मदनदासजी देवी : देशसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्त्व

    05-Aug-2023
Total Views | 510
PM Narendra Modi On Madandasji Devi

काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण मदनदासजींना गमावले, त्यावेळी माझ्यासकट लाखो कार्यकर्ते अतिशय शोकाकुल झाले.मदनदासजींसारखे प्रभावी व्यक्तिमत्त्व आता आपल्यासोबत नाही, हे वास्तव स्वीकारणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. तरीही त्यांचा प्रभाव चिरंतन राहील, ही भावना आपले सांत्वन करत आहे. त्यांची शिकवण आणि त्यांचे सिद्घांत आपल्याला यापुढील प्रवासात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील आणि मार्गदर्शन करतील.

अनेक वर्षे मदनदासजींसोबत काम करण्याचे मला भाग्य लाभले. त्यांचा साधेपणा आणि अतिशय विनयशील स्वभाव मी अतिशय जवळून पाहिला. ते अतिशय कुशल संघटक होते आणि मी सुद्धा या संघटनेत बराच काळ काम केले. त्यामुळे साहजिकच संघटनेचा विकास आणि कार्यकर्त्यांची प्रगती याविषयी आमच्यामध्ये नियमितपणे चर्चा होत असायच्या. अशाच एका चर्चेमध्ये, ते मूळचे कुठले आहेत असे मी त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, ते महाराष्ट्रातील सोलापूरजवळच्या एका गावाचे रहिवासी आहेत आणि त्यांचे पूर्वज गुजरातमध्ये राहायचे. पण, तो भाग नक्की कोणता होता, याची त्यांना माहिती नव्हती. आमच्या एका शिक्षकांचे आडनाव देवी होते आणि ते शिक्षक विसनगरचे होते, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी देखील विसनगर आणि वडनगरला भेट दिली. आमच्यात गुजरातीमधूनही संवाद होत असे.

मदनदासजींच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाण्याची आणि त्या शब्दांमागील भावना जाणून घेण्याची त्यांची क्षमता. अतिशय नम्रपणे बोलणारे आणि नेहमीच हसतमुख राहणार्‍या मदनदासजींना अनेक तासांच्या प्रदीर्घ चर्चांचे सार केवळ काही वाक्यात मांडता यायचे. जेव्हा व्यक्ती स्वत:ला मागे ठेवून आपले संपूर्ण आयुष्य समष्टीच्या हितांना प्राधान्य देत, त्यासाठी समर्पित करते, तेव्हा काय अद्भुत गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात, हे आपल्याला मदनदास देवीजी, यांच्या जीवनकार्यातून स्पष्टपणे दिसते. शिक्षणाने लेखापरीक्षक असलेले मदनदासजी, खरे तर आरामशीर आयुष्य जगू शकले असते. मात्र, त्यांच्या अंतर्मनाने त्यांचे भविष्य दुसर्‍याच कार्यात निश्चित केले होते- तरुणांच्या मनांना आकार देण्यात आणि भारताच्या विकासासाठी कार्य करण्यात.

मदनदासजी यांचा भारतातील तरुणांवर अढळ विश्वास होता. देशाच्या कानाकोपर्‍यातील युवकांशी ते सहज जोडले जात आणि म्हणूनच, त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला बळकट करण्यात स्वतःला वाहून घेतले, यात काहीही आश्चर्य नाही. त्यांच्या या मार्गावरील, त्यांचे महत्त्वाचे प्रेरणास्थान म्हणजे यशवंतराव केळकरजी. मदनदासजी यांच्यावर त्यांचा अत्यंत प्रभाव होता आणि ते त्यांच्याशी कायम चर्चाही करत असत. अभाविपच्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सहभागी करुन घेण्याबाबत तसेच, सामाजिक कल्याणाच्या कामात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबाबत ते कायमच आग्रही होते. ते नेहमी म्हणत असत- “जेव्हा मुली, विद्यार्थिनी एखाद्या सामूहिक कार्यात सहभागी होतात, त्यावेळी ते कार्य अधिक संवेदनशीलतेने केले जाते, असे ते कायम सांगत असत.” मदनदासजी यांच्यासाठी, विद्यार्थ्यांप्रती त्यांचा असलेला स्नेह हा सर्वात मोलाचा होता. ते कायमच विद्यार्थ्यांच्या घोळक्यात रमत. मात्र, पाण्यातल्या कमळाप्रमाणे, ते स्वतः कधीही विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले नाहीत.

मला आज असे अनेक नेते आठवतात, जे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीचे श्रेय, त्यांना युवा वयात मदनजींकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला देतील. मात्र, असा कुठलाही मोठा दावा करण्याचा, कोणतेही श्रेय घेण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. सध्याच्या काळात मनुष्यबळाचे व्यवस्थापन, गुणवत्तेचे व्यवस्थापन आणि कौशल्याचे व्यवस्थापन या संकल्पना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. मदनदासजी लोकांना ओळखण्यात आणि त्यांची प्रतिभा संस्थात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी वापरण्यात प्रवीण होते. ते लोकांच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना काम देत असत. किंबहुना, ती त्यांची विशेषता होती. त्यांच्या गरजेप्रमाणे लोकांनी स्वत:ला बदलले पाहिजे, या गृहितकावर त्यांचा विश्वास नव्हता. त्याचमुळे एखाद्या युवा कार्यकर्त्याला स्वत:ची नवीन कल्पना मदनदासजींकडे सहजपणे, स्पष्टपणे मांडता यायची. त्याचमुळे त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेकांनी आपापल्या ताकदीप्रमाणे स्वयंप्रेरणेने काम करून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना, संस्थांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि त्या संस्था मोठ्या होऊन, त्यांची व्याप्ती वाढूनही त्या एकसंध आणि कार्यक्षम राहिल्या.

मदनदासजींचे प्रवासाचे वेळापत्रक भरगच्च असायचे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांना भेटायला त्यांना आवडायचे आणि लोकांशी संवाद साधायला ते नेहमीच तत्पर असायचे. मात्र, त्यांचे कार्यक्रम नेहमीच साधे असायचे, त्यात बडेजाव नसायचा. त्यामुळे त्यांचा कोणत्याही कार्यकर्त्यावर भार पडायचा नाही. अखेरपर्यंत त्यांचा हा गुण कायम राहिला. त्यांनी दीर्घ काळ आजारपणाला तोंड दिले, पण ते त्याबद्दल फारसे बोलायचे नाहीत. मी त्याबद्दल खोदून चौकशी केली तरच ते बोलायचे. शारीरिक त्रास सहन करूनही ते आनंदी राहिले. आपण देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो, याचा ते आजारपणातही सतत विचार करायचे.

मदनदासजी यांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उत्तम होती आणि यातूनच त्यांच्या सखोल आणि सूक्ष्म कार्यपद्धती आकाराला आली. ते एक उत्कट वाचक होते. जेव्हा जेव्हा त्यांना काही चांगले वाचनात यायचे, तेव्हा ते त्या क्षेत्रात काम करणार्‍या संबंधित व्यक्तीकडे ते पाठवायचे. मला अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांना अर्थशास्त्र आणि धोरणविषयक बाबींचे उत्तम ज्ञान होते.

भारतात कोणतीही व्यक्ती इतरांवर अवलंबून नसेल आणि प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल, स्वत:मध्ये सुधारणा घडवून विकास करण्याच्या संधींचा सदुपयोग करतील, असा भारत त्यांनी कल्पिला होता. मदनदासजींनी अशा भारताची कल्पना केली जिथे स्वयंपूर्णता हे केवळ एक ध्येय नसेल, तर प्रत्येक नागरिकासाठी एक जीवंत वास्तव असेल, जिथे परस्परांप्रती आदर, सक्षमीकरण आणि सामायिक समृद्धी या तत्त्वांवर आधारित समाज असेल. आता भारत विविध क्षेत्रांमध्ये अधिकाधिक स्वयंपूर्ण होत असताना, त्यांच्यापेक्षा अधिक आनंदी दुसरे कुणीही नसेल.

आज आपली लोकशाही चैतन्यशील आहे, युवकांमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे, समाजपुढे बघणारा आहे आणि देश आता आशा आणि आशावादाने भारलेले असताना मदनदासदेवीजी यांच्यासारख्या लोकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरेल, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी समर्पित केले.

नरेंद्र मोदी
मा. पंतप्रधान


अग्रलेख
जरुर वाचा
कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121