दम्याला दमवणारा अवलिया!

    03-Feb-2023   
Total Views |
prakash boob


एकेकाळी दम्याने घराच्या १८ पायर्‍या चढणेही मुश्किल होते. परंतु, जिद्दीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत ७ हजार किमी पायाने, तर १४ हजार किमी अंतर सायकलने कापले. जाणून घेऊया प्रकाश बूब यांच्याविषयी...

शिकरोड येथे जन्मलेल्या उमेश प्रकाश बूब यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. वडिलांचा इंडस्ट्रियल ऑईलचा व्यवसाय, तर आई गृहिणी. नाशिकरोड येथील नवीन मराठी शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय वयात त्यांना क्रिकेटची विशेष आवड होती. पुढे पाचवीला पुरुषोत्तम स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इयत्ता पाचवीत घशाच्या आजारामुळे ऑपरेशन करावे लागले. त्यानंतर थंड वस्तू खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु, त्याने त्यांना सर्दी झाली आणि त्याचे रूपांतर पुढे दम्यात झाले. दमा असल्यामुळे त्यांना शाळेत पायी जाणेही मुश्किल झाले. त्यांना शाळेत न्यावे-आणावे लागत. जास्त बोलल्यास श्वास घेणेही अवघड व्हायचे. अनेकदा दम्याचे-अस्थमाचे झटके यायचे. त्यामुळे बराच वेळ श्वास घेणे अशक्य होई. त्यावेळी डॉ. गौतम यांनी स्प्रेचा पर्याय दिला खरा, पण त्याने तात्पुरता आराम मिळायचा.


दम्यामुळे अती शारीरिक हालचाली आणि खेळ पूर्ण बंद झाला. असे असूनही त्यांनी १९९४ साली दहावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. पुढे बिटको महाविद्यालयातून त्यांनी बारावी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. यादरम्यान अस्थमावर विविध ठिकाणी उपचारांची चाचपणी सुरू होती. सांगलीतील मिरज येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना जरा आराम वाटू लागला. आजोबांसोबत ते जिमखान्यात व्यायाम करू लागले. साखरपुडा झाल्यानंतर बहिणीचा अकस्मात मृत्यू झाल्याने उमेश यांच्यासह आईला सर्वांत मोठा धक्का बसला. आई कुठेही लग्न सोहळ्याला गेली तर तिथेच फिट येऊन बेशुद्ध पडायची. दरम्यान, बारावीनंतर उमेश यांनी बिटको महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पुढे ‘एनबीटी लॉ कॉलेज’मधून ‘डीटीएल’चे शिक्षण पूर्ण केले. याचवेळी ‘डीटीएल’च्या दुसर्‍या वर्षी आजोबांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांना मदत म्हणून उमेश त्यांच्यासोबतच व्यवसायात सक्रिय झाले.

पुढे शाळेतील दहावीतील वर्गमित्रांचे ‘गेट टूगेदर’झाले. त्यावेळी दीपक पडवळ या मित्राने उमेश यांना सायकल चालवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर उमेश यांनी सायकल विकत घेतली. ‘बिझनेस बँके’तर्फे आयोजित सायकल रॅलीत उमेश यांना हेमंत आपसुंदे यांच्याशी ओळख झाली. आपसुंदे यांनी उमेश यांना सायकलिंगचे फायदे आणि महत्त्व सांगितले. नंतर ते दोघेही सोबत सायकलिंगला जाऊ लागले. पुढे ‘नाशिक सायकलिस्ट’तर्फे नवरात्रीत आयोजित नाशिक ते कोटमगाव असे १०० किमी अंतर बर्‍याच अडथळ्यांनंतर उमेश यांनी पार केले. परंतु, नंतर आठ दिवस त्यांना सायकलला हातही लावला नाही. उमेश यांनी सरावाला सुरुवात केली. पांढुर्ली, सिन्नर, बार्न्स स्कूल अशा अनेक ठिकाणी त्यांनी सायकलिंगचा सराव सुरू केला.


नाशिक ते त्र्यंबकेश्वर राईड, २०० किमीची रात्रीची ‘बीआरएम’ स्पर्धा दहा तासांत पूर्ण केली. त्यानंतर दुसर्‍या ‘बीआरएम’ स्पर्धेतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. उमेश यांनी नाशिक ते पंढरपूर अशी ४५० किमी अंतराची आषाढी वारीही सायकलवर यशस्वीरित्या पूर्ण केली. नंतर त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. दहा किमीची ‘नाशिक रन’ स्पर्धाही त्यांनी पूर्ण केली. २१ किमी अंतराची ‘हाफ मॅरेथॉन’ही पूर्ण केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. ४२ किमीची पोलीस मॅरेथॉनही ते धावले. पुढे ‘अल्ट्रा रन’मध्येही ते ३५ किमी धावले. चेतन यांच्यामुळे उमेश यांनीही दक्षिण ऑफ्रिकेतील कॉम्रेड्स स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नंतर कोरोना काळात सर्वकाही थांबले. यादरम्यान वडिलांना कर्करोगाचे निदान झाले. लाखोंचा खर्च आणि उपचारांनंतरही २०२० साली त्यांचे निधन झाले. साधे सुपारीचे व्यसन नसलेले वडील कर्करोगाने गेल्याने उमेश एकाकी पडले.

कोरोना काळात त्यांनी पुन्हा घरीच व्यायामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, घरच्या घरीच ते २१ किमी अंतर धावत. कोरोना काळ सरल्यानंतर त्यांनी पुन्हा ‘कॉम्रेड्स स्पर्धे’च्या सरावाला सुरुवात केली. पात्रता फेरीत सहा मिनिटे जास्त झाल्याने त्यांना अपयश आले. पुढील महिन्यातच त्यांनी पुन्हा सहा मिनिटे कमी घेत फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘कॉम्रेड्स स्पर्धे’साठी पात्रता मिळवली. पाच महिन्यांवर स्पर्धा असताना त्यांनी सराव सुरू केला. दर महिन्याला ते ३०० किमी धावायचे. स्पर्धेला गेल्यानंतर अगदी नव्वदीपर्यंतचे व्यक्तीदेखील या स्पर्धेत सहभागी झाल्याचे पाहून उमेश भारावले. १२ तासांत ९० किमी अंतर धावणे आवश्यक असताना उमेश यांनी हे खडतर अंतर साडेअकरा तासांत पूर्ण केले. त्यांनी तिरंग्याच्या साक्षीने हा आनंद साजरा केला. यानंतर डिसेंबर २०२२ मधील जैसलमेर येथील १०० किमीची बॉर्डर रेसही पूर्ण केली. यावेळी भारतीय सैनिक धावपटूंना सॅल्युट करतात.

‘आयर्न मॅन स्पर्धा’ पूर्ण करण्याचे उमेश यांचे स्वप्न आहे. त्यांना हेमंत आपसुंदे, चेतन अग्निहोत्री, डॉ. विकास देशमुख यांचे सहकार्य लाभते. आतापर्यंत उमेश हे जवळपास तर सात हजारांहून अधिक किमी धावले असून १४ हजारांहून अधिक किमी सायकलिंग केली आहे. “भविष्यात आरोग्याच्या बाबतीत विसंबून राहू नये, यासाठी धावत राहणार. साध्या घराच्या १८ पायर्‍यादेखील मला चढताना बसून चढाव्या लागत होत्या. परंतु, आता १०० किमी अंतर मी सहज धावतो. हे केवळ इच्छाशक्ती, नियमित व्यायाम आणि जिद्दीच्या जोरावर शक्य झाले,” असे उमेश सांगतात. दम्यासारख्या आजारालाही इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर दमवणार्‍या उमेश बूब यांना त्यांच्या आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.