
‘ग्लोबल मार्च टू गाझा’ रद्द होणार असे या मार्चच्या आयोजकांनी दि. १६ जून रोजी जाहीर केले. जगभरातल्या गाझा समर्थकांनीच नव्हे, तर अगदी आपल्या महाराष्ट्रामध्येही ‘ग्लोबल मार्च टू गाझा’चे गोडवे गाणारे लेख वगैरे प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. हा मार्च म्हणजे गाझाचा मुक्तिदाताच आहे, असे स्वतःच ठरवत काहींनी लिहिले की, ‘ग्लोबल मार्च टू गाझा’मध्ये सामील झालेल्या लोकांच्या हातात इस्रायल आणि अमेरिकेविरोधात बॅनर्स आहेत. आता इस्रायलचे काही खरे नाही. लाखो गाझा समर्थक या मार्चमध्ये सामील झाले. हे सर्व लोक इस्रायलची गाझावरची घेराबंदी तोडून गाझामध्ये जातील वगैरे वगैरे. पण, इजिप्त या इस्लामिक राष्ट्रातच या ‘ग्लोबल मार्च टू गाझा’ला सद्गती प्राप्त झाल्याचे दिसते.
‘ग्लोबल मार्च टू ग़ाझा’चा उद्देश काय होता, हे पाहू. या मार्चच्या आयोजकांनी मार्चचे पाच प्रमुख उद्देश जाहीर केले होते. १) गाझामधली भूकबळी समाप्त करणे; २) गाझावासीयांना मदत सुविधा पोहोचविणारे हजारो ट्रक राफा सीमेवर इस्रायलने अडवले आहेत, त्यांना मुक्त करणे; ३) गाझावासीय संदर्भात सुरक्षित आणि सुरक्षित मानवीय मार्ग प्रस्थापित करणे; ४) इस्रायलची युद्ध अपराधी वृत्ती जगासमोर आणणे; ५) संबंधित पीडितांना म्हणजेच गाझावासीयांना न्यायाच्या कक्षेत आणणे, तर या आयोजकांच्या मते, ८० देशांचे लाखोे नागरिक ज्यामध्ये पत्रकार, डॉक्टर, वकील, साहित्यिक, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी वगैरे सहभागी होणार होते. प्रत्यक्षात काही देशांतले काही हजार लोकंच यात सामील झाले होते. अर्थात, आयोजकांना लाखो लोक सहभागी होतील, असे वाटण्याचे कारणही होते म्हणा. कारण, ‘हमास’ने इस्रायलवर क्रूर हल्ला केल्यानंतर इस्रायलनेहीप्रहार केला होता. मात्र, ‘हमास’ दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याबाबत दुर्लक्षाची भूमिका घेणार्या काही संघटना आणि लोक हे चवताळून उठले. त्यांना मानवतावाद वगैरे लगेचच आठवायला लागला. मानवतेच्या शांतीची ग्वाही देत, या गाझा समर्थकांनी जगभरात हैदोस घातला. या समर्थकांनी हिंसा केली किंवा लोकांना पॅलेस्टाईन मुक्तीच्या नावाने वेठीस धरले, तरीसुद्धा या समर्थकांच्या विरोधात मत व्यक्त करायला लोकांना दडपण यायचे. कारण, यांना विरोध केला, तर मग विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता वगैरे म्हणून मोक्याच्या जागी बसलेले गाझा समर्थक या विरोधकांना हिटलर, नाझी, मानवताविरोधी, गाझावासीयांचे खुनी वगैरे म्हणून जेरीस आणायचे. गाझामध्ये लहान लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध इस्रायलमुळे मरत आहेत, याचे दाखले द्यायचे. मात्र, पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे हे लोक जगाला कधीही समजावू शकले नाहीत की, गाझामध्ये अन्नटंचाई झाली, सोईसुविधांची वानवा झाली. लोकांना जगणे मुश्किल झाले. मात्र, इस्रायलवर हल्ला करण्यासाठी गाझातल्या दहशतवाद्यांची शस्त्र कधीच संपली नाहीत.
असो. तर ट्युनिशियाच्या नेतृत्वामध्ये हा ‘ग्लोबल मार्च टू गाझा’ लेबेनॉन आणि पुढे इजिप्तच्या राफामधून गाझामध्ये जाणार होता. याला ‘सुमुद काफिला’ हे नाव दिले होते. हा अरबी शब्द होता, याचा अर्थ आहे ‘दृढता.’ मात्र, या मार्चला लीबिया आणि पुढे इजिप्तमध्येही पूर्णता मज्जाव करण्यात आला. इजिप्त सरकारने या आंदोलकाची धरपकड केली. त्यांच्यावर कारवाई केली. गाझावासीयांसाठी दृढता म्हणून एकत्र आलेले हे गाझा समर्थक सैरभैर झाले. तसेच, आंदोलकांनी इजिप्तमध्ये धरणे धरले होते. मात्र, इजिप्तमधली नागरिक अगदी किशोरवयीन मुलंही या आंदोलकांना हुसकून लावत होते. हे होणारच होते. कारण, गाझावासीयांनी इजिप्तमध्ये आसरा घेऊ नये, यासाठी इजिप्त नेहमीच सावध होता. आताही या मार्चच्या निमित्ताने गाझापट्टीची सीमा मोकळी झाली, तर तिथून गाझापट्टीतले लोक इजिप्तमध्ये घुसतील, याची इजिप्तलाही पूर्ण कल्पना होते. तसेच, या मार्चला बंदी करणे ही इजिप्तची भूमिका काही इस्रायलचे समर्थन करण्यासाठी नाही, तर ‘भय बीन होये ना प्रित!’ पॅलेस्टाईन, सीरिया, लेबेनॉन आणि सध्या इराणच्या बाबतीत काय होत आहे, हे स्पष्ट आहे. इराणनंतर आपला नंबर लागू नये, याची काळजी इजिप्तने घेतली असावी असे दिसते.