समाजाच्या उत्थानासाठी...

    25-Apr-2023   
Total Views |
 
Manohar Bhavnath
 
 
आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत समाजकल्याणाचा ध्यास घेतलेले मनोहर भावनाथ. शेतकरी कुटुंबातील मनेाहर यांचे विचारकार्य प्रकाशझोतात आणणारा हा लेख...
 
मधुकर भावनाथ आणि बेबीबाई हे विल्होळी गावचे मराठा समाजातील एक कुटुंब. अडीच एकर शेतजमीन. पण, उत्पन्न फारसे नव्हतेच. त्यामुळे मधुकर वाहनचालक म्हणून काम करायचे, तर बेबीबाई दुसर्‍याच्या शेतात मजूर म्हणून काम करायच्या. यांना चार अपत्ये. त्यापैकी एक मनोहर. अर्थात घरची परिस्थिती हलाखीची. त्यात मनोहर यांच्या आजोबांना आणि वडील मधुकर यांनाही दारूचे व्यसन. गावात बहुसंख्य घरात हेच वातावरण. दारूमुळे घरात कलह आणि दारिद्य्र पाचवीला पुजलेले. हे कुठे तरी थांबायला हवे, असे गावातील प्रत्येक गृहिणीला वाटे. हेच मनोहर यांच्या आजीला गीताबाईंनाही वाटे. नुसता विचार करून गीताबाई गप्प बसल्या नाहीत. गावातली दारूची दुकानं बंद व्हावीत, अशी मागणी करण्यासाठी त्यांनी गावातल्या सगळ्या महिलांना एकत्रित करून आंदोलन केले. या आंदोलनामध्ये त्यावेळी सहावीला असलेले मनोहरही आजीबरोबर सहभागी झाले. या आंदोलनामुळे शेवटी जिल्हाधिकार्‍यांनी गावातले दारूचे दुकान बंद केले. साधारण 1994 साल असावे ते. तेव्हापासून आजतागायत विल्होळी गावात दारूचे दुकान नाही. शेतकरी कुटुंबातील गीताबाई त्यांचा संघर्ष आणि यश, त्यातून समाजाचे झालेले कल्याण, हे सगळे त्यांचा नातू मनोहर यांनी पाहिलेले अन् अनुभवलेले. त्यामुळे मनोहर यांना लहानपणापासून समाजकार्याची आवड निर्माण झाली.
 
घरच्या गरिबीमुळे मनोहर वयाच्या 11व्या वर्षापासूनच दवाखान्यात काम करू लागले. शाळेत अत्यंत हुशार असलेले आणि उज्ज्वल भवितव्य असलेला विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक. आपण खूप शिकावे आणि समाजासाठी, गावासाठी काहीतरी करावे, अशी मनेाहर यांची इच्छा. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत असताना ते एसटीने प्रवास करत. एकदा त्यांनी एसटीचे तिकीट काढण्यासाठी वाहकाला पैसे दिले. मात्र, गर्दी किंवा इतर कोणत्यातरी कारणाने म्हणा वाहक विसरले की मनोहर यांनी तिकिटासाठी पैसे दिले. गरिबीतून शिक्षण घेणार्‍या मनोहर यांना त्यावेळी ते बसच्या तिकिटाचे पैसेही खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे मनोहर आणि बसवाहक यांच्यात वाद सुरू झाला. त्यातून वाहकाशी भांडण केले म्हणून मनोहर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मनोहर यांच्या वडिलांनी त्यांची कशीबशी जामिनावर सुटका केली.
 
मात्र, या घटनेने मनोहर यांचे जीवन बदलले. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, ”आपल्याकडे कधीच कुणी असे केले नाही. कोर्टाची पायरी चढावी लागली. आता तू शिक्षण सोड आणि काम कर!” मनोहर वडिलांच्या शब्दाबाहेर जाणे शक्यच नव्हते. ते मदतनीस म्हणून एका कंपनीत कामाला लागले. पुढे एका खदानीमध्ये ‘सुपरवायझर’ म्हणून काम करू लागले. तिथे खदानीत काम करणार्‍या कामगारांची मूलं होती. ती शाळेत जात नव्हती. दिवसरात्र असुरक्षित, अस्वच्छ वातावरणात फिरत असायची. शिक्षण घेण्याच्या वयात या मुलांना शिक्षण मिळत नाही, हा विचार मनोहर यांच्या मनात आला. त्यांना वाटले, आपल्याला शिकायचे होते, पण आपल्या नशिबी हे काम आले. आपण या मुलांना शिकवायला हवे. त्यांनी या मुलांसोबत मैत्री केली. मुलांसाठी खदानीच्या जवळपास शाळा कशी सुरू करता येईल, याची माहिती घेताना त्यांचे शिक्षक पंढरीनाथ भामरे यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा सुरू करायला सांगितले.
 
मनोहर यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करत बजरंगवाडी येथे मजुरांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. दहा वर्षे ती शाळा सुरू होती. नंतर ती शाळा जिल्हा परिषदेच्या अधीन झाली. या दहा वर्षांत मनोहर या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मानधन मिळायचे. इतके कष्ट करून मनोहर यांना पैसे मिळत नाहीत, असे घरातल्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी मनोहर यांना सांगितले की, एक तर दुसरीकडे काम तरी बघ नाहीतर, घर तरी सोड. शाळा सुरू राहावी, यासाठी मनोहर यांनी घर सोडले. पुढे पत्नी शुभांगी हिला या शाळेत शिक्षिका नेमून त्यांनी बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात जम बसला. आर्थिक स्थैर्य आले. आर्थिक सधनेतचा उपयोग त्यांनी समाजासाठी करण्यास सुरुवात केली. आरोग्य शिबीर आयोजित करणे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, व्यवसाय करू इच्छिणार्‍या होतकरू तरुणास भांडवलाची मदत करणे असे एक ना अनेक सामाजिक कार्य ते करू लागले. पुढे त्यांनी हा व्यवसाय भावाकडे सुपूर्द केला आणि त्यांनी शेतीकाम सुरू केले. शेतकरी म्हणून काम करताना त्यांना समाजकार्यासाठी वेळ मिळू लागला. मनोहर श्रीगुरूजी रुग्णालय नाशिकच्या विल्होळी गावाच्या आरोग्य उपकेंद्राच्या समितीचे सदस्य आहेत. त्यांची ‘लोकाश्रय’ नावाची एक सामाजिक संस्था आहे. स्वप्निल इंगळे, डॉ. किशोर मुळे आणि रंजन कदम या समाजशील सहकार्‍यांच्या साथीने ‘लोकाश्रय’ संस्था आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या आयामातून समाजकार्य करते. युवकांना व्यायामाची सवय लागावी, तसेच इतर चांगल्या सवयी लागाव्या, यासाठी मनोहर यांनी पुढाकर घेत स्थानिक युवकांच्या साथीने ‘संघर्षनगर मित्रमंडळ व्यायाम शाळा’ निर्माण केली. आज परिसरातले शेकडो युवक या व्यायामशाळेचा लाभ घेत आहेत. आपल्याला जमेल त्या स्तरावरून, जमेल त्या परिस्थितीमध्ये समाजाचे कल्याण करावे, हीच इच्छा असणारे मनोहर आणि त्यांचे विचार समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.