सोन्याच्या खदानीमागे...

    12-May-2023   
Total Views |
peru

२०२० साली अंतराळातून एक दृश्य चित्रित करण्यात आले. त्या दृश्यात सुदूर पसरलेल्या सोन्याच्या खाणी दिसल्या. तेजाने तळपणार्‍या त्या सोन्याच्या खाणी पाहून जग आर्श्चचकित झाले. हे दृश्य होते पेरू देशातील अ‍ॅमेझॉनच्या जंगलातले. तसेही पेरू जगातला सोने उत्पादन करणारा जगातला सहावा देश. जसा आपला देश कृषिप्रधान, तसा हा देश खाणप्रधान. सोने शोधण्यासाठी इथे सरकारी आणि बेकायदेशीर अगणित खाणी आहेत. आशा, निराशा, स्वप्न वगैरेच्या पातळीवर ही खाणीची दुनिया अनेक वर्षे सुरू आहे. पेरूतील खाणकाम कामगारांचे जगणे आठवले. कारण, नुकतेच दक्षिण पेरूमध्ये अ‍ॅमेझॉनच्या जंगलाजवळ एका खाणीमध्ये २७ कामगार श्वास गुदमरून मृत्यू पावले. ‘शॉर्टसर्किट’झाले आणि आगीचा लोळ उठला. खाणीमध्ये आग आणि धूर भरून राहिला. त्यावेळी त्या खाणीमध्ये १०० फूट खोल आत शेकडो कामगार काम करत होते. त्यातले २७ कामगार मृत पावले, तर शेकडो कामगार कसेबसे बचावले. मृत पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी एकच आकांत केला. पण, त्यांना खाणीकडे जाण्यास मनाईच होती. कारण पुन्हा सोनेच! एक सोन्याचा कणसुद्धा कुणी परवानगीशिवाय इथून न्यायचा नाही, म्हणून इथे कडक नियम आहेत.

असो. भूगर्भात सोने आहे की नाही, हे सगळ्यांनाच कळते का? तर तसे नाहीच. पण, अनेक परंपरा, रितीरिवाज अगदी कुणी तरी सांगितले किंवा कसली तरी प्रतिकात्मक खूण मिळाली तरीसुद्धा लोक सोने मिळेलच, या आशेने खाणी खणतात. सोने मिळणारच असा त्यांचा आशावाद असतो. सोने मिळावे यासाठी काही प्रतिकात्मक शुभशकून करणे, तिथल्या प्रथेप्रमाणे पूजा करणे अगदी अंधविश्वास बाळगत कुप्रथाही पाळल्या जातात. हे सगळे का? तर जमिनीच्या आत सोन्याची खाण आहे की नाही, हे माहिती नाही. पण, तरीही जमीन खणायची, अगदी १०० मीटरपर्यंतही खणायची. त्यासाठी लागणारा वेळ, ऊर्जा, मनुष्यबळ आणि आर्थिकता हे सगळे आशेनिरोशच्या गर्तेतलेच. त्यामुळे खाणी खणणार्‍या संबंधित सर्वांनाच मानसिक ताणतणाव भारी असतो. तो ताणतणाव दूर करण्यासाठी अमली पदार्थांचे सेवन करणे हे तिथले वास्तवच!

सोनेप्राप्तीसाठी खाणी खणण्यापूर्वी जर कुमारिकेशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले, तर शुभशकून होऊन खाणीमध्ये सोने सापडते, अशी इथली कृप्रथा आणि अंधविश्वास. यामुळेच पेरू देशात अल्पवयीन मुलींवरील आणि मुलांवरील लैंगिक अत्याचारही सातत्याने होत असतात. त्यातच पेरू देशामध्ये देहविक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. याचा फायदा घेत तिथे बालकांनाही देहव्रिक्रीच्या धंद्यात लोटले जाते. पेरूमध्ये खाणीच्या पट्ट्यात खाण कामगारांसाठी हॉटेल आणि हॉटेलच्या आड देहविक्री करणार्‍यांचा सुळसुळाट आहे. या हॉटेलमध्ये जेवण बनवण्यासाठी किंवा साफसफाईसाठी येणारी लहान बालक आणि बालिका कधी देहविक्रीच्या नरकयातनेत सामील होतात, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. खाणकामात बेभरवशाचे जगणे, खाणकाम करताना कधी जमिनीचे स्खलन होईल, कधी कुठून वरचा भूभाग कोसळेल आणि त्यामुळे जमिनीच्या आतून पुन्हा जमिनीवर येता येईल की नाही, याची शाश्वती नाही. जमीन खणताना केले जाणारे विस्फोट, त्याचा धोका... जराही चूक झाली, तर त्या विस्फोटाचे बळी ठरू शकतो, हे निश्चितच. त्यामुळे खाणीत काम करताना कधीही मरू शकतो, याची खुणगाठ इथल्या कामगारांनी बांधलेली.

अशा अनिश्चितीच्या जीवनात सुख तेही भौतिक सुख ओरबाडण्याची एक वृत्ती अनेकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यातच किराणामालाची दुकानं राजरोस चालू असावीत, अशी रस्त्यारस्त्यावरचे, चौकाचौकातले, गल्लीतले देहविक्रीचे अड्डे २४ तास उघडेच असतात. कमालीची गरिबी, अज्ञान आणि सोन्याची तीव्र लालसा यामध्ये गुरफटलेले कामगार, त्यांचे जगणे म्हणजे तारेवरची काटेरी कसरत नव्हे, खाणीतली निसरडी वाटच. सोन्याचा भाव सातत्याने वधारतच आहे. त्यामुळे पेरूमधल्या सोन्याच्या खाणीवर दहशतवादी तसेच अवैध काम करणार्‍यांची वक्रदृष्टी पडली नाही तर नवल! हे लोक दहशतवादाचा अवलंब करून स्थानिक नागरिकांवर जुलूम-जबरदस्ती करून त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करतात. का? तर या जमिनी खणून त्याखाली सोने मिळू शकते, असे यांना वाटते. जगाच्या पाठीवर असेही आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.