हिंदू समाजाला तोडणे हाच काँग्रेसचा विजयी फॉर्म्युला – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातही हिंदुत्व केंद्रस्थानी राहण्याचा स्पष्ट संकेत
09-Oct-2024
Total Views | 35
नवी दिल्ली : हिंदू समाजाला तोडणे आणि जातीय द्वेष भडकविणे हाच काँग्रेसचा विजयी फॉर्म्युला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण – पायाभरणी प्रसंगी केला आहे. याद्वारे महाराष्ट्रातही भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. हरियाणामध्ये हॅटट्रीक साधल्यानंतर भाजपचा हुरूप चांगलाच वाढला आहे.
हरियाणामध्ये काँग्रेसच्या जातीय प्रचारास भाजपने हिंदुत्वाद्वारे मोडून काढल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही भाजप हिंदुत्वाचा मुद्दाच जोरदारपणे मांडणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्राच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे.
काँग्रेसने नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा हे सूत्र पाळले आहे. काँग्रेस हा बेजबाबदार पक्ष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. ती अजूनही देशाचे विभाजन करण्यासाठी नवनवीन षडयंत्रे तयार करत आहे. हिंदूंच्या एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचे हे काँग्रेसचे धोरण आहे. हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल, तेवढा आपल्याला फायदा होईल हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेसला हिंदू समाज कोणत्याही प्रकारे पेटवत ठेवायचा आहे, जेणेकरून त्यावर राजकीय भाकरी भाजता येईल. भारतात जिथे जिथे निवडणुका होतात तिथे काँग्रेस हेच सूत्र लागू करते. काँग्रेस निवडणूक पूर्णपणे जातीय द्वेषाच्या आधारावर लढते. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार हिंदू समाजाला फोडून आपल्या विजयाचे सूत्र बनवणे हाच असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
महाराष्ट्रात सुमारे ७ हजार ६०० कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्कील्स(आयआयसी), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (व्हीएसके) यांचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.