बरी स्नानसंध्या...

    30-Aug-2023   
Total Views |
article on Importance of pilgrimage and bathing there


स्नानाने माणसाचे शरीर व मन शुद्ध होते. यासाठी हिंदू धर्मात स्नानाला महत्त्व दिले आहे. तीर्थयात्रेचे पुण्य पदरात पाडून घ्यायचे तर तीर्थस्नान अवश्य करावे, असे सांगितले आहे.

मनाच्या श्लोकांचा उद्देश ’राघवाचा पंथ’ अर्थात भक्तिपंथ विशद करण्याचा आहे, हे स्वामींनी मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकात सांगून टाकले आणि शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. ‘राघवाच्या पंथा’ची वाटचाल मनाच्या आधारे करायची असते. त्यासाठी मनाच्या स्वभावाचे विविध पैलू माहीत असणे जरूरीचे आहे. मनाच्या स्वभावातील विविधता समर्थ श्लोकांतून उलगडून सांगत आहेत. तथापि हे करीत असताना त्यांचे लक्ष राघवाच्या भक्तिपंथाकडे व त्यातून साधायच्या भक्तांच्या आत्मोद्धाराकडे, कल्याणाकडे आहे. मनाचा विचार करताना हे लक्षात येते की, मन हे दृश्य इंद्रियांपैकी एक नाही, मन हे अद्भुत रसायन असून कल्पनारूपे वावरणारे ते तत्त्व आहे. ते मानवी जीवनावर, मानवी व्यवहारांवर परिणाम घडवून आणते. याची अनुभूती सर्वांना असते. त्यामुळे ’मन’ या कल्पनेचा स्वतंत्रपणे विचार करता येतो. आधुनिक काळात, त्यावर मानसशास्त्र, मानव वर्तणूकशास्त्र अशी शास्त्रे निर्माण झाली.
 
विद्वानांनी त्यावर आपापल्या उपपत्ती मांडल्या. या विषयांचा अभ्यास विद्यापीठीय पातळीवर केला जातो. तथापि ३५०-४०० वर्षांपूर्वी समर्थांच्या काळी अशा विद्यापीठीय अभ्यासाच्या सोयी असणे शक्य नव्हते. अशा काळात समर्थांनी आपल्या स्वतंत्र विचारांच्या व प्रतिभेच्या बळावर, बुद्धिकौशल्यावर मनाच्या सवयी व कार्यपद्धती उलगडण्याचा प्रयत्न केला आहे, हे मनाच्या श्लोकांत दिसते.स्वैरपणा हा मनाचा विशेष असल्याने ते सतत अखंड कल्पनांच्या मागे धावत असते. क्षणभरही ते स्वस्थ राहात नाही. त्यामुळे ते प्रपंचात अनेक ताप संताप निर्माण करते. माणसाला आनंद, दु:ख, नैराश्य, द्वेष, मत्सर असे अनुभव देऊन अस्वस्थ करते. अध्यात्मसाधनेतही मनाची ढवळाढवळ चालू असते. अध्यात्मात आवश्यक असलेल्या एकाग्रतेचा भंग मन करते व साधकाला आपल्यामागे धावायला लावून अध्यात्मसाधनेत व्यत्यय निर्माण करते. पण, याच मनाला योग्य वळण दिले, तर ते सर्व ठिकाणी साहाय्यभूत होते, माणसाला नवी दिशा देते, ऊर्जा देते.

समर्थांनी या स्वैर मनाचा धिक्कार केला नाही, उलट कधी मनाला ‘सज्जन’ संबोधून, तर कधी विवेकाच्या साहाय्याने चुचकारून त्याला कसे अनुकूल करून घ्यावे, हे स्वामींनी सांगितले आहे. कारण, मनाच्या सामर्थ्याची त्यांना जाण असावी. स्वैर मनाला शिस्त लावली, तर त्याचे अनुकूल परिणाम अनुभवता येतील, असा समर्थांचा कयास आहे. स्वामींनी मागील श्लोक क्र. १०५ मध्ये मनाला वळण लावण्यासाठी सांगितले आहे की, हे मना, तू बोलल्याप्रमाणे कृती कर (बोलण्यासारिखे चाल बापा), बोलण्यात आणि वागण्यात अंतर नसावे, एवढा साधा नियम पाळला तरी मनाचा स्वैरपणा कमी होईल. कृतीत आणणे शक्य आहे, तेवढेच बोलण्याचा प्रयत्न मन करेल. त्याची वायफळ बडबड कमी होईल. चौखूर धावणार्‍या अश्वाला लगामाने संयम व शिस्त शिकवली, तर त्याला योग्य गतीने व दिशेने नेणे शक्य होईल. तद्वत मनरूपी वारुला चुचकारून प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडील समस्या दूर करता येतील. त्यासाठी जीवनपद्धतीत योग्य तो बदल करावा लागेल. समर्थ त्यांच्या काळाला अनुसरून मनाला वळण लावण्यासाठी कशी जीवनपद्धती अवलंबावी, हे पुढील श्लोकात सांगत आहेत-
 
 
बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा।
विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा।
दया सर्व भूतीं जया मानवाला।
सदा प्रेमळु भक्तिभावें निवाला ॥१०६॥
 
 
सुमारे ४०० वर्षांपूर्वी जी हिंदू धर्मातील आचार पद्धती समाजात रूढ होती, त्याला अनुसरून समर्थ या श्लोकात मनासाठी काही शिस्त लावणार्‍या क्रिया सांगत आहेत. त्यात सर्वप्रथम एकनिष्ठेने करायच्या स्नानसंध्येचा ते उल्लेख करतात, याचा विचार आपण तारतम्य बाळगून शांतपणे केला पाहिजे. त्या ओळीतील भावार्थ आपण समजून घेतला पाहिजे. उगीच ‘स्नानसंध्या’ या शब्दावरून समर्थ ब्राह्मणी आचाराची तरफदारी करीत आहेत,असा आरोप करण्याची घाई करू नये. समर्थांनी केलेला उपदेश हा ज्ञानी भक्ती सांगणारा तर आहेच. परंतु, भक्ताच्या व्यक्तिमत्वाची काळजी घेणारा आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असाल तरी माणसाने तडफदार आचारविचार ठेवावेत, असे समर्थांना वाटते. आता स्नानसंध्या म्हणजे काय ते पाहू. स्नानाने माणसाचे शरीर व मन शुद्ध होते. यासाठी हिंदू धर्मात स्नानाला महत्त्व दिले आहे.
 
तीर्थयात्रेचे पुण्य पदरात पाडून घ्यायचे तर तीर्थस्नान अवश्य करावे, असे सांगितले आहे. संध्या ही सूर्याची, हिरण्यगर्भाची अर्थात तेजाची उपासना आहे. उपास्य दैवताचे थोडेतरी गुण उपासकात उतरतात. तेव्हा संध्येचा उद्देश तेजोपासनेतून माणूस तेजस्वी होईल, असा आहे. समाजात या बाह्योपचारची जरूरी असते. पण, हे एकनिष्ठेने केले पाहिजे, अशी हिंदू धर्मशास्त्राची धारणा आहे. पण ते काही अंतिम ध्येय नव्हे, म्हणून स्वामी ‘बरी स्नानसंध्या’ असा शब्दप्रयोग करतात. सध्याच्या काळात माणसाची जीवनशैली खूप बदलली आहे. जगण्यासाठी धडपड, धावपळ वाढली आहे. सकाळी मिनिटामिनिटाचा हिशेब ठेवत लोकल, बस इत्यादीबरोबर आपली गतिमानता जुळवून घ्यावी लागते. मग स्नानसंध्या हे आचार सांभाळायचे कसे, असा प्रश्न पडतो. तथापि स्वामींच्या सांगण्या-मागील हेतू पाहणे महत्त्वाचे. मूळ उद्देश मनाला शिस्त लावण्याचा आहे.
 
 बाह्य आचार पद्धतीत सारखे बदल घडत असतात. आजची आचार पद्धती २० वर्षांपूर्वी नव्हती आणि आणखी २० वर्षांनंतर याहून वेगळी आचार पद्धती असणार आहे. आचार पद्धतीतील बदल स्वीकारून मनाची शिस्त, मनाचे पावित्र्य, तेज हा मूळ उद्देश कायम राखता येतो, असे स्वामींना सांगायचे आहे. स्थानभ्रष्ट मन विवेकाने आवरून मूळ ठिकाणी आणता येते. मनाला फक्त शिस्त लावून, आवरून चालायचे नाही, तर त्याला भक्तीकडे वळवायचे आहे. कारण, समाधान, संतोष हे राघवाच्या पंथाचे अंतिम साध्य आहे. त्यासाठी सर्व भूतमात्रावर, दया, प्रेम करून सर्वकाळी प्रेमळ भक्त शांत झाला आहे. असे झाले तर शांती, समाधान हाताशी येऊन भक्ताचे चित्त समाधान पावेल. त्यासाठी काय पथ्ये पाळायची हा पुढील श्लोकाचा विषय आहे. (क्रमश:)
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..