संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करा – हिंदू पक्षाची भूमिका

वाराणसी जिल्हा न्यायालयाने याचिका स्विकारली, २२ रोजी सुनावणी

    17-May-2023
Total Views |
Gyanvapi Complex

नवी दिल्ली : संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षातर्फे वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिका स्विकारली असून त्यावर येत्या २२ मे रोजी सुनावणी होणार आहे.

ज्ञानवापी संकुलातील कथित मशिदीच्या वजुखान्यात सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटींगसह अन्य शास्त्रीय तंत्राने तपासणी करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यास (एएसआय) दिले आहेत. त्यानंतर आता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचेच पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करणारी याचिका हिंदू पक्षातर्फे वाराणसी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका स्विकारली असून त्यावर येत्या २२ मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. यावेळी मुस्लिम पक्ष याविषयी आपला युक्तीवाद करणार आहे.

हिंदू पक्षाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अनेक शतकांपासून ज्ञानवापी येथे मंदिर अस्तित्वात असून त्यामध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग विराजमान असल्याचा हिंदूंचा विश्वास आहे. मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशानुसार १६६९ साली हे मंदिर तोडण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या खांबाचात वापर करून मशिद बांधण्यात आली आहे. येथे हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे असून न्यायालयीन आयुक्तांच्या सर्वेक्षणामध्येही ते समोर आले आहे. तेथे असलेले पुरावे न्यायालयासमोर मांडल्यावर स्थिती स्पष्ट होऊ शकते आणि या पुराव्यांची तपासण एएसआयमार्फत करता येऊ शकते. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान असलेली एएसआय ही देशातील प्रमुख संस्था असून अयोध्येतील श्रीराम मंदिरासह अन्य अनेक प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने एएसआयला दिले होते, असेही याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पुरातत्त्व सर्वेक्षणाची विनंती करणाऱ्या तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. स्वयंभू भगवान आदिविश्वेशवरांतर्फे महंत शिवप्रसाद पांडे, श्रृंगारगौरी प्रकरणातील लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक या वादी आणि तिसरी याचिका रंजना अग्निहोत्री, डॉ. राम प्रसाद सिंह, शिशिर चतुर्वेदी आणि राकेश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे.

अयोध्येप्रमाणे काशीची वाटचाल ?

संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्त्व सर्वेक्षण करम्याची विनंती करणारी हिंदू पक्षाची याचिका वाराणसी जिल्हा न्यायालयाने स्विकारली आहे. सुनावणीनंतर जर न्यायालयाने हिंदू पक्षाची मागणी मान्य करून पुरातत्त्व सर्वेक्षणाचे आदेश दिले तर काशी विश्वनाथ खटल्याचीही वाटचाल अयोध्या खटल्याप्रमाणे होण्यास प्रारंभ होणार आहे. कारण, अयोध्या खटल्यामध्ये श्रीरामजन्मभूमीचे पुरातत्त्व सर्वेक्षण निर्णायक ठरले होते. तसे झाल्यास “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है” ही घोषणा नजिकच्या भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकते.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121