‘जिहाद’चा नवा अवतार : ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर!

    18-Jun-2023
Total Views | 91
Game Jihad

ऑनलाईन धर्मांतरणाचा सूत्रधार शाहनवाज खान गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतीलच. ‘लव्ह जिहाद’ व ‘लँण्ड जिहाद’ पेक्षाही ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतरण अधिक घातक आहे. हे रॅकेट थेट तुमच्या घरात घुसणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा.


उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद. येथे नुकतेच एक ऑनलाईन धर्मांतरण प्रकरण उघडीस आले आहे. किशोरवयीन व अल्पवयीन मुलांना गेमिंगअ‍ॅपद्वारे ऑनलाईन व्हिडिओ गेमची सवय लावून, नंतर चॅटिंगवरून त्या मुलांना जिंकण्यासाठी कुराणातील कलमे, पठण, नमाज पठण करावयास लावणे व नंतर ब्रेनवॉश करून त्या मुलांचे धर्मांतर करण्याचे उद्योग गेल्या तीन ते चार वर्षांपासून चालू आहेत. नुकताच इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या एका हिंदू मुलाचे व त्याच्या मित्राचे ऑनलाईन गेमिंग व चॅटिंगच्या माध्यमातून धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका मशिदीचा मौलवी अब्दुल रहमान यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणाचा सूत्रधार महाराष्ट्रातील मुंबई जवळील मुंब्रा येथील शाहनवाज खान उर्फ बद्दो असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएस पोलिसांचे एक पथक मुंबई जवळील मुंब्रा येथे गेले होते. दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मुख्य सूत्रधार शाहनवाज खान उर्फ बद्दो यास ‘एटीएस’च्या विशेष पथकाने रविवार, दि. ११ जून रोजी मुंबई पोलिसांच्या मदतीने अलिबाग येथे अटक केली आहे.

शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो (वय २३ रा. मुंब्रा-जिल्हा ठाणे) याने ’एपिक गेम्स’ हे अमेरिकन गेमिंगअ‍ॅप आपल्या संकेतस्थळावर सुरू केले होते. त्यावर अल्पवयीन व किशोरवयीन हिंदू मुलांना गेम खेळण्याचे व्यसन लावले जायचे. सतत हरणार्‍या मुलांना जिंकण्यासाठी कुराणातील आयाती पठण करायला व नमाज पठण करायला लावले जायचे. त्यानंतर, भारतातून फरार होऊन तुर्कीस्तानात राहिलेल्या जाकिर नाईक याचे व्हिडिओ दाखवून तसेच, पाकिस्तानातील युट्यूबवरील कट्टरपंथी विचाराचे ’युथ क्लब पीके’ हे चॅनेल दाखवून त्या मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जायचे, असा हा ’गेमिंग जिहाद’चा प्रकार आहे. गाझियाबाद शहरातील कवी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजनगर येथे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा १७ वर्षीय मुलगा राजू (काल्पनिक नाव) यास सुमारे दीड वर्षांपूर्वी मोबाईलवर ’एपिक गेम्स’ हे गेमिंगअ‍ॅप दिसले. ते गेमिंग त्याने इन्स्टॉल करून घेतले. त्या गेमिंगअ‍ॅपमध्ये बॅटल (युद्ध), टास्क, स्विमिंग व स्पोर्ट्स हे जुगार सदृश गेम होते. ऑनलाईन पैसे भरून गेम खेळायचा व गेम योग्य पद्धतीने पूर्ण केला, तर काही पटीने पैसे परत मिळायचे. सुरुवातीला काही दिवल गेम राजू जिंकला व त्याला पैसेही मिळाले. नंतर मात्र, तो गेम हारत गेला.


जिंकण्याच्या आशेने तो अधून-मधून गेम खेळत राहायचा. तो सतत गेम हारू लागल्यावर एके दिवशी व्हॉट्सअ‍ॅप व इंन्स्टाग्राम या चॅटिंगअ‍ॅपवरून बद्दो नावाच्या तरुणाने हिंदू पद्धतीचे स्टेटस टाकून त्याच्याशी संपर्क साधला. कुराणातील आयती रोज पठण करून अल्लाहकडे दुवा मागितल्यास तू गेम जिंकत जाशील. मला एकाने सांगितले, म्हणून मी कुराणातील आयती पठण करू लागलो व नमाज पठण करू लागलो. तेव्हापासून मी सतत गेम जिंकत आहे, तू सुद्धा प्रयत्न करून पहा, असे त्या बद्दोने सांगितले. इतकेच नव्हे, तर त्याने कुराणातील काही आयाती हिंदी लिपीतून राजूला मोबाईलवरून पाठविली. त्यावर विश्वास ठेवून राजू घरातील कोणालाही न कळू देता गुपचूप ती आयाती रोज सकाळी पठण करू लागला. हे पाहून बद्दो नावाचा तरुण त्याला गेम खेळताना मुद्दाम जिंकू देत होता. कारण, गेमिंगअ‍ॅप तोच चालवीत होता. कुराणातील आयती पठण करू लागल्यापासून आपण ऑनलाईन खेळात रोज जिंकतो आहोत, हे पाहिल्यावर मूर्ख राजूचा कुराणावरील विश्वास वाढला. अधूनमधून बद्दो त्याच्याशी मोबाईलवरून फोन करू लागला. गेल्यावर्षी एके दिवशी बद्दोने राजूला नमाज पठणासाठी त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका मशिदीत जाऊन नन्नी नावाच्या मौलवीस भेटण्यास सांगितले. नन्नी हा बद्दोचाच हस्तक होता. त्यानुसार राजू संजय नगरमधील एका मशिदीत गेला व तेथे नन्नीला भेटला व त्याला बद्दोचा संदर्भ देऊन नमाज शिकवण्याची विनंती केली.


नन्नीने त्याला नमाज पठण करण्यास शिकविले. त्यानंतर राजू रोज सकाळी व्यायामासाठी जिमला जातो, असे सांगून घरातून निघून संजयनगर भागातील त्या मशिदीत नमाज पठणासाठी जाऊ लागला. विशेष म्हणजे राजूचा एक जैन समाजातील मित्रसुद्धा गेमिंगअ‍ॅपच्या नादी लागून त्याच मशिदीत नमाजासाठी त्याच्या आधीपासूनच येत होता.राजूच्या वागण्यातील विचित्र बदल त्याच्या आई-वडिलांच्या फार उशिरा लक्षात आला. गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून व्यायामासाठी जिमला जाण्याचे निमित्त करून राजू घरातून बाहेर पडला. तो घरातून बाहेर पडताच त्याच्या वडिलांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा तो संजयनगर भागातील एका मशिदीत जाताना दिसला. सुमारे अर्ध्या पाऊण तासानंतर राजू मशिदीतून बाहेर पडला व घरी गेला. घरी गेल्यावर वडिलांनी त्याला थेट विचारले, मी मगाशी तुला मशिदीत जाताना पाहिले होते. जिममध्ये जातो, असे खोटे सांगून तू मशिदीत का गेलास? असा प्रश्न वडिलांनी केल्यावर राजूने स्पष्टच सांगितले की, मी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे व रोज सकाळी मशिदीत नमाज पठणासाठी जात असतो. माझ्या एका जैन मित्रानेसुद्धा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, असे सांगून राजूने ऑनलाईन गेमिंग़अ‍ॅप प्रकरण आई-वडिलांना सांगून टाकले. आई-वडिलांनी त्याला खूप समजावून सांगितले, तरीही त्याने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. हिंदू धर्मातील मुला-मुलींना मुस्लीम धर्म स्वीकारायला लावून त्यांना मुस्लीम राष्ट्रात पाठवून अतिरेकी संघटनेत भरती केल्याबाबतच्या बातम्या राजूच्या आई-वडिलांच्या वाचण्यात व ऐकण्यात आलेल्या होत्या. आपल्या मुलाबाबत ही तसेच, होऊ शकेल या विचाराने ते खूप अस्वस्थ झाले.

पोलीस ठाण्यात फिर्याद दिली


काही दिवसानंतर पत्नीशी सल्ला मसलत केल्यानंतर दि. ३० मे रोजी राजूच्या वडिलांनी कवी नगर पोलीस ठाण्यात जाऊन, मुलाला व त्याच्या एका जैन मित्राला गेमिंगअ‍ॅपद्वारे नादी लावून धर्मांतर करायला लावल्याबद्दल बद्दो व नन्नी या दोघांविरूद्ध फिर्याद दिली. त्या फिर्यादीनुसार कवी नगर पोलीस ठाण्यात त्या दोघांविरूद्ध उत्तर प्रदेशच्या धर्मांतर बंदी कायदा ‘२०२१ अन्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यावर संजयनगर भागातील मशिदीतील मौलवी व मशिदीचा माजी विश्वस्त अब्दुल रहमान उर्फ नन्नी यास पोलिसांनी चौकशी करून अटक केली. पोलिसांसमोर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, या ऑनलाईन गेम्सद्वारे धर्मांतर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो (वय २३ रा. मुंब्रा जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र) हा असल्याचेही अब्दुल रहमानने सांगितले. अब्दुल रहमानच्या भावाचे सायबर कॅफे असून ते ‘सायबर कॅफे‘ अब्दुल रहमान हाच चालवत होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्या ‘सायबर कॅफे’तील कॉम्प्युटर्स जप्त केले असून, ते कॉम्प्युटर्स अधिक तपासासाठी ‘सायबर क्राईम’ ब्रँचकडे देण्यात आले आहेत. राजूचा २१वर्षीय जैन मित्र व त्याच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. या दोन मुलांशिवाय अन्य दोन किशोरवयीन हिंदू मुलांचेही अशाच प्रकारे धर्मांतर केले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यातील एक फरीदाबादचा असून, दुसरा लुधियाना (पंजाब) येथील आहे. पोलिसांनी त्या चौघाही मुलांकडे चौकशी करून त्यांचे मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत. त्या मोबाईल व लॅपटॉपमध्ये कुराणातील आयाते, नमाज पठणाची माहिती देणारे व्हिडिओ, इस्लाम धर्माचा इतिहास व मोहम्मद पैगंबर यांची माहिती, असे इस्लामिक साहित्य आढळून आले आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी कोरोनाची साथ पसरल्यावर देशभर टाळेबंदी लावण्यात आली होती. त्या काळात देशभरातील घरात बसून राहिलेली लहान-मोठी मंडळी वेळ घालविण्यासाठी मोबाईल व लॅपटॉपमध्ये अधिक गुंतून पडली होती. त्याच काळात अल्पवयीन मुलांचे ऑनलाईन गेमिंगअ‍ॅपवरून धर्मांतर करण्याचे प्रकार सुरू झाले, असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच, टाळेबंदी संपल्यानंतर धर्मांतरित मुले प्रत्यक्ष मशिदीत जाऊन नमाज पठण करण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही समजले.

‘एनआयए’ व ‘सीआयबी’कडे तपास


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास प्रारंभी ‘दहशतवाद प्रतिबंधक पथका’कडे सोपविला होता. दि. १ जून रोजी हे पथक महाराष्ट्रातील मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दाखल झाले. उत्तर प्रदेशातील एटीएस पोलीस पथक मुंब्रातील शाहनवाज खान याच्या घरी गेले, तेव्हा तो बेपत्ता असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या घरच्यांचा जबाब घेतला व त्याच्या घरातून काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, शाहनवाजच्या बँकेतील खात्याची माहिती घेतली असता, गेल्या तीन ते चार वर्षांत शाहनवाजच्या बँक खात्यावर भारताच्या विविध भागातून बरीच रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आहे. फक्त बारावी उत्तीर्ण असलेला शाहनवाज हा सर्व प्रकारचे गेमिंग खेळण्यात एक्सपर्ट असल्याचे समजले. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ऑनलाईन ’गेमिंग जिहाद’ प्रकरणाचे धागेद्वारे महाराष्ट्र, गुजरात ते थेट पाकिस्तान व दुबईपर्यंत पोहोचले, असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाल्यावर योगी सरकारच्या शिफारशीवरून मोदी सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस पथकाच्या मदतीला ‘एनआयए’ व ‘सीआयबी’.(केंद्रीय गुप्तचर विभाग) यांच्या पथकालाही पाचारण केले. या प्रकरणात धर्मांतरासाठी थेट दुबई येथून आर्थिक मदत होत होती, असेही तपासात आढळून आले आहे. आरोपी शाहनवाज खान हा भारताबाहेर पळून जाऊ नये, म्हणून त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस ही जारी करण्यात आली होती.
 
दरम्यान, मुंब्रा येथे आरोपी शाहनवाज खान याच्या तपासासाठी गेलेले ‘एटीएस’चे पथक ठाण्यातच ठाण मांडून बसले होते. मुंबई पोलिसांच्या मदतीने ते ठाणे जिल्ह्यात व मुंबई परिसरात आरोपी शाहनवाज याचा शोध येत होते. परंतु, तो सतत मुक्कामाच्या जागा बदलायचा व मोबाईलमधील सीमकार्ड बदलायचा, त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर रविवार, दि. ११ जून रोजी विशेष पथकाने मुंबई पोलिसांच्या मदतीने अलिबाग येथील एका लॉजवर छापा घालून मुख्य आरोपी शाहनवाज खान यास मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी शाहनवाज यास दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार, दि.१२ जून रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयात ट्रांन्झिट रिमांडसाठी उभे करण्यात आले, न्यायाधीशांनी त्यास ७२ तासांचा ‘ट्रांन्झिट रिमांड’ मंजूर केला. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी आरोपी शाहनवाज याला गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. कमालीची गुप्तता पाळून गाझियाबादचे पोलीस पथक शाहनवाज यास घेऊन त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळच्या विमानाने गाझियाबादकडे रवाना झाले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस पथक आरोपी शाहनवाज खान यास घेऊन गाझियाबाद येथे पोहोचले. या रॅकेटमध्ये आणखी किती लोक आहेत? आतापर्यंत देशभरातील किती हिंदूंचे धर्मांतरण केले आहे? देशभरातून व देशाबाहेरून कोणी आर्थिक मदत दिली? शाहनवाज हाच या प्रकरणाचा सूत्रधार आहे की, त्यावर आणखी कोणी मोठा सूत्रदार आहे? काही धर्मांतरीत हिंदूंना एखाद्या मुस्लीम देशात पाठवले आहे काय? इत्यादी माहिती शाहनवाजकडून लवकरच मिळेल.
 
 
जितुद्दीनभाई आव्हाडांचा थयथयाट


जितुद्दीनभाई उर्फ जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा निवडून आले आहेत. त्यातील मुंब्रा भागात मुस्लिमांचे, तर कळवा भागात आगरी-कोळी समाजाचे प्राबल्य आहे. म्हणूनच मुस्लिमांच्या गठ्ठा मतांसाठी लाचार असलेले जितेंद्र आव्हाड सातत्याने हिंदू विरोधी व मुस्लिमांना खूश करणारी भूमिका घेत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाझियाबाद पोलिसांच्या विरोधात फक्त जितुद्दीनभाई आव्हाड यांनीच बोंबाबोंब सुरू केली आहे. त्यांचे हे वर्तन धर्मांधांच्या धर्मांतराच्या कुटील कारवायांना बळ देणारे व हिंदू घातकी आहे .आता या ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचा सूत्रधार शहानवाज खान हा आता गाझियाबाद पोलिसांच्या ताब्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतील, यात काहीच शंका नाही. चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी होती. या ऑनलाईन गेमिंगअ‍ॅपद्वारे धर्मांतरण प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मांतर झालेल्या मुलांना मुस्लीम पद्धतीचे नाव न देता त्यांचे आहे तेच नाव चालू ठेवले जायचे.

इतकेच नव्हे, तर धर्मांतरित हिंदूंची ’सुंता’सुद्धा केली जायची नाही. फक्त त्यांना कुराण पठण, नमाज पठण करायला लावणे, हिंदू धर्माची वाईट बाजू व मुस्लीम धर्माची चांगली बाजू सांगणे, इस्लाम धर्माचा इतिहास सांगणे, असे करून त्यांना मानसिकरित्या पूर्णपणे मुस्लीम केले जायचे. त्यामुळे एखाद्या मुलाने धर्मांतर केले आहे, हे त्याच्या मित्रांना व घरातील लोकांनासुद्धा लवकर समजत नव्हते.हिंदूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ’लव्ह जिहाद’ व ’लँण्ड जिहाद’ या यापेक्षा हे ऑनलाईन गेमिंगअ‍ॅपद्वारे धर्मांतरण प्रकरण अधिक घातक आहे. तुमच्या घराची दारं, खिडक्या बंद असली, तरीही हे धर्मांतराचे रॅकेट थेट तुमच्या घरात घुसणार आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा व तुमच्या मुलांना सट्टेबादीचे व्हिडिओ गेम्स खेळण्यापासून परावृत्त करा. अन्यथा तुमच्या नकळत तुमच्या मुलांचेही घर बसल्या धर्मांतर होईल एवढे मात्र निश्चित!

 
- डी.डी. कुलकर्णी



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121