व्लादिमीर लेनिन : विसाव्या शतकावरील मृत्युछाया

    19-Jan-2024
Total Views |
lenin
 
व्लादिमीर इलिच उल्थानोव्ह उर्फ लेनिन हा एक यमदूत होता. एक तत्त्वचिंतक, राजकारणी आणि तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवणारा कार्यकर्ता अशी साळसूद रूपं धारण करून, या यमदूताने किमान ५० लाख माणसं ठार मारली. दि. २१ जानेवारी, १९२४ या दिवशी तो स्वतःच मेला. म्हणजेच आता त्याच्या मृत्यूला १०० वर्षं उलटली. १९१७ साली त्याने त्याच्या मायभूमी रशियामध्ये जी सोव्हिएत राज्यपद्धती सुरू केली, ती १९९१ पर्यंत म्हणजे ७४ वर्षं टिकली, या कालखंडात या राज्य पद्धतीने खुद्द रशियात आणि जगभर कोट्यवधी लोकांचे बळी घेतले.
 
ख्रिश्चन चर्च आणि इस्लाम यांनी यापूर्वीच्या शतकांमध्ये जगभर असाच हैदोस घातला होता. ख्रिश्चनांनी येशूच्या धर्माच्या प्रचारासाठी आणि इस्लामने पैगंबरांच्या धर्माच्या प्रचारासाठी अशाच जगभर रक्ताच्या नद्या वाहवल्या होत्या. लेनिनने प्रचारात आणलेलं तत्त्वज्ञान कोणताच धर्म मानत नव्हतं. ‘श्रमिकाचं-कष्टकर्‍यांचं राज्य’ ज्यात देव-धर्म वगैरे अमूर्त कल्पनांना काहीही किंमत नाही, हेच त्याचं तत्त्वज्ञान होतं. गंमत म्हणजे हे तत्त्वज्ञान मांडणारा विचारवंत स्वतः लेनिन नव्हताच. कार्ल मार्क्स नावाच्या जर्मन ज्यू विचारवंताने ते मांडलं होतं आणि समकालीन राजकारणात ते चक्क अयशस्वी ठरलेलं होतं.
 
कार्ल मार्क्सचा बाप हर्शेल याने ज्यू धर्माचा त्याग करून, तत्कालीन जर्मनीत प्रचलित असलेला एव्हँजेलिकल प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. लगेच त्याने ‘हर्शेल’ हे ज्यू नाव टाकून, ‘हाईन्रिश’ हे जर्मन ख्रिश्चन नाव घेतलं. कार्ल मार्क्सचं बहुतेक आयुष्य लंडनमध्येच गेलं. ब्रिटिश लायब्ररीत बसूनच त्याने त्याचं बरचसं लिखाण केलं. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेला भांडवलदार-कारखानदार हा एक नवाच सामाजिक वर्ग मजुरांचं भयानक शोषण करीत होता. औद्योगिक क्रांती पूर्व काळात राजे-रजवाडे, सरदार-जमीनदार हे मैलोन्मैल पसरलेल्या जमिनींचे मालक असत. सामान्य माणसं त्यांच्या जमिनींवर शेतमजूर म्हणून राबत असत. हा सरंजामदार वर्ग सामान्य माणसांचं सर्वतोपरी शोषण करत, स्वत: ऐशोआरामात राहत असे. आता सरंजामदारांच्या जोडीला भांडवलदार वर्ग आला. सामान्य माणूस अधिकच भरडला जाऊ लागला आणि हे शोषक लोक आणखी गबर होऊ लागले.
 
मार्क्सने याविरूद्ध आवाज उठवताना अशी मांडली केली की, शेती किंवा कारखानदारीमधून जी संपत्ती निर्माण होते, ती श्रमिकांच्या आणि कष्टकर्‍यांच्या हक्काची संपत्ती आहे. पण, सरंजामदार आणि भांडवलदार वर्ग श्रमिकांना ती मिळू देत नाहीत. म्हणून श्रमिकांनी एकजूट करून उभं राहावं, क्रांती करावी. सरंजामदारादि शोषकांना सत्तेवरून हाकलून देऊन स्वतःच राज्यकारभार हाती घ्यावा. चर्च म्हणजेच धर्मसत्ता ही नेहमी शोषकांच्या बाजूनेच उभी राहते. ‘देव आणि धर्म’ या संकल्पना म्हणजे पाद्री लोकांची लबाडी आहे. श्रमिकांच्या राज्याला असल्या लबाड लोकांचीही गरज नाही. वरील आशयाची मांडणी करणारा कार्ल मार्क्सचा ‘दास कपिताल’ हा ग्रंथ १८६७ साली प्रकाशित झाला. नंतर त्याचे आणखी दोन खंड अनुक्रमे १८८५ आणि १८९४ साली मार्क्सचा मित्र फ्रेडरिक एंगल्स याने प्रकाशित केले. कारण, स्वतः मार्क्स १८८३ सालीच मरून गेला होता.
 
१८६७ ते १८८३ या काळात अनेक राजकीय-सामाजिक पंडितांनी मार्क्सच्या नव्या सिद्धांताची जशी खूप स्तुती केली, तशीच अनेकांनी रेवडीही उडवली. सर्वसामान्य माणसाच्या खडतर जीवनाबद्दल अपार कणव आणि त्याची ती स्थिती पालटायला हवी ही मनपासूनची इच्छा, ही मार्क्सची बलस्थानं आहेत. त्याबद्दल त्याची स्तुती करण्यात आली. पण, या रोगावरची उपाययोजना म्हणून त्याने जे काही मांडलं आहे, ते रोगापेक्षा उपायानेच रोग्याच्या हमखास मृत्यू ओढवून आणणारं, असं असल्याचा स्पष्ट अभिप्राय अनेकांनी दिला. त्यामुळे मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित राजकीय संघटना, राजकीय पक्ष काही युरोपीय देशांमध्ये स्थापन झाले खरे; पण त्यांना लोकप्रियता कधीच मिळाली नव्हती. अनेक राजकीय पक्षांमध्ये आणखीन एक भर पडली एवढंच.
 
रशिया हा एक अवाढव्य देश होता-आहे. पश्चिम युरोपातल्या ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादी देशांप्रमाणेच आपल्या देशातही लोकशाही राज्यव्यवस्था आली पाहिजे, असे तिथल्या लोकांना वाटत होते. हे होणं अशक्य होते. कारण, रशियन सम्राट ज्याला ‘झार’ असं म्हटलं जात असे, त्याची राज्यावर घट्ट पकड होती. मग वेगवेगळ्या राजकीय क्रांतिकारी संघटना सशस्त्र बंड पुकारीत. झार अत्यंत निर्घृणपणे ती बंडं चिरडून टाकत असे. अशाच एका बंडात व्लादिमीर इलिच उल्थानोव्ह याचा थोरला भाऊ फाशी गेला आणि स्वतः व्लादिमीर तुरुंगात गेला. सुटका झाल्यावर झारच्या गुप्त पोलिसांना चकवण्यासाठी त्याने नाव धारण केलं-लेनिन. स्वतः शेतकरी, कामकरी, श्रमिक वगैरे अजिबात नव्हता. त्यांचं कुटुंब साधारणपणे सधनच समजलं जात असे. त्याचा बाप शिक्षणाधिकारी होता.
 
पण, पोराला झारशाही उलथून टाकून लोकशाही नव्हे, मार्क्सप्रणित साम्यवादी राज्यव्यवस्था आणण्याचे डोहाळे लागले. यात त्याला आणि त्याच्या पक्षाला साफ अपयश आलं. कारण, झार हा फ्रान्सच्या १६व्या लुईप्रमाणे झोपल्या-झोपल्या राज्य करणारा राजा नव्हता. झारच्या पोलिसांनी लेनिन आणि त्याच्यासारख्या उद्योगी लोकांना पकडून सैबेरियात तडीपार केलं. तडीपारीची मुदत संपल्यावर जानेवारी १९०५ मध्ये या लोकांनी झारविरूद्ध एक जबरदस्त बंड केलं. झारने ते चिरडलं. लेनिनला रशिया सोडावा लागला. तो लंडन, पॅरिस, स्टॉकहोम, प्राग इत्यादी युरोपीय शहरांमधून साम्यवादी पक्षांच्या सभा, समित्या, बैठकांमधून भाषण करीत, लेख लिहीत फिरत राहिला. १९१० साली पुन्हा एक बंडाचा प्रयत्न झाला. झारने तोदेखील चिरडला. पण, राज्यकारभारात सुधारणा करण्याची घोषणा केली. जनतेचं समाधान झाले. यामुळे झारा हटवण्याचं साम्यवाद्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. कदाचित ते कायमच स्वप्न राहीलं असतं. पण... ब्रिटन आणि फ्रान्स, जर्मनी या १८७० साली अस्तित्वात आलेल्या नव्या राष्ट्राचा उत्कर्ष सहन होत नव्हता. काहीतरी कारण काढून जर्मनीविरूद्ध युद्ध छेडायचं आणि त्यात शक्यतो सगळ्या युरोपीय राष्ट्रांना आपल्या बाजूने उतरवायचं, असा ब्रिटिश मुत्सद्यांचा फार मोठा कावा साधारण १९०० पासूनच सुरू झाला होता. जर्मनीने हे ओळखून तुर्क साम्राज्याशी दोस्ती केली होती. बराच काळ धुमसणार्‍या या दारुच्या कोठाराने दि. २८ जून, १९१४ या दिवशी पेट घेतला. युरोपात जागतिक महायुद्ध भडकलं. रशियाच्या झारने जर्मनीविरूद्ध अँग्लो-फ्रेंचांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.
 
ब्रिटन आणि फ्रान्स आकाराने छोटेे होते आणि अत्याधुनिक, प्रशिक्षित सैनिकी बळाने सुसज्ज होते. जर्मनीचीही तीच स्थिती होती. या उलट त्यांच्या तुलनेन रशियन सैन्याला मध्ययुगीनच म्हणावं लागलं असतं. परिणामी, रशियन सैन्याची जर्मनांनी ससेहोलपट चालवली. फार मोठा भूभाग, सामग्री गमावीत रशियन सेना मागे हटू लागल्या. सततच्या पराभवामुळे रशियन जनमानस हवालदिल झाले. १९१७ सालच्या फेब्रुवारीत पुन्हा एकदा झार विरूद्ध यशस्वी बंड झालं. झार पदच्युत झाला आणि अलेक्झांडर केरेन्स्की याच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकार स्थापन झालं.पण, जर्मनीला एवढं पुरेसं नव्हतं. जर्मनीला रशिया युद्धातून पूर्ण बाहेर पडायला हवं होतं. जर्मन गुप्तचर खात्याने लेनिन आणि त्याच्या साम्यवादी बोल्शेव्हिक पक्षाला अधिकाधिक मदत करायला सुरुवात केली. जर्मनीच्या मदतीने लेनिनने पुन्हा बंड करून, केरेन्स्की सरकार पदच्युत केलं. ही घटना ऑक्टोबर १९१७ मध्ये घडली. सत्तारूढ झालेल्या लेनिनच्या सोव्हिएत रशियन सरकारने मार्च १९१८ मध्ये जर्मनीशी तह केला.
 
रशिया पूर्णपणे युद्धातून बाजूला झाला. जर्मनी पूर्वेकडेनिर्धास्त झाला आणि त्याने पूर्वेकडचा सेनासंभार पश्चिमेवर लोटला. १९१७ ते १९२० या तीन वर्षांत लेनिन आणि त्याच्या पक्षाने रशियातले सरदार-सरंजामदार-खुद्द झार आणि त्याचं कुटुंब अशा लोकांची सरळ कत्तल उडवली. या पारंपरिक शोषणकर्त्यांसह लोकशाहीवादी राजकारण्यांचीही कत्तल करण्यात आली. कारण ते साम्यवादाचे विरोधक होते. १९२० साली सोव्हिएत राज्य स्थिरस्थावर झाल्यावर लेनिनने संपूर्ण शेती उद्योगाचं राष्ट्रीयीकरण केलं. शेतकरी वर्ग खडबडून जागा झाला. त्याने या ’सुधारणे’ला जोरदार विरोध केला. लेनिनने ही साम्यवादी व्यवस्थेविरूद्धची ’प्रतिक्रांती’ आहे, असे ठरवलं आणि ती चिरडून टाकण्यासाठी झारपेक्षाही जालीम उपाय योजले. हजारो शेतकर्‍यांना गोळ्या घालण्यात आल्या नि त्यांच्या नातेवाईकांना सैबेरियात हद्दपार करून, त्यांच्या जमिनी सरकारजमा करण्यात आल्या. पण, आता लेनिनचा पट्टशिष्य जोसेफ स्टॅलिन हा पक्षात आपले बळ वाढवू लागला. स्टॅलिनला आपल्याला हटवून, सर्वंकष सत्ता ताब्यात घ्यायची आहे, हे लेनिनला स्पष्ट दिसू लागले, याला आवर घालण्यासाठी पक्षांतर्गत राजकीय उपाययोजनाही त्याने सुरू केली.पण, ती फळाला येण्यापूर्वीच दि. २१ जानेवारी, १९२४ या दिवशी लेनिन एकाएकी मरण पावला. काही महिने आधीपासून त्याची तब्येत वारंवार बिघडत होती. त्याला आकडी येत होती.
 
लेनिन मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच, स्टॅलिनने घाईघाईने पुढील हालचाली करून सत्तेवरची पकड घट्ट केली आणि मग दि. २४ जानेवारीला लेनिनची भव्य यात्रा काढून, याचा मृतदेह विशेष प्रक्रियांद्वारे संरक्षित करून, कायमचा मॉस्कोच्या लाल चौकात ठेवला.अगदी आजही, लेनिनच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करणार्‍या कोणाही डॉक्टरला निष्कर्ष काढावासा वाटतो की, लेनिन अगदी मरण पावण्याइतका आजारी नव्हता आणि आकडी येणं हे सरळच विषप्रयोगाचं लक्षण आहे. अर्थ स्पष्टच आहे. किमान ५० लाख माणसांना मारणारा लेनिन विषप्रयोगाने मेला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.