आजच्या माहितीप्रवण आणि निरीक्षणप्रधान युगात गुप्तचर तंत्रांच्या व्याप्तीला पारंपरिक चौकटीत मर्यादित ठेवणे अशक्यच. त्याच धर्तीवर अमेरिकेतील पेंटागॉन परिसरात वाढलेल्या पिझ्झाच्या मागणीतून जागतिक संकटांची पूर्वसूचना मिळू शकते, ही बाब प्रथमदर्शनी विनोदी वाटू शकते. मात्र, मागील चार दशकांच्या घटनांचा अभ्यास केला असता, यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला चक्क ‘पिझ्झा निर्देशांक’ असे नावही दिले गेले. हा ‘पिझ्झा निर्देशांक’ गेले दोन-चार दिवस अनेक संरक्षणतज्ज्ञांना भेडसावणारा प्रमुख प्रश्न ठरलेला दिसतो. जून महिन्याच्या दि. 12 आणि दि. 13 रोजी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयाभोवती असणार्या पिझ्झा केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळेस अचानक गर्दी वाढल्याचे ‘जीपीएस ट्रॅकिंग’ डेटातून स्पष्ट झाले. पिझ्झा विक्री करणार्या विविध ब्रॅण्ड्सच्या मागणीमध्ये झालेली ही वाढ काही तासांतच नोंदवली गेली. जेव्हा एकीकडे हे घडत होते, त्याच वेळेस इस्रायलने इराणविरोधात मोठा लष्करी हल्लाही केला. ही घडामोड ‘पिझ्झा निर्देशांक’ व युद्धजन्य परिस्थिती यांमधील संबंधांकडे अंगुलीनिर्देश करते.
खरं तर हा प्रकार नवा नाही. गेल्या 40 वर्षांत अशा पिझ्झा ऑर्डर निर्देशांकातील वाढीने किमान 21 जागतिक संकटांची पूर्वसूचना दिली होती. शीतयुद्धाच्या काळातही सोव्हिएतचे गुप्तचर अमेरिकेतील पिझ्झा केंद्रांवर लक्ष ठेवून असत. त्याचप्रमाणे दि. 1 ऑगस्ट 1990 रोजी वॉशिंग्टनमधील एका पिझ्झा केंद्रावरून ‘सीआयए’च्या इमारतीमध्ये पिझ्झाची आवक वाढली. त्याच रात्री इराकने कुवेतवर आक्रमण केले होते. 1998 सालीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या आधी ‘पेंटागॉन’च्या आसपासच्या परिसरात रात्रीच्या वेळी पिझ्झाच्या मागणीत अचानक वाढ झाली होती. याचे स्वरूप केवळ अपघातजन्य नव्हते, तर ते व्यापक धोरणात्मक हालचालींचा भाग होते, असे तज्ज्ञांचे मत. ‘पिझ्झा इंडेक्स’सारखे प्रकार ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’च्या परिघात येतात. गुप्तचर माहिती संकलनासाठी आता केवळ उपग्रह, सिग्नल इंटरसेप्ट वा एजंट नेटवर्क पुरेसे नाहीत, तर सामान्य जनतेच्या दैनंदिन डिजिटल सवयी, जसे की अन्नपदार्थ वितरण करणारे अॅप्लिकेशन, जीपीएस ट्रॅफिक डेटा, रिअल टाईम गुगल मॅप ट्रेंड्स हेसुद्धा आजच्या काळात गुप्त माहितीच्या विश्लेषणासाठी प्रभावी साधन ठरू शकतात.
त्यामुळे प्रश्न असा की, एखाद्या लष्करी मुख्यालयाजवळ रात्री उशिरा खाद्यपदार्थांची मागणी वाढते, म्हणजे नेमकं काय सूचित होतं? यातून अनेक तर्कवितर्कांना उधाण येते, ज्यामध्ये अनेक अधिकार्यांना आपत्कालीन बैठकींसाठी बोलावणे, निर्णय प्रक्रियेतील गुप्ततेमुळे स्थान सोडता न येणे, अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. परिणामी, झपाट्याने पिझ्झा किंवा तत्सम अन्नपदार्थांची मागणी वाढते. तज्ज्ञांच्या मते, हे सर्व एकत्रितपणे संरक्षणाच्या पातळीवर सारेकाही अलबेल नसल्याचे लक्षण आहे.
अर्थात, या संकेतांचे तांत्रिक मूल्यमापन आवश्यक आहेच. गुप्त माहितीच्या संकलनामध्ये कोणताही एक घटक निर्णायक धरता येत नाही. यामध्ये फसवणूक होण्याची शक्यताही असते. त्यामुळे ‘पिझ्झा निर्देशांक’ हा एक संभाव्य पूरक घटक मानावा लागतो. यासोबतच इतर घटक जसे की, विमानतळांवरील उड्डाणांची गती, ऊर्जा वापर, विजेचा खप, अत्यावश्यक सेवांची वाहतूक अशा विविध गोष्टींच्या माहिती संकलनातूनच चित्र अधिक स्पष्ट होते.
‘पिझ्झा निर्देशांक’ आणि इराण-इस्रायल युद्धाच्या संबंधाला ‘पेंटागॉन’ने नाकारले आहे. मात्र, विविध प्रसंगी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या प्रकारचा स्पष्ट डेटा प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे, हे धोरणात्मक दुर्बलता ठरू शकते.
आता केवळ शत्रूदेशांच्या लष्करी हालचालींचा मागोवा घेणे पुरेसे नाही, तर त्यांच्या गुप्तचर पद्धतींना प्रतिसाद देणारी आणि त्यांच्या ‘नॅरेटिव्हस’ समजून घेणारी माहिती संकलन यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. आज खरी लढाई माहिती व संकेत यांच्यातूनच सुरू होते. नव्या युगात, जिथे एआय, ‘बिग डेटा’ आणि ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’चा वापर वाढत आहे, तिथे ‘पिझ्झा निर्देशांक’सारखे उदाहरण म्हणजे सर्जनशील गुप्तचर बुद्धिमत्तेचे एक प्रतीक. ते थेट धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा भाग नसेलही. पण, काहीतरी अनैसर्गिक घडत असल्याकडे तो अंगुलीनिर्देश नक्कीच असू शकतो!
- कौस्तुभ वीरकर