सौदी अरेबियाचा नियम...

    24-May-2023   
Total Views |
The Kingdom of Saudi Arabia introduces new work visa

सौदी अरेबियामध्ये एक नुकताच नवीन नियम पारित झाला. त्यानुसार सौदीमध्ये कामगार व्हिसा मिळण्यासाठी वयाची अट निर्देशित करण्यात आली आहे. त्यानुसार घरेलु कामगार महिलांसाठी काही नियम केले आहेत. अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा महिलांना घरेलु कामगार म्हणून काम करण्यासाठी वयाची अट २४ वर्षे निश्चित केली आहे.

हा नियम करण्याची गरज का वाटावी? काही लोकांचे म्हणणे आहे की, अल्पवयीन मुलीसुद्धा खोटे दाखले देत सौदीमध्ये कामाला पाठवण्याचे काम काही समाजकंटक करत असतात. घरकाम किंवा इतर कष्टाची कामे ते अगदी देहविक्रीच्या धंद्यातही त्यांना लोटले जाते. या मुलींचे शोषण होते. त्यामुळे घरकामाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना सौदीमध्ये आणण्याची कायदेशीर वाट बंद व्हावी म्हणून हा कायदा पारित झाला असावा. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, कायदा तिथे पळवाटा काढणारे जास्तच हुशार असतात. त्यामुळे २४ वर्षांखालील घटस्फोटित, विधवा, अविवाहित महिलेचे लग्न झाले असून, तिचे कुटुंब आहे, असे खोटे पुरावे निर्माण करण्याचे उद्योग होणार. त्यामुळे या नियमाचा काही फरक पडणार नाही, तर काही लोकांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

 त्यांच्या मते, २४ वर्षांवरील महिला घटस्फोटित आहे की विधवा की अविवाहित आहे, याचा पद्धतशीर दस्तावेज सौदी अरेबिया प्रशासनाकडे जाणार आहे. या माहितीचा उपयोग सौदी सरकार करेल न करेल, पण तिथेही शोषणासाठी चटावलेले नराधम असतीलच. कोणती महिला एकटी आहे याची माहिती घेऊन त्या महिलेसोबत काही वेडेवाकडे करण्याचे नियोजन करणारेही असतीलच असतील. असो, सौदी सरकारच्या मते, घरेलु कामगार महिलेला एकटी आहे, असे पाहून सौदी अरेबियामध्ये कुणीही काहीही त्रास देऊ नये, म्हणून हे सगळे आहे. तसेच, वयोमर्यादा २४ वयवर्षे केल्यामुळे अल्पवयीन एकट्या मुली सौदीत घरेलु कामगार म्हणून येऊ शकणार नाही.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. नव्हे नव्हे अनेक आयाम असतात. तसे पाहायला गेले, तर सौदी किंवा कुवेतमध्ये मुलगा कामाला आहे किंवा अगदी मुलीही कामाला आहेत, हे सांगण्यात धन्यता माननारे अनेक जण आजूबाजूला दिसत असतात. दक्षिण भारतात तर हे पेव जास्तच आहे. त्यातही मुस्लीम समाजातील लोकांना सौदी आणि इतर मुस्लीम देशांमध्ये कामाला जाणे आवडत असते. (अपवाद आहेत). कारण, डोळ्यांसमोर चित्र रंगवलेले असते की तो देश आपल्या कौमच्या अधिपत्याखालचा देश आहे. तिथे केवळ नबीने दिलेल्या आदेशानुसारच सगळे चालले आहे. दुसरे असे की, तिथे काम केले, तर भरपूर पैसे मिळणार. सगळ्यात महत्त्वाचे तिथे सगळे आपल्या कोमवाले म्हणजे आपल्याच मुस्लीम धर्माचे असल्याने आपल्याला कसलाही त्रास होणार नाही. याच विचारातून अनेक जण सौदी अरेबियामध्ये कोणत्याही प्रकारचे काम मिळाले, तर काम करण्यास उत्सुक असतात.

अदगी सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशियन ते प्लंबरसुद्धा. पण, या कामगारांना, या मजदूरांना खरेच का तिथे गेल्यावर त्यांच्या स्वप्नातला स्वर्ग मिळतो? खरेच का त्यांच्या सगळ्या विवंचना संपतात? गेल्या काही वर्षांपासून याबाबत अनेक नकारात्मक घटना उघड झाल्या आहेत.चांगल्या वेतनश्रेणीचे काम मिळवून देतो, म्हणत कित्येक जणांना अतिशय कष्टाचे कसलीच सुविधा नसलेले कमी पगाराचे काम दिले गेले आहे. पण, परदेशामध्ये तेही सौदीमध्ये दाद कुणाकडे मागावी याची माहिती नसते. ते मजदूर ‘आलीया भोगासी’ म्हणत आलेल्या परिस्थितीला शरण जातात. काही वर्षांपूर्वी सौदीमध्ये ‘कापला’ नावाचा कायदा होता.

त्यानुसार तिथे गेलेल्या परदेशी मजूदर किंवा कामगाराला त्याच्या सौदीमधल्या मालकाच्या परवानगीशिवाय काम सोडू शकत नव्हता, राहता परिसर सोडू शकत नव्हता. देश तर लांबचीच गोष्ट. इतकेच काय? मजदूराचा व्हिसाही त्याच्या मालकाकडेच असायचा. त्यामुळे मजदूर त्याच्या मालकाला सोडून जाऊच शकत नसे. मजदुराच्या या लाचारीचा गैरफायदा घेत मालक त्याचे शोषण करणार नाही, असे होतच नसे. जगभरातून दबाव आल्यानंतर २०२१ साली हा ‘कापला’ कायदा सौदी अरेबियाने रद्द केला. या पार्श्वभूमीवर सौदीमध्ये कार्यान्वित होणार्‍या घरेलु कामगार महिलांसाठीचे वयाचे निर्बंध काही वेगळे संकेत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.