ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतातीलच काही लोकांनी भारतात राहूनच आपल्या सैन्यावर शंका घेतली, पुरावे मागितले आणि दहशतवाद्यांचा बचावही केला. त्यांच्या बोलण्याचा वापर पाकिस्तानने थेट जगासमोर केला आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही केला. ही केवळ लोकशाहीला अपेक्षित मतभिन्नता नव्हती, तर भारता विरोधात उभी राहण्यासारखी गोष्ट होती. आज फक्त सरकारच नाही, तर प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने अशा लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे.
युद्ध किंवा सीमावर्ती कारवाई केवळ लष्कराच्या सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर तिची खरी ताकद जनतेचा पाठिंबा आणि राष्ट्रभावनेने प्रभावित कृतिशील जनता हीच असते. युद्धजन्य परिस्थितीत देशाची एकजूट टिकवणे, हे अत्यंत महत्त्वाचे कार्य. १४० कोटी भारतीय एकमुखाने भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे असतानाही, काही विरोधकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याच नाहीत, अशीही भूमिका उघडपणे काहींनी घेतलीच. भारताने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानने भारतावर डागलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यामुळे पाकिस्तानच्या हवाईतळांचे आणि दारूगोळा भांडारांचे मोठेच नुकसान झाले. अखेरीस पाकिस्तानने नमते घेत, भारताकडे युद्धविरामाची मागणी केली आणि ती मान्यही झाली.
काहीजणांना भारत-पाक युद्ध हवे होते. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची मागणीही अनेकांनी केली. काहीजणांनी देश न जिंकलेल्या युद्धाचा विजय साजरा करत आहे, असे तारे तोडले. यानंतर पाकिस्तानने स्वतःच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर यादी प्रसिद्ध केली, त्यामुळे भारताचा हेतू साध्य झाला. मात्र, भारत-पाक युद्धाची वाट पाहणार्या विरोधकांचा हेतू साध्य न झाल्याने, त्यांनी केंद्र सरकारवरच टीकेची झोड उठवली.
देशहितावर राजकीय टीका : काही प्रश्न
भारत सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतला असताना काही राजकीय पक्ष पुरावे द्या, पारदर्शकता कुठे आहे, अशा मागण्या करताना दिसत आहेत. देशहिताच्या विषयांवर किमान सर्वपक्षीय एकजूट अपेक्षित आहे. अनेकजण आजही विचारतात की, आपण किती विमाने गमावली? पण, ते हे कधीही विचारत नाहीत की, या युद्धात भारतीय सैन्याने किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त केले.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबाबत काहीजण म्हणाले की, "भावाभावांना आपापसात लढवण्यासाठी ही घटना घडली आहे.” त्यांनी स्पष्ट करावे की, कोण आणि कुणाचे भाऊ? अजून कितीवेळ या देशातील निष्पाप नागरिक या असल्या दहशतवादी ‘भाईं’चा चारा होणार आहेत? दहशतवाद्यांनी केवळ हिंदू असल्यानेच २६ हिंदूंना त्यांच्या पत्नी आणि लहान मुलांसमोर मारले. ते पुरुष मुस्लीम आहेत का, हे तपासण्यासाठी पॅन्टही उतरवल्या. तरीही काही नेते म्हणाले की, "दहशतवाद्यांना इतका वेळ असतो का की, ते कुणाचा धर्म विचारून मारतील?” याचाच अर्थ, दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंब खोटे बोलत आहेत. पीडितांना खोटे ठरवून दहशतवादी ‘धर्मांध’ नव्हतेच, असे सांगण्याचा खटाटोप का केला? एका मुख्यमंत्र्यांनी तर पाकिस्तानसोबत युद्धच नको, असेही मत व्यक्त केले. पाकिस्तानचा इतका पुळका का? तसेच, त्या दहशतवाद्यांनी महिलांना हातही लावला नाही, असेही काहीजण म्हणाले. दहशतवाद्यांनी महिलांना मारले नाही, केवळ हिंदू पुरुषांना मारले, याबद्दल देशवासीयांनी त्यांचे उपकार मानायचे का? मतांच्या लाचारीसाठी काही राजकीय नेते काहीही विधाने करू शकतात का?
या घटनेनंतर मात्र एक सिद्ध झाले की, देशाचा शत्रू सीमेपारच नाही, तर भारताच्या आतमध्येही दबा धरून बसला आहे. समाजकारण, राजकारण आणि प्रसारमाध्यमांत असलेल्या देशशत्रूंचे, किंवा शत्रु देशाला उघड किंवा छुपे समर्थन करणार्या विषारी सापांचे काय करायचे, हाच एक प्रश्न आहे.
अंतर्गत शत्रू, कठोर कारवाईची गरज
सीमेबाहेर आणि अंतर्गतही गृहयुद्ध पुकारणार्या या असल्या लोकांवर आता कडक कारवाई होणे गरजेचेच आहे. या देशद्रोह्यांना ठेचायलाच हवे.
नागरिक म्हणून आपली भूमिका
भारतात चाललेल्या भारतविरोधी किंवा देशद्रोही प्रचाराचा उपयोग पाकिस्तान आणि चीनने माहिती युद्धात विजय मिळवण्यासाठी पुरेपूर करून घेतला. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एका पत्रकार परिषदेतच आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर एक चित्रफित दाखवली. या चित्रफितीमध्ये भारताचे प्रसिद्ध पत्रकार करण थापर, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेत होते. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, "पुलवामामध्ये ‘सीआरपीएफ’च्या जवानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नाही, तर भारतानेच मारले आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले. पुलवामा हल्ला झाला, तेव्हा सत्यपाल मलिकच काश्मीरचे राज्यपाल असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व अचानक महत्त्व प्राप्त झाले. दिले जाते.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर १०० हून अधिक भारतीयांच्या चित्रफिती दाखवल्या, ज्यात ते भारतीय भारताविरोधीच भाषा वापरत होते आणि पाकिस्तानची बाजू मांडत होते. थोडयात हे भारतीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम करत होते. पाकिस्तानची बाजू मांडून हे सिद्ध करत होते की, भारताने किंवा भारतीय प्रवक्त्यांनी दिलेली माहिती चुकीची होती आणि पाकिस्तान जे म्हणत होता तेच कसे बरोबर होते.
पाकिस्तानला मिळालेला ‘मानसिक विजय’
या युद्धात पाकिस्तानने मोठा मानसिक विजय मिळवला का? पाकिस्तानने जगाचे लक्ष्य दहशतवाद व दहशतवादी हल्ल्यांपासून काढून घेतले आणि यावर लक्ष केंद्रित केले की, भारत आपल्या नागरिकांचे काश्मीरमध्ये रक्षण करू शकला नाही. पाकिस्तानने भारताचे खूप जास्त लष्करी नुकसान केले आहे. युद्धात भारताचा पराभव झाला आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने जास्त चांगली कामगिरी बजावली आहे, असाच टीकेचा सूर भारतातूनही उमटला. याचा परिणाम असा झाला की, पाश्चिमात्य माध्यमांनी लिहिलेले लेख किंवा संपादकीय बहुतेक वेळा भारताच्या विरोधात होतेच आणि पाकिस्तानच्या बाजूनेही होते. खरे तर, पाश्चिमात्य माध्यमांनी भारताचे समर्थन करायला पाहिजे कारण, भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. परंतु, त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानचे म्हणणे बरोबर असल्याचे सांगितले. पाश्चिमात्य माध्यमांनी अशा प्रकारची मते बनवण्यामध्ये काही भारतीयांच्या देशविरोधी विधानांचा पुरेपूर वापर केला गेला.थोडयात माहिती युद्धात किंवा मानसिक युद्धात भारत खूपच मागे पडला. पाकिस्तानला हे मानसिक युद्ध जिंकण्यात मदत करणार्यांवर देशांवर काय कारवाई करायची, हे भारतीय जनतेने ठरवायला पाहिजे.
देशविरोधी प्रचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना
परदेशातील वर्तमानपत्रांचे अनेक पत्रकार जे भारताच्या विरोधात लिहितात, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्धदेखील कारवाई करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, त्यांच्यावर भारतात बहिष्कार टाकला जाऊ शकतो. त्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा देणे थांबवले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर ते ज्या वर्तमानपत्रात लिहितात, त्या वर्तमानपत्रावरसुद्धा बहिष्कार टाकला जाऊ शकतो किंवा त्यांना भारताच्या आत ब्लॉक केले जाऊ शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपून अनेक दिवस झाले आहेत परंतु, अजूनही हे अपप्रचार युद्ध, दुष्ट प्रचार युद्ध किंवा मानसिक युद्ध सुरूच आहे.
नागरिक म्हणून आपली जबाबदारी : माहिती योद्धा बना!
अशा युद्धामध्ये देशभक्त नागरिक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. परदेशातील समाज माध्यमे, प्रिंट मीडिया किंवा इलेट्रॉनिक मीडियामध्ये जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात काही बोलले जाते किंवा लिहिले जाते, त्याला लगेचच प्रत्युत्तर त्या त्या मीडियामध्ये देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने जर एखादा भारतविरोधी लेख लिहिला, तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला ईमेल पाठवून या लेखात केलेल्या माहितीचे खंडन करायला पाहिजे. या इमेलच्या माध्यमातून ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला दाखवून दिले पाहिजे की, त्यांनी लिहिलेले लेख पूर्णपणे चुकीचे आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांची व्याप्ती प्रचंड आहे. म्हणून प्रत्येक सुशिक्षित भारतीयाने माहिती योद्धा बनून अशा भारतविरोधी लिखाणांवर लक्ष ठेवून, त्याला प्रत्युत्तर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण तयार आहोत का?
‘ऑपरेशन सिंदूर’: एक निर्णायक संदेश
‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सैनिकी कारवाई नाही. दहशतवाद्यांना, पाकिस्तानला आणि देशांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रद्रोही शक्तींना दिलेला हा निर्णायक इशारा आहे. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारे राष्ट्र राहिले नसून, ते निर्णायक निर्णय घेणारा, विश्वासार्हता कायम ठेवणारा आणि जबाबदारीने कारवाई करणारा देश म्हणूनही जागतिक पातळीवर उदयास येत आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही, तर दशकभराच्या दूरदृष्टीचा, संकल्पाचा आणि सततच्या प्रयत्नांचा तो परिपाक आहे. हे यश कायम राखायचे असेल, तर राजकीय, सामाजिक आणि वैचारिक स्तरावर ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने एकत्र येणे हीच काळाची मागणी आहे. राष्ट्रद्रोही शक्तींना ठेचायलाच हवे.
(नि.) ब्रि.
हेमंत महाजन