काकासाहेब ‘टुबी ऑर नॉट...’

    16-Feb-2023   
Total Views |
pawar and raut

पहाटेच्या शपथविधीमध्ये अजितदादांच्या मोहर्‍यापाठी खरा चेहरा काकासाहेब असतील का? ‘टुबी और नॉट टुबी...’ देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीचा गौप्यस्फोट केल्यापासून महाविकास आघाडीच्या स्वयंघेाषितकर्त्यांना अर्थात संजय राऊतांना असे एकापेक्षा एक प्रश्न पडत आहेत. शेक्सपिअरच्या मूळ नाटकातला दुःखदनायक किंवा अगदी मराठीतल्या ‘नटसम्राटा’तला करूण नायक फिके पडतील, असे काहीसे त्यांना झाले असावे.मनातल्या मनात त्यांनी बारामतीच्या त्यांच्या खर्‍या साहेबांना प्रश्न विचारण्याची कितीदा तरी ‘प्रॅक्टिस’ केली. विचारावं का साहेबांना की, ”साहेब हे खरं आहे का?” ब्रुटस युटूच्या अविर्भावात विचारावंका बारामतीच्या काकांना? ‘नटसम्राटा’च्या आवेगात विचारूनच टाकावा प्रश्न की, ”काकासाहेब, तुम्हीच अशी त्या देवेंद्रसोबत युती करायला अजितदादांना पाठवले, तर मग आमच्यासारख्या पामराने कुणाकडे पाहायचे, काकासाहेब? सत्ता गेलेल्या, सैरभैर झालेल्या या तुमच्या आश्रयाधीन लेकरांनी कुणाकडे याचना करायची, सांगा साहेब सांगा!” मनातल्या मनात अशी डायलॉगबाजी सुरू असतानाच त्यांचा आतला आवाज त्यांना सांगतो की, अरे बाबा, तू त्यांची कितीही हाजी हाजी केली, त्यांच्यासाठी खुर्ची उचलून त्यांच्या पाठी पळालास तरी कुणाच्या टाळूवरचं लोणी खायची वेळ येईल, तेव्हा ते लोणी तुला मिळणार का? अजितदादा, रोहितदादा आणि मुख्य म्हणजे ताईबाई आहेतच आणि हो आता तर भावी मुख्यमंत्री म्हणून जयंतरावचे बॅनर पण लागलेत. छे! साहेबांचे हे प्रताप ऐकून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो बाप त्याच्या मुलीला प्रश्न विचारतो, “शिवाली, हे खरं आहे का?” आणि तो प्रश्न विचारल्यानंतर तो शिवालीला चांगली अद्दलही घडवतो. तसे काहीसे करता येईल का? हं पण, ते आपणच मनातल्या मनात म्हणत राहावं लागेल. काकासाहेब, हे खरं आहे का? कारण, काकासाहेबांना विचारले तर ते थोडीच खरे सांगणार आहेत? वडाची पान पळसाला लावण्यात आणि वर ती वडाची नाही पळसाचीच पान आहेत, असं जगाला पटवून देण्यात काकासाहेबांचा हातखंडा! यावेळी कसाबसा खासदार बनलो, पुढच्या वेळी काय? कुणाला विचारू आता हे खरे आहे? राऊतांच्या मनातला ‘टुबी ऑर नॉट टुबी’चा चक्रव्यूह असा अव्याहत सुरू असेल का?\

माझाही एक प्रश्न...


मासिक पाळी हा तसा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला एक अतिशय खासगी कप्पा. पण, त्या कप्प्याचे पडसाद तिच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात उमटलेले आहेत. पूर्वी तर सर्रास आणि सर्वत्रच पण आज काही कुटुंबामध्ये या दरम्यान महिलांना सक्तीची विश्रांतीच असते. आता कालानुरूप हे सगळे शिथिल झाले आहे. तसेच हिंदू संस्कृती मुळातच समन्वयी आणि नेहमीच प्रसंगानुरूप सकारात्मक बदल करणारी असल्याने सध्या महिलांच्या मासिक पाळीचा जास्त बाऊ केला जात नाही. अगदी नुकत्याच वयात आलेल्या मुलीही अत्यंत आत्मविश्वासाने आणि ताकदीने या दिवसांत वावरतात. बहुसंख्य मुलीमहिला मासिक पाळीदरम्यान दररोजचे काम सहजपणे करतात. पण, उडदामाजी काळेगोरे असतेच. तसेच काही मुली-महिलांना या काळात शारीरिक आणि मानसिक स्तरावरही त्रास होतो. पोटात दुखणे, हातपाय दुखणे, उलटीसारखे होणे, चिडचिड होणे कधी कधी अवास्तव भीती वाटणे, असे काहीसे या काळात होते. पण, ते त्यांच्या प्रकृतीधर्मानुसार. हे सगळेच काही सगळ्या महिलांना होत नाही. हे सगळे आठवण्याचे कारण ‘मातृत्व लाभ कायदा, १९६१’च्या ‘कलम १४’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी मिळावी, असे सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वाच्च न्यायालयात याचिकेवर शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी करणार आहे. या याचिकेत विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांना मासिक पाळी संबंधित वेदना रजा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मासिक पाळीमध्ये महिलांसाठी रजेचे नियम तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायलय याबाबत काय विचार मांडणार, काय निर्देश देईल हे कळेलच म्हणा. मात्र, या संदर्भात विचार करताना मला वाटत राहते की, निसर्ग जादुगारच आहे. स्त्रीला मासिक पाळीच्या रूपाने अधिकचे काही दिले असेल, तर त्यासाठी तिची इच्छाशक्ती आणि आंतरिक शारीरिक शक्तीही अधिकची दिली आहे. पुढेमागे जर कायद्याने या दिवसांत तिला सक्तीची रजा मिळू लागली, तर मग ऋतुचक्रादरम्यान महिलांना पूर्वीची चार दिवस बाजूला बसवण्याची प्रथा योग्य होती की अयोग्य? माझाही एक प्रश्न!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.