फरीदाबाद : फरीदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बोगस डॉक्टरने स्वतःला हृदयरोग तज्ज्ञ असल्याचे सांगितले. ५० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेतील सुरक्षेच्या त्रुटी समोर आल्या आहेत. हा बोगस डॉक्टर केवळ MBBS पदवीधर होता. त्याने एका खऱ्या हृदयरोग तज्ज्ञाचे नाव आणि नोंदणी क्रमांक वापरून रुग्णांवर उपचार केले. जुलै २०२३ पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याने फरीदाबादच्या सरकारी रुग्णालयातील काम केले.
रुग्णांनी उपचारानंतर बरे न झाल्यामुळे डॉक्टरचा शोध घेतला. तेव्हा लक्षात आले की, तो डॉक्टर गायब झाला आहे. रुग्णांनी वापरलेल्या नोंदणी क्रमांकावर संपर्क साधल्यावर समजले की, तो क्रमांक एका दुसऱ्या डॉक्टरचा आहे ज्यांचा या केंद्राशी काही संबंध नाही. या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाने केंद्र बंद केले. सरकारी योजनांतील निधीही थांबवण्यात आला होता. अॅन्टी करप्शन ब्युरो या प्रकरणाची चौकशी करत आहे. ५० रुग्णांनी तक्रार दाखल केली आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी म्हणाले की, या डॉक्टरची नियुक्ती खासगी एजन्सीद्वारे झाली होती. त्यामुळे थेट जबाबदारी आरोग्य विभागाची नाही. फरीदाबादचे सिव्हिल सर्जन डॉ. जयंत आहुजा यांनी सांगितले की आता ही केस अॅन्टी करप्शन ब्युरोच्या चौकशीत आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रातील तपासणी प्रक्रियेतील समस्या समोर आल्या आहेत. खासगी आणि सरकारी भागीदारीत सुरक्षेची हमी कशी दिली जावी, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.