ब्राझीलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीने अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या. कारण, गेल्या दशकभरात जिनपिंग यांनी ‘ब्रिक्स’ला दांडी मारलेली नाही.
पण, यंदा त्यांच्याऐवजी पंतप्रधान ली कियांग यांच्या ‘ब्रिक्स’मधील हजेरीने चीनमध्ये नेमके चाललेय तरी काय, हा प्रश्न जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला. यामागे खरं तर दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. काही वृत्तसंस्थांच्या मते, जिनपिंग सत्तेचे हस्तांतरण करण्याच्या मार्गावर आहेत, तर काही अंतर्गत सूत्रांनुसार, जिनपिंग यांना सत्तेपासून पद्धतशीरपणे हकालपट्टीसाठी ‘पॉलिट ब्युरो’अंतर्गत कारवायांना वेग आला आहे. पण, शेवटी चीनच्या अभेद्य भिंतीआड नेमकं काय शिजतयं, याची कानोकान कुणाला खबर लागत नाही, ही बाब आजही तितकीच खरी. त्यामुळे या चर्चांचा दोन्ही दृष्टीने कानोसा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
शी जिनपिंग हे गेल्या 13 वर्षांपासून चीनच्या अध्यक्षपदावर घट्ट मांड ठोकून आहेत. तसेच, आजीवन आपणच अध्यक्षपदी विराजमान राहू, याची तजवीजही जिनपिंग यांनी करून ठेवली. परंतु, आता एकाएकी जिनपिंग यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. यादरम्यान दि. 30 जून रोजी पार पडलेल्या एका बैठकीत जिनपिंग यांनी 24 सदस्यीय ‘पॉलिट ब्युरोे’मधील सदस्यांकडे एकूणच अधिकार, जबाबदार्या आणि सत्तावाटपाच्या सूत्राबाबत चर्चा केल्याचेही समजते. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे (सीपीसी) एकूणच नियमन आणि सदस्यांच्या जबाबदार्या यावेळी निश्चित करण्यासंबंधी चर्चा झाल्या. यावरून निवृत्तीच्या तयारीत असलेले जिनपिंग सत्तेचे सुरळीत हस्तांतरण व्हावे आणि ही व्यवस्था त्यांच्या पश्चात कोलमडू नये, म्हणून प्रयत्नशील असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. खरं तर माओनंतर जिनपिंग हे ‘सीसीपी’वर एकछत्री अंमल प्रस्थापित करून हुकूमशाही प्रस्थापित करण्यात पुरते यशस्वी ठरले होते. त्यामुळे ‘सीसीपी-पॉलिट ब्युरो’, सरकारी व्यवस्था आणि चिनी लष्कर अशा तेथील तिन्ही प्रमुख यंत्रणांवर जिनपिंग यांचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले. जिनपिंग यांच्या मर्जीतील अधिकार्यांच्या मोक्याच्या जागी नियुक्त्याही करण्यात आल्या. त्यामुळे वर्षागणिक चीनचे सर्वेसर्वा म्हणून जिनपिंग आपली पकड घट्टच करीत गेले. मग आता अचानक असे काय घडले की, जिनपिंग निवृत्तीमार्गावर वळले असावेत? पण, चीनमधील काही विश्लेषकांच्या मते, जिनपिंग हे निवृत्ती पत्करणार नसून, दैनंदिन कामकाजातून स्वतःला काहीसे मोकळे करून, अन्य मोठ्या उद्दिष्टांकडे लक्ष्य केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपले हात काहीसे रीते केल्याचे समजते.
याउलट ‘सीसीपी’मध्ये काहीएक आलबेल नसून, जिनपिंग यांचा विचारधारेप्रतिचा ताठरपणा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिहस्तक्षेपामुळे ‘सीसीपी’मध्ये नाराजी आहे. त्यातच मागे जिनपिंग यांनी भ्रष्टाचार निमूर्र्लन मोहीम राबवून सरकारी मंत्र्यांपासून ते सैन्यातील उच्चपदस्थांपर्यंत कित्येकांना बाहेरचा रस्ता दाखवला. आर्थिक पातळीवरही चीनमध्ये सगळा आनंदी आनंदच. गडगडलेले रिअल इस्टेट क्षेत्र, वाढती महागाई, अमेरिकेशी व्यापारयुद्धातून अधिकच ताणले गेलेले संबंध यांना जिनपिंग यांची एककल्ली धोरणेच जबाबदार असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे या अर्थसंकटातून चीनला बाहेर काढू शकेल, अशा सर्वसमावेशक नेत्याची गरज ‘सीसीपी’ला वाटते. त्यातच चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्या ‘पॉलिट ब्युरो’मधील समर्थकांनीही दबक्या आवाजात का होईना, जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला हादरे द्यायला सुरुवात केलेली दिसते. तसेच, चीनच्या ‘पिपल्स लिबरेनशन आर्मी’ अर्थात ‘पीएलए’चे उपप्रमुख जनरल झांग युक्सिया जे कोणे एकेकाळी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जात होते, आज त्यांच्याच हातात लष्करी शक्ती एकवटलेली. पण, त्यामुळे ‘सीसीपी’च्या चिंतेत अधिकची भर पडली. एकीकडे आर्थिक प्रगती आणि त्याचबरोबर लष्करी सामर्थ्य, असे चीनचे दुहेरी सशक्तीकरण व्हावे, म्हणून ‘सीसीपी’ प्रयत्नशील दिसते. त्यासाठीच विद्यमान पंतप्रधान ली कियांग किंवा माजी उपाध्यक्ष असलेले वांग यी यांच्याकडे जिनपिंग यांचे उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे ही जिनपिंग यांचीच नवीन खेळी की जिनपिंग यांचाच ‘खेला’ होतो, हे पाहणे औत्सुक्याचे!