जो फरक केला आहे, तो अतिशय पराकोटीचा फरक आहे. इस्लाममधील बंधुभाव हा मानवाला अपेक्षित असणारा वैश्विक बंधुभाव नसून, तो फक्त मुस्लिमांसाठी मुस्लिमांचा बंधुभाव आहे. त्याचा फायदा त्या इस्लाममधील लोकांपर्यंत मर्यादित आहे. जे इस्लामवर श्रद्धा ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी इस्लाममध्ये तिरस्कार आणि शत्रुत्वाशिवाय काहीही नाही.” तसेच इस्लाममधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतांवरही भाष्य केले आहे. डॉ. आंबेडकर म्हणातात, “जोवर भारतीय भूमीमध्ये इस्लामी राजवट स्थापन होत नाही, तोवर या भूमीला मातृभूमी मानण्यास, इस्लाम खर्‍या मुसलमानाला परवानगीच देत नाही.” तसेच, भारतातील हिंदू -मुस्लीम ऐक्याच्या आदर्शवादात जगणार्‍या नेत्यांना डागण्या देताना, “मुस्लिमांसाठी हिंदू हा काफिर आहे. काफिर आदरास पात्र नाही. म्हणूनच काफिरांचे राज्य असलेला देश मुस्लिमांसाठी दार-उल-हरब आहे. हे पाहता, मुसलमान हिंदू सरकारचे पालन करणार नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी आणखी कोणत्याही पुराव्याची आवश्यकता वाटत नाही” असे आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे. या दोन-तीन उदाहरणांवरूनच आंबेडकरांचे इस्लामविषयीचे चिंतन किती विस्तृत होते, हे स्पष्ट होते.

कौस्तुभ वीरकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121