सोरोस यांचा जुनाच धंदा!

    19-Feb-2023   
Total Views |
George Soros

सध्या जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश वादात सापडले आहे. सोरोस नरेंद्र मोदींचे विरोधक असून मोदींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. नुकतेच त्यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे. भारत हा लोकशाही देश आहे. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. मुसलमानांविरोधात हिंसा भडकवण्याचे काम ते करत असून त्यामुळेच त्यांची प्रगती झाली. भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल, पेट्रोल खरेदी करतो आणि त्यातून मोठा नफा मिळवतो, असे सोरोस यांनी म्हटले आहे.

 पुढे पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावरही त्यांनी टीका केली. सोरोस यांचे वय ९२ इतके आहे.त्यामुळे इतक्या वयातही यांना नरेंद्र मोदी काय करतात, याची चिंता पडलेली आहे. जर्मनीमध्ये पार पडलेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. जगात शांतता आणि स्थिरता कशी आणता येईल, यावर या कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्यात आली. परंतु, शांतता आणि स्थिरता राहिली बाजूला, त्यांनी आपले अकलेचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानली. ४२ मिनिटांच्या भाषणात त्यांनी हवामान बदल, रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीतील भूकंप या मुद्यांना स्पर्श केला. परंतु, कारण नसताना त्यांनी मोदींना हुकूमशाह ठरवण्याचा प्रयत्न केला. सोरोस हे काही एकटे नाहीत, त्यामागे मोठी इकोसिस्टीम आहे, जी मोदीच नव्हे, तर भारताचाही तिरस्कार करते.

सोरोस नेमके आहेत तरी कोण, हाही एक प्रश्न आहे. हंगेरीत जन्मलेले सोरोस १९५६ साली अमेरिकेत आले. अब्जाधीश असलेले सोरोस स्वतःला समाजसेवक असल्याचे सांगतात. २०११ पर्यंत ते मोठमोठ्या लोकांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन पाहत होते. यातूनच त्यांनी ८.५ बिलियन डॉलर म्हणजेच ७० हजार कोटींची संपत्ती उभी केली. १९८४ मध्ये त्यांनी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ची स्थापना केली. यामार्फत १२० देशांमधील अभिव्यक्तिस्वातंत्र्य, न्याय-समानता, सरकारचे कर्तव्य यावर काम करणार्‍या संस्थांना सहकार्य केले जाते. सोरोस महाशयांना पैशांची कमी नाही. १९९९ साली त्यांनी भारतात त्यांच्या फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्यास सुरूवात केली. २०१४ ते २०२० दरम्यान त्यांनी भारतातील संस्थांना ११.९ बिलियन डॉलर म्हणजेच १०० कोटींची आर्थिक मदत दिली. यातील ३३ टक्के मदत डेमोक्रेटीक प्रॅक्टिस, ३१ टक्के ’जस्टिस रिफॉर्म अ‍ॅण्ड रूल ऑफ लॉ’साठी देण्यात आली.

२०१६ साली ’एफसीआरए’चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने या ‘ओपन सोसायटी’ला ‘वॉच लिस्ट’मध्ये टाकले, ज्याला सोसायटीने २०२० साली दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. २०२० साली ’जागतिक इकोनॉमिक फोरम’मध्ये सोरोस यांनी मोदींना हुकूमशाह म्हणत राष्ट्रवादी विचारधारेचे लोकं धोकादायक असल्याचे म्हटले होते.सोरोस यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी यांचे सर्व लक्ष्य निवडणुका जिंकण्यावरच आहे. परंतु, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे ज्यांचे एकमेव लक्ष्य आहे ते सोरोस असे वायफळ आरोप करत आहेत. राजकीय नेता कोणताही असो तो निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य ठेवतो, हे सोरोस यांना माहिती नसावे बहुधा. ‘हिंडेनबर्ग’, ‘बीबीसी डॉक्युमेंटरी’वरून काँग्रेस आक्रमक झाली.परंतु, सोरोस आणि काँग्रेसचेही फार मधुर संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, ’भारत जोडो’ यात्रेत ’ओपन सोसायटी’चे उपाध्यक्ष सलील शेट्टी राहुल गांधींसोबत पायी चालले होते.

शशी थरूर तर सोरोस यांचे जवळचे मित्र आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी अमृत सिंह ‘ओपन सोसायटी जस्टीस इनिशिएटीव्ह’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादविरोधी योजनेचे काम सांभाळत आहे.पैसे कमवताना नैतिकता-अनैतिकता पाहत नसल्याचे सोरोस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे, त्यामुळे सोरोस यांनी केलेली बडबड गांभीर्याने घेण्याची गरजच नाही. २०२२ मध्ये लोकशाहीवरून एक अहवाल आला, ज्यात भारताला ९३ वा क्रमांक देण्यात आला. तसेच, भारतातील सरकार ६ वे निरंकुश सरकार असल्याचेही यात म्हटले गेले. डेमोक्रेसी रेटिंग २०२२ हा अहवाल वी-डेम संस्थेने प्रकाशित केला होता आणि सोरोस यांची ‘ओपन सोसायटी’ व्ही-डेमला आर्थिक साहाय्य करते. २००३ साली जॉर्ज बुश यांच्या पराभवासाठीही सोरोस यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे संपत्ती कमवायची आणि त्यातून भारतविरोधी चाली खेळायच्या हा सोरोस यांचा जुनाच धंदा आहे. जो ते ९२ व्या वर्षी न थकता न थांबता करत आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.