बिचार्‍या पाकिस्तानी महिला डॉक्टर

    19-Mar-2023   
Total Views | 126
Gender Discrimination and Harassment on Women in Pakistan’s Medical Profession


आगाखान युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, कराची तर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. विषय होता, पाकिस्तानातील महिला डॉक्टरांची स्थिती. आता सर्वेक्षणात काय आले असेल, यात काय शंका आहे का? या देशाची सर्वच पातळ्यांवर अधोगती सुरू आहे. त्या अधोगतीला चारचांद लावणारे निष्कर्ष या अहवालात आहेत. दहशतवादाच्या छायेत रमणार्‍या आणि उद्ध्वस्त झालेल्या देशात महिला डॉक्टरांची स्थिती फारच विदारक आहे.


आगाखान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने त्यांच्या निरीक्षणात स्पष्ट सांगितले की, पाकिस्तानातील ७० टक्के महिला डॉक्टरांना लिंगभेदाला सामोरे जावे लागते. त्या महिला आहेत म्हणून त्यांचा छळ होतो. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या दहापैकी सहा महिला डॉक्टर या वैद्यकीय सेवापेशात कार्य करतच नाहीत. लिंगभेद आणि त्रासाला कंटाळून दहापैकी सहा महिला वैद्यकीय पेशा सोडून दुसर्‍या व्यवसायाकडे वळल्या आहेत किंवा यापैकी काहीच न करता घर सांभाळत आहेत. आता प्रश्न असा येतो की, या महिलांनी वेळ, ऊर्जा आणि पैसे खर्च करून वैद्यकीय शिक्षण कशासाठी घेतले? तर या महिलांना डॉक्टरच बनायचे होते, पण पाकिस्तानमध्ये महिला डॉक्टरांसह होणार्‍या भेदभावाला कंटाळून त्यांनी या शाखेकडे पाठ फिरवली.


 बरं, यांनी स्वत:चे दवाखाने उघडलेम् तरीसुद्धा पुरूष रुग्ण यांच्या दवाखान्यात येत नाहीत. निदान महिला रूग्ण येतील का? तर महिलांना दवाखान्यात न्यावे की नेऊ नये, याचा निर्णय पुरूष त्यांच्या मर्जीने घेत असल्यामुळे क्वचितच महिला रूग्ण दवाखान्यात येतात. त्यामुळे अर्थाजनाच्या नावाने पदरी काहीच पडत नाही. याबाबत पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’चे म्हणणे की, महिला डॉक्टरांना इतका मानसिक त्रास दिला जातो की, त्या स्वत:च आजारी पडतात. शिवाय त्या जिथे वैद्यकीय सेवा देतात, तेथील वातावरण महिलांसाठी अजिबात अनुकूल नसते. पुरुष डॉक्टरांचा विचार करूनच रुग्णालयांमध्ये सोईसुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे महिला डॉक्टरांना काम करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

पाकिस्तानमध्ये चांगली वैद्यकीय सेवा मिळणे दुरापास्तच आहे. जे डॉक्टर होतात ते पाकिस्तान सोडून दुसर्‍या देशाचे नागरीकत्व घेतात. कारण, १२ तास काम करूनही पाकिस्तानमध्ये ४० हजारांच्या वर जास्त पैसे मिळत नाही, अशा येथील डॉक्टरांचे म्हणणे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये केवळ १८ टक्के महिला डॉक्टर आहेत. त्याही वैतागल्या आहेत. खरेतर पाकिस्तानमध्ये महिला डॉक्टरांची संख्या वाढणे गरजेचे आहे. कारण, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी १७ हजार महिला ‘ब्रेस्ट कॅन्सर’ने मृत्यू पावतात. पण पाकिस्तानमध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांचा अंदाज आहे की, १७ हजार नव्हे, तर ४० हजार महिला ‘ब्रेस्ट कॅन्सर’ने मृत्युमुखी पडतात. हा आकडा खूप मोठा आहे आणि भयानक आहे. या महिलांना वेळीच उपचार मिळाला, तर त्यांना जीवदान मिळू शकते. पण पाकिस्तानमध्ये महिला डॉक्टर कमी आहेत.


 महिलांना असा काही त्रास असेल, तर त्या पुरूष डॉक्टरांकडे उपचारासाठी जाऊ शकत नाहीत. कारण, महिलांनी किंवा त्यांच्या घरातल्यांनी परक्या डॉक्टरांकडे जाऊन स्त्रीच्या छातीविषयक उपचारासंदर्भात बोलणे, हे पाकिस्तानमध्ये अतिशय वाईट मानले जाते. डॉक्टरकडेच का? आजारी महिला आपल्या शरीराच्या त्या भागाचा उल्लेख घरातील महिलांसमोर करण्यासही टाळते. कारण, इथल्या संस्कृतीनुसार महिलांच्या शरीराचे काही अवयव हे ‘शर्मगाह’ असतात. ते विशेष असतात. त्यांचा उल्लेख कुठेही करणे चूक असते, पाप असते. विषयांतर झाले, पण पाकिस्तानमधल्या महिला डॉक्टरांसोबतच स्थानिक महिलांचे काय चालले आहे, हे सांगणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर हिंदू डॉक्टर महिलांचे काय ? तर काही वर्षांपूर्वी लरकानाच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. नम्रता चांदनी हिच्यावर सामुदायिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ती बी. बी आसिफा मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिचा भाऊ विशाल कराची येथील मोठा शल्यविशारद. यासंदर्भात दोन गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले आणि काही दिवसांनी सोडूनही दिले. काय म्हणावे? बिचार्‍या, पाकिस्तानी महिला डॉक्टर...


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121