सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्कर सन्मानप्राप्त ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी ‘साऊंड इंजिनिअरिंग’ची जबाबदारी निभावणार्या प्रद्युम्न चावरे या हरहुन्नरी तरुणाच्या पुणे ते ‘ऑस्कर’ या रंजक प्रवासाची कहाणी...
जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या ‘द अकॅडमी अवॉर्ड्स’ अर्थात 95व्या ‘ऑस्कर’ सोहळ्यामध्ये यंदा भारतीय जगताची मोहोर उमटली. ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गीताला सर्वोत्कृष्ट गीताचा सन्मान प्राप्त झाला. यासोबतच चर्चा झाली ती ’द एलिफंट व्हिस्परर्स’ लघुपटाची. या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रत्येक भारतीय नागरिकाला या पुरस्काराने आनंद झाला. जगज्जेता ठरलेल्या या लघुपटाच्या ’साऊंड इंजिनिअरिंग’ची जबाबदारी पार पडली, ती आपल्या पुणेकर तरुणाने. प्रद्युम्न चावरे असे या हरहुन्नरी तरुणाचे नाव. प्राणी, निसर्ग आणि मानव यांच्यातील हळव्या नात्याची गोष्ट सांगणारी कथा असलेल्या ’द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निमित्ताने पुणे ते ‘ऑस्कर’ हा रंजक प्रवास आम्ही जाणून घेतला.
पुण्यातील बिबवेवाडीमध्ये राहणार्या प्रद्युम्नचे शालेय शिक्षण मुक्तांगण शाळेमधून झाले. त्याचे वडील अरविंद हे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरी करीत होते. आई माधवी गृहिणी. त्याला एक बहीण असून त्या सध्या पतीसह जर्मनी येथे वास्तव्यास असतात. प्रद्युम्नला म्हणा लहानपणापासूनच संगीत आणि वाद्यांची आवड. लहानपणी तो तबला शिकत होता. तेव्हापासूनच ’साऊंड’विषयी त्याला प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. हीच त्याची आवड आज त्याला ‘ऑस्कर’पर्यंत घेऊन गेली आहे.
त्याने ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट’मधून ‘साऊंड इंजिनिअरिंग’चे रीतसर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने मुंबईची वाट धरली. सिनेमा, लघुपट, विविध प्रकारचे व्हिडिओज् आदींसाठी ‘साऊंड’विषयक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. प्रद्युम्न मुंबईत काम शोधत होता. त्याचे ’स्ट्रग्लिंग’ सुरूच होते. त्याला हळूहळू कामे मिळूही लागली. याच काळात त्याचा संपर्क ’सिख्या एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेसोबत आला. या संस्थेसोबत त्याने एक फिल्म केली. या निर्मिती संस्थेने जेव्हा कार्तिकी गोन्सालविस यांच्या ’दि एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला, तेव्हा आपसूकच प्रद्युम्नला त्यामध्ये काम करायची संधी चालून आली. साधारणपणे 2017 पासून लघुपटाच्या चित्रीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.
या टीममध्ये प्रद्युम्न कायम उपस्थित असायचा. लघुपटाचे मुख्य पात्र असलेल्या बोमन आणि बेल्ली या स्थानिक वनवासी जोडप्यासह खरा नायक असलेल्या ‘रघू’ (हत्ती) च्या सोबत राहून अनेक शिकायला मिळाल्याचे प्रद्युम्न सांगतो. लघुपट असो वा चित्रपट, अनेकदा साऊंडसाठी ‘फॉली आर्टिस्ट’ वापरले जातात. पण, इथे मात्र प्रत्यक्ष जंगलात जाऊन खरेखुरे आवाज ध्वनिमुद्रित करण्याचा निर्णय प्रद्युम्नने घेतला. वन विभागाच्या जाणकार व्यक्तींसोबत त्याला जंगलाच्या अत्यंत संवेदनशील भागातदेखील जावे लागले. अनेकदा लांबवर चालत जावे लागत असे. जंगली जनावरांची भीती होती. ‘साऊंड’ रेकॉर्ड करताना अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. भलामोठा हत्ती दिसणार नाही, असे उंच गवत पहिल्यांदाच पाहायला मिळाले, असे तो सांगतो. हत्ती हा अत्यंत संवेदनशील प्राणी असून त्याची समज चांगली असते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रसंग कधीही घडला नाही, असेही तो नमूद करतो. मदुमलाई जंगलातील हत्ती अभयारण्यातील हत्तींचे जीवन जवळून अनुभवता आले. प्राण्यांचे जीवन, त्यांच्यासोबत जगणार्या माणसांचे जगणेदेखील त्याच्या मनाला स्पर्शून गेले. त्यांच्याकडे पाहूनच जंगलातील नियम पाळण्याची सवय लागली.
हा लघुपट ‘ऑस्कर’पर्यंत जाईल, अशी कोणालाही आशा नव्हती. परंतु, ’ऑस्कर’ मिळाल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाल्याचे तो सांगतो. दिग्दर्शक कार्तिकी गोन्सालविस, गुनीत मोंगा, डॉग ब्लश, अचित जैन यांनी अप्रतिम फिल्म तयार केली असून त्यामुळे सर्व भारतीयांना अभिमान वाटतो आहे. प्रत्येक भारतीय नागरिक ’आपल्याला’ ‘ऑस्कर’ मिळाला, असे गर्वाने सांगतोय हे पाहून आपल्या कामाचे चीज झाल्याची भावना मनात असल्याचे प्रद्युम्नने सांगितले.
आई-वडिलांनी कधीही आवडीच्या गोष्टी करण्यापासून अडवले नाही. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आजवर वाटचाल करू शकलो, असे तो अभिमानाने सांगतो. पुण्यातील मित्र, कट्टे खूप मिस करतो, हे नमूद करायलाही तो विसरला नाही. पुणे हे आपल्या हृदयाच्या जवळ आहे. पुण्याला आलो की, आवडीच्या मिसळ खायला नक्की जातोच, असे तो म्हणतो.
‘साऊंड इंजिनिअरिंग’ आणि ‘साऊंड डिझायनिंग’ या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. आज कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात काम करणार्या तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रचंड ’पेशन्स’ आवश्यक आहेत. यश एका रात्रीत मिळत नाही. कष्ट-परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. प्रामाणिक कष्टाला एक दिवस फळ अवश्य मिळते, अशी प्रद्युम्नची धारणा आहे. त्याचे आगामी ’शांतीत क्रांती’चा दुसरा सिझन आणि सुनील सुकथनकर यांचा हिंदी सिनेमा ’आऊटहाऊस’ हे दोन प्रकल्प पूर्ण झाले असून लवकरच ते प्रदर्शित होणार आहेत. प्रद्युम्नला भविष्यातील नादमय यशस्वी वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
- लक्ष्मण मोरे