दहावी ते १० हजार : एक अनोखा संघर्ष

    17-Feb-2023   
Total Views |
Nikhil Nilkanth Darekar

अनेक प्रयत्न करूनही दहावीचा फेरा काही सुटला नाही. परंतु, आतापर्यंत त्याने ९ हजार ६०० गोवंशाची सुटका केली. जाणून घेऊया युवा गोवंशसंरक्षक निखिल निलकंठ दरेकर याच्याविषयी...

कोकणातील पोलादपूर तालुक्यातील कोंढवी गावात निखिल नीलकंठ दरेकर याचा जन्म झाला. आई-वडिलांचा शेतीचा व्यवसाय. त्यावरच उदरनिर्वाह चालायचा. रायगड जिल्हा परिषदेच्या कोंढवी प्राथमिक विद्यालयात निखिलने सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बालपणी घरच्या गाईंना चारा-पाणी घालण्याची त्याला विशेष आवड. पुढे इंग्लिश स्कूल, पैठणमध्ये त्याने प्रवेश घेतला. इंग्रजी आणि गणित कच्चे असल्याने इयत्ता दहावीत निखिलला अपयशाचा सामना करावा लागला. अनेकदा प्रयत्न करूनही यश काही आले नाही. पुढे कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले. कुटुंबावर वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्याने लहानपणापासूनच त्याला वारकरी संप्रदायाची आवड निर्माण झाली.

ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आळंदीच्या इंद्रायणी नदीतीरावर पखवाज वाजवणार्‍या मुलांना पाहून निखिलनेही कसबा पेठेत तुकाराम भूमकर गुरूजींकडून तीन वर्षे पखवाज वादनाचे धडे घेतले. एकदा देवाची आळंदीमध्ये बंडातात्या कराडकर यांच्या कीर्तनाला तो गेला असता, त्यावेळी महाराजांनी देवनारच्या कत्तलखान्याविरोधात केलेल्या आंदोलनाची माहिती सांगितली. तसेच, कीर्तनात गाय का वाचली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. कराडकर महाराजांच्या कीर्तनाने प्रेरित होऊन निखिलने गोरक्षणाच्या कार्यात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. गोरक्षणाचे कार्य करणार्‍या युवकांशी त्याचा संपर्क आला आणि या कार्याविषयी अधिकची माहिती मिळत गेली. एका खासगी कंपनीतील नोकरी सांभाळून त्याने या कार्यात उतरण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु, प्रवास सोपा नव्हता. एकदा ऑफिसमधून घरी येताना त्याने चार गोवंशाची वाहतूक करणारे वाहन अडवले, अपुर्‍या माहितीमुळे त्याला कोणतीही कार्यवाही करता आली नाही.

पुढे त्याला दीपक बोरगल, सुरज भगत, सचिन शित्रे यांसारखे सहकारी मिळाले. सय्यद नगर येथील कत्तलखान्यावर पहिल्यांदा धाड टाकली असता पाच गाईंची कत्तल झाली होती, तर सात गाईंची सुटका करण्यात निखिल आणि सहकार्‍यांना यश आले. अर्धवट कापलेल्या गायी तसेच थडथडणारे काळीज पाहून निखिल सुन्न झाला. त्यानंतर त्याने किमान महाराष्ट्रात तरी गोहत्या बंद करण्याचा संकल्प केला. गोरक्षणकार्याचा अंदाज आल्यानंतर त्याने सर्वप्रथम त्याचे खबरी अर्थात माहितीदार वाढवण्यास सुरूवात केली, जेणेकरून गोवंशाच्या कत्तलीची माहिती मिळेल. धाराशिवच्या परांडात छापा टाकून दोनशेपैकी ९० गाईंची सुटका केली, परंतु उर्वरीत गोवंशाची कत्तल तो थांबवू शकला नाही. निखिलचे धाडस वाढत गेले आणि त्याने मोठमोठ्या कत्तलखान्यांवर धाडी टाकून गोवंशाचे संरक्षण करण्याचा धडाका लावला.

पुण्यातील हवेली, पुरंदर, दौंड, कात्रज, हडपसर, नाना पेठ, फलटणमध्येही त्याने कारवाई केली. कोंढवामध्ये तर सर्वाधिक २१ वेळा कत्तलखान्यांवर छापा टाकून गोवंशाची सुटका केली. पुण्यापुरते मर्यादित असलेले हे कार्य त्याने काही सहकार्‍यांसोबत अन्य जिल्ह्यांतही सुरू केले. रायगड, पनवेल, गोरेगाव, माणगाव, पोलादपूर, ठाणे, अहमदनगर, धाराशिवमध्ये त्याने गोवंश संरक्षण सुरू केले. पुण्यात कोंढव्यात त्याच्यावर २०१७ साली जीवघेणा हल्ला झाला. गोवंशाची कत्तल होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर निखिल आणि त्याच्या चार सहकार्‍यांनी कत्तलखान्यावर धाड टाकली. परंतु, ५०हून अधिक जणांनी त्याला चौकामध्ये गाठत मारहाण केली. ओळखू येऊ नये, म्हणून निखिलने गुंडाळलेली मफलर जमावाने काढून घेत पाहिले निखिललाच मारण्याचा इरादा पक्का केला होता. परंतु, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तो बचावला. अहमदनगरमध्ये त्याच्यावर २०० ते ३०० जणांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला.

अनेकदा कसायांनी जीवे मारण्यासाठी त्याचा पाठलाग केला. परंतु, मरण हातावर घेऊन कार्य करत असल्याने त्याने कधी फारसा विचार केला नाही. आतापर्यंत निखिलने ९ हजार, ६०० हून अधिक गोवंशाची सुटका केली आहे. हे सर्व कार्य पोलिसांच्या मदतीने आणि साहाय्याने केले जाते. सुटका केलेल्या गोवंशाला नंतर गोशाळेमध्ये पाठवले जाते. त्याला या कार्यासाठी कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्याला चेतन शर्मा, पंडितदादा मोडक यांचे मार्गदर्शन व मित्र गोरक्षक दीपक गोरगल, शादाब मुलाणी, सचिन शित्रे, महेश पवार, सुरज भगत, मंगेश चिमकर, सुंदाम शिगोळे, जयेश जगताप, दिनेश दरेकर, दीपक उत्तेकर, दीपक गावडे, शिद्धेेश दळवी, रूपेश गराडे, संतोश येरनकर यांचे सहकार्य लाभते. विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून या कार्यात निखिलला शाहदाब मुलानी सहकार्य करत आहे. शाहदाबला गोसेवेची प्रचंड आवड आहे.

“स्वखर्चातून गोरक्षण करणे सोपी गोष्ट नाही. ‘ओळील्या गायी, त्यासी फार लागे काही’ किंवा ‘गोधने चारावया जातो शारंगपाणी, मार्गी भेटली राधिका गौळणी’ म्हणजे, भगवान श्रीकृष्णाने गाईला गोधन समजून गाईची सेवा केली. त्यामुळे गाय वाचली पाहिजे, याच हेतूने मी काम करतो. आईच्या दुधानंतर पुढे गायीचेच दूध आपण पितो. कोकणात गाईंची कत्तल होत नसल्याचा समजही मी खोटा ठरवला. कोकणातल्या अनेक भागांमधील गोवंश कत्तलींचा पर्दाफाश केला,” असे निखिल सांगतो. शिक्षणात भले अपयश आले परंतु, हार न मानता त्याने नोकरी सांभाळून गोसेवेचे आणि गोरक्षणाचे कार्य हाती घेतले. निखिलच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.