मुंबई : समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना 'ॲड फिज' या संस्थेतर्फे दिले जाणारे ‘ध्यास सन्मान’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" या सेवाभावी संस्थेला तर “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. २५,००० रुपये, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ७.०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे साजऱ्या होणाऱ्या ‘गगन सदन तेजोमय’ या दिवाळी पहाट कार्यक्रमात सन्मानार्थींना हे सन्मान प्रदान केला जाणार आहेत.
'ॲड फिज' गेली १९ वर्ष विविध संकल्पना घेऊन 'गगन सदन तेजोमय' हा दिवाळी पहाट कार्यक्रम करीत आली आहे. समाजासाठी प्रतिकुल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा 'ॲड फिज'द्वारे “गगन सदन तेजोमय” या दिवाळी पहाट सोहळ्यात 'ध्यास सन्मान' देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा विनोद आणि महेंद्र पवार यांनी १९ वर्षांपूर्वी सुरु केली होती. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य त्यासोबत उत्तम दर्जा हे 'गगन सदन तेजोमय' वैशिष्ट्य आहे.
या वर्षी या कार्यक्रमात सन्मान सोहळ्यासोबतच 'मोगरा फुलला' ही संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना आणि दिग्दर्शन राहुल रानडे यांचे असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर तर सहभाग श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर, निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, अभय ओक यांचा असणार आहे. या मैफिलीचे निरूपण विदुषी धनश्री लेले करणार असून निर्मिती विनोद पवार तर संयोजन महेंद्र पवार यांचे असून प्रस्तुती 'ॲड फिज'ची असणार आहे.