कला माणसाला हसवते, रडवते, जगवते आणि आनंदाने जगायलाही शिकवते. त्यामुळेच मानवी आयुष्यात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण. बालनाट्यामध्येचेही असेच काही आहे. लहान लहान मुलेही बालनाट्य करताना खूप काही शिकतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात. विचारांत या बालनाट्यांमुळे अमुलाग्र बदल घडतो. हे झालेले बदल व त्याचे अनुभव याचे बालकलाकारांनी केलेले अनुभवकथन...
मागच्या लेखात बालकलाकारांनी व्यक्त केलेले भाषा कौशल्य, संकल्प ते सिद्धी, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हे पाच मुद्दे आपण वाचले होते. आजच्या लेखातून पुढील मुद्द्यांवर त्यांची मते स्पष्ट होणार आहेत. मागील लेखामध्ये मी जसे लिहिले होते, वेदांत ठक्कर, सर्वज्ञ आणि समीर गुमास्ते ही मुले माझ्याकडे गेली दोन ते तीन वर्षे नाट्यकला शिकायला येत आहेत आणि त्यांना नाटक करायला प्रचंड आवडते. ही गुणी मुलं नाट्यकलेचे प्रामाणिक विद्यार्थी आहेत. मी त्यांचा सर्वांगीण विकास होताना पहिला असून, या मुलांनी बर्याच नाटकांत कामही केले आहे. या तिघांनीही ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालमहानाटयात काम केले. वेदांतने प्रभू श्रीरामाचे, सर्वज्ञने एकदा रावण तर एकदा हनुमान आणि समीरने रावणाची भूमिका केली. ही तिन्ही बालकलाकार ११ ते १३ या वयोगटातले आहेत.
६. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन
वेदांत :- मी जेव्हा नाटक करतो, तेव्हा हा प्रवेश असा का आहे? आताच का आहे? ती व्यक्तिरेखा असे का बोलली असेल? मग माझ्या तोंडी अशी का वाय आहेत? याचा आधी तू सांगितला म्हणून विचार करायला लागलो. मग मी असा विचार आता सगळ्याच बाबतीत करायला लागलो आहे. माझ्या आयुष्यात काय आहे आणि का आहे याचाही विचार मी आता करतो. कधी कधी मला याची उत्तरेही सापडतात.
सर्वज्ञ :- जेव्हा मी हनुमानाची भूमिका करत होतो, तेव्हा अर्थातच त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त शक्ती आहे आणि तो सर्वांनाच आवडला. पण, जेव्हा ’तीरा’ नाटक केले, तेव्हा त्यातील माझी व्यक्तिरेखा दुबळी, असाहाय्य होती आणि ती सर्वांनीच नाकारलेली. मग विचार आला, धन्यवाद देवा! माझे आयुष्य निदान असे तरी नाही. तिचे तर आयुष्य माझ्यापेक्षा अवघड आहे. निदान माझ्याकडे मला समजून घेणारी माणसं आहेत. एखाद्याचे आयुष्य असेही असू शकते, असा विचार मला नाटकांनी करायला लावला. आपल्या तालमी दरम्यान मी हाच विचार करायचो की, हिच्या आयुष्यात हे पात्र नसते तर बरं झाले असते. आता आहेच म्हटल्यावर, मला भुमिका करत असताना काय करता येईल? लेखकाचे हेच वाय मी जरा प्रेमानी घेऊन बघितले तर? ’तीरा’चे आयुष्य सुखकर होऊ शकेल.
समीर :- आधी रामायण फक्त गोष्ट स्वरूपात माहीत होती पण, आता ते मी जगायला लागलो आहे. खरंच आयुष्य सुंदर आहे आणि प्रत्येकाला आपली भूमिका करायची आहे.
७. आध्यात्मिक विकास : आत्मबल, आत्मशोध. मी कोण आहे?
वेदांत :- मी जास्त विचार करायला लागलो आहे आणि नाटकात जसे सारे काही शय आहे, तसे आपल्या आयुष्यात होऊ शकते असे वाटायला लागले आहे. पण, मला वाटतं की, तालमीची गरज लागेल. मी नाटकात काम केले म्हणून आपण भेटलो किंवा आपल्याला भेटायचे होते, म्हणूनच मी नाटकात काम केले. मी पौराणिक कथा खूप वाचत होतो आणि मला रामाचे काम मिळाल्यानंतर कळले की, मी या कथा वाचणेसुद्धा कुठेतरी मला या भूमिकेकरिता तयार करीत होते.
सर्वज्ञ :- रॅडी, तू बघितले असशील मी डोळे बंद करून बसायचो. तू म्हणायची ना, आता डोळे बंद करून बघा की नाटकाची तालीम कशी सुरू आहे. आपले नाटक कसे सुरू आहे. जेव्हा मी तसे केले, तेव्हा एक विचार नेहमी माझ्या डोयात यायचा की, सगळे चांगलेच होणार आहे. आता मी फुटबॉल मॅच खेळताना पण असेच करतो. सगळे चांगलेच होणार हे आपण डोळ्यासमोर आणले की तसेच होते.
समीर :- मी धर्माबद्दल वाचायला लागलो. मी ब्राम्हण आहे, म्हणजे मी नेमका कोण आहे? रावणसुद्धा ब्राम्हण होता. मी खूप विचार करायला लागलो आहे आता. तो तर ज्ञानी, पंडित होता; मग मला पण व्हायला काय हरकत आहे! अर्थातच रावणासारखा कदापि नाही. त्याच्यातले काय घ्यायचे नाही, हे मी आधी शिकलो आहे.
वेदांत :- मी राम आहे म्हणून मला कधीही विशेष वागणूक मिळाली नाही. झाडू मारण्यापासून, नेपथ्य लावण्यापासून सगळे आवरून घरी जाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आता मी कुठेही गेलो की विचारतो, काही मदत करू का? आधी मला वाटायचे की मी घरी पण एवढे काम करत नाही, मग मी इथे का करू? पण, काम केल्याने छान वाटते. मी मदत केली की, सगळे करायला लागतात हे मी पाहिले आहे.
सर्वज्ञ :- इथे छोटे किंवा मोठे असे कोणीच नाही. ‘आपण सगळे कलाकार’ ही भावना सगळ्यांच्या मनात सारखीच. त्यामुळे झाडू मारायचा असेल किंवा मुलींचे दागिने आवरून द्यायचे असतील, तरी मी मदत करतोच. मला आवडते. मला तुलासुद्धा मदत करायला आवडत रॅडी.
समीर :- हो खरं आहे आणि त्या छोट्या छोट्या पाच-सहा वर्षांच्या मुली, मुलं खारुताईचे काम करतात. त्यांना एन्ट्रीसाठी उभे करायला मला खूप मज्जा येते. कुंभकर्णाच्या सीनमध्ये खायचे पदार्थ वाटायला खूप आवडत. तेवढेच स्वयंसेवक दादाताईंचे काम हलके होते.
९. लोक कौशल्य
वेदांत, सर्वज्ञ, समीर तिघांचेही एकच मत होते की, नाटक ही सांघिक कला आहे. मोठे छोटे, भेदभाव विसरून एकत्र येऊन करण्याची ही कला आहे. इथे प्रत्येकजण महत्त्वाचा. जर काही कारणास्तव एखादा तालमीला येऊ शकला नाही, तर पटकन कोणीतरी त्याचे काम करायचे आणि का नाही येऊ शकला, हेसुद्धा समजून घ्यायचे.
वेदांत :- मला चित्र काढायला अजिबात आवडायचे नाही पण, आता मी काढतो. कारण, आता मला त्यात नाटक दिसायला लागले आहे.
सर्वज्ञ :- तू जेव्हा नाटक बसवतेस ना, तेव्हा मला तुझ्या बाजूला बसून तुझ्या नजरेतून नाटक बघायला आवडते आणि मग मी डोळे बंद करून कलाकारांची जागा बदलून पाहतो. चित्र समोर आणतो, तुला विचारतोही, मग तू सांगितल्यावर पटतं. पण, रॅडी मला नेहमी वाटते, आपण नेपथ्य अजून चांगले करू शकतो. मी थोडा मोठा झालो की, तुला अजून मदत करीन. तू मला सांग मी आणून देईन.
समीर :- रॅडी, मी तर अनेकदा माझा महाल बांधला आहे. रावणाचा महाल आपण भव्यदिव्य दाखवतो पण, समजा, समीरचा राजवाडा असता, तर काय काय असते याचा विचार मी करून ठेवला आहे.
यावरून आपल्याला असे लक्षात आले असेल की, नाट्यकला फक्त कलाकार घडवत नाही, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करत नाही, तर जीवन जगण्याची कला लहानपणापासूनच या कलाकारांना शिकवते. यातूनच समाज घडत असतो. तसेच ‘संघे शक्तिः कलौ युगे’ हे वेगळे सांगायची गरज भासत नाही. त्यामुळे बालनाट्य प्रशिक्षण ही एकप्रकारे काळाची गरज आहे.
रानी - राधिका देशपांडे