जीना इसी का नाम हैं...

    13-Feb-2023   
Total Views |
ताहराबाद नाशिकचे डॉ. प्रसाद सोनवणे यांनी घरातील मदतीच्या संस्कारांचा वारसा जपत शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याविषयी...



dr. prasad sonavane
ताहराबाद नाशिकचे डॉ. प्रसाद सोनवणे हे ‘सिद्धी ग्रुप ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक. या ग्रुपचे सेमी-इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत. कनिष्ठ महाविद्यालय आणि कौशल्य विकास संस्थाही आहेत. पुढील वर्षापासून येथे मिलिटरी स्कूल आणि वसतिगृहही सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी कन्हैया गोशाळा सुरू केली असून इथे सर्व गाई एकतर कसायाकडून सोडवून आणलेल्या आहेत किंवा काही लोकांनी सोडून दिलेल्या भाकड गाई आहेत.


अनेक वर्षे ते एकल पालक असलेल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. या वर्षापासून देहविक्री किंवा तत्सम दुर्दैवात अडकलेल्या महिलांच्या मुलांचा पूर्ण खर्च ते करणार आहेत. परिसरात मदतीसाठी आणि अगदी न्यायनिवाड्यासाठीही लोक डॉ. प्रसाद यांच्याकडेच येतात. शेकडो लोकांच्या शस्त्रक्रिया, आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना मदत, अशा एक ना अनेक सेवाकार्यात आज डॉ. प्रसाद अविरत कार्यरत आहेत.

डॉ. प्रसाद हे नाशिक येथील ‘मराठा विद्या प्रसारक समाज‘चे संचालक आहेत. ‘प्रायव्हेट स्कूल फेडरेशन महाराष्ट्र’चे ते अध्यक्ष आहेत. ‘रोटरी क्लब ऑफ सटाणा’चे सचिव आहेत. त्यांचे स्वत:चे ताहराबाद येथे ‘सिद्धी हॉस्पिटल व प्रसूतिगृह आहे. शेतकरी संघटना, सटाणाचे ते अध्यक्ष आहेत. स्व. अजबादादा पतसंस्थेचेही ते संस्थापक आहेत. तसे पाहायला गेले, तर डॉ. प्रसाद यांचे पणजोबा अजबा पाटील ते आजोबा शिक्षण महर्षी दगाजी पाटील ते वडील कर्मवीर डॉ. प्रभाकर अशा तीन पिढ्यांनी समाजासाठी तन-मन-धन अर्पण केलेले. त्यांच्या कर्माचे आणि विचारांचे संस्कार डॉ. प्रसाद यांच्या रक्तात नसते तर नवलच.

मूळ सटाणा-बागलाणचे सोनवणे कुटुंब. डॉ. प्रभाकर आणि सुशीलाबाई हे सुविद्य सुसंस्कारीत दाम्पत्य. परिसरातील 24 खेडेगावांत त्यावेळी डॉ. प्रभाकर हे एकमेव डॉक्टर. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांच्या इच्छेने उपचाराचे पैसे द्यावे, असाही त्यांचा शिरस्ता. सुशीलाबाईही अत्यंत कष्टाळू. दोघांना तीन मुले. त्यापैकी एक प्रसाद. आपणही डॉक्टर व्हायचे, असे प्रसाद यांना वाटे. मात्र, प्रसाद यांचा वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश थोडक्या गुणासाठी चुकला. काही जणांनी सुचवले की, डॉ.प्रभाकर सोनवणे यांनी वशिला किंवा स्वत:चे नाव वापरले असते किंवा थोडेफार नियमबाह्य पैसे दिले असते, तर प्रसाद यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला असता.

मात्र, हे सगळे डॉ. प्रभाकर यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. ते भ्रष्टाचाराच्या विरोधात होते. ते प्रसाद यांना म्हणाले, ”तू तुझ्या गुणांनी प्रवेश घेतला असतास, तर पुढील शिक्षणासाठी मी तुला मदत केली असती, पण तुला कमी गुण असताना जास्तीचे पैसे किंवा ओळख दाखवून मी अजिबात प्रवेश घेऊन देणार नाही.” त्यामुळे प्रसाद यांनी विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या काळात प्रसाद यांनी खूप कष्टाची कामे केली. सुरक्षारक्षकापासून ते नाशिक शहरात घरोघरी ‘अ‍ॅक्वागार्ड’ विकण्याचे कामही केले. त्यांना स्वत:ला सिद्ध करायचे होते.

एके दिवशी त्यांना कळले की, नाशिकमध्ये एक नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे आणि तिथे बी.एससी पदवीनुसारही प्रवेश मिळतो. प्रसाद यांनी या महाविद्यालयात ‘डीएचएमएस’साठी प्रवेश घेतला. प्रसाद पहिल्या वर्षी मुंबई बोर्डातून अकरावे आले. दुसर्‍या वर्षी दहावे आले आणि तिसर्‍या वर्षी सातवे आले. डॉ. प्रसाद यांनी नाशिकलाच दवाखाना सुरू केला. इकडे गावी डॉ. प्रभाकर यांनी एक शिक्षण संस्था सुरू केली होती. पण, त्यांच्या सोबतच्या लोकांना त्यांची तत्त्वनिष्ठता मुख्य म्हणजे भ्रष्टाचारविरोधी स्वभावाचा त्रास होऊ लागला. त्यांनी कारस्थान करून संस्थेतून डॉ. प्रभाकर यांना बाजूला केले. हा त्यांच्यासाठी जबरदस्त मानसिक आघात होता. त्यामुळे डॉ. प्रसाद पुन्हा गावी परतले. इथे दवाखाना सुरू केला.

प्रसाद यांनी ठरवले की, वडिलांच्या मनाला उभारी देण्यासाठी आपणच शिक्षण संस्था निर्माण करायची. शाळेला सरकारी परवानगीमिळवण्यासाठीही डॉ.प्रसाद यांना संघर्ष करावाच लागला. शाळेची परवानगी मिळवून देतो म्हणून तीन अधिकार्‍यांनी लाखो रूपयांची लाच मागितली. कष्टाने उभारलेली शाळा सुरू ठेवण्यासाठी लाच द्यावी, अशा विचारात असतानाच प्रसाद यांचा आठ वर्षांचा मुलगा त्यांना म्हणाला, “बाबा, शाळा सुरू करण्यासाठी त्या लोकांनी पैसे मागितले म्हणजे हा भ्रष्टाचार आहे ना? आपल्या घरात तर लाच द्यायला-घ्यायला विरोध आहे ना?” त्याचे म्हणणे ऐकून प्रभाकर यांना पणजोबांपासून ते वडिलांपर्यंतचा सगळा इतिहास क्षणात आठवला.

त्यामुळेच की काय, त्यांनी लाच मागणार्‍या त्या तीनही वरिष्ठ अधिकार्‍यांना पुराव्यासकट तुरूंगात धाडले. त्यांची बाजू सत्याचीच होती. त्यामुळे त्यांच्या शाळेला सरकारी परवाना मिळाला. शाळा सुरू झाली, पण शाळेत गरीब विद्यार्थ्यांकरिता शुल्क आकारू नये, या नियमामुळे प्रसाद यांना शाळा चालवणे अशक्य झाले. एकवेळ शाळा बंद करण्याचेही ठरले, पण त्यावेळीही त्यांच्या आईवडिलांनी खंबीरपणे त्यांना आर्थिक आणि मानसिक साथ दिली. आज त्या शाळेत 1200च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व काळात डॉ. प्रसाद यांच्या पत्नी डॉ. मेघना यांचीही भक्कम साथ आहे. कोरोना काळात अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या डॉ. प्रसाद यांचे म्हणणे आहे की, “आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजशील सत्कार्यासाठी उपयोगात आणायचा आहे.” डॉ.प्रसाद त्यांच्या निर्भय कर्तृत्वातून संदेश देतात की, किसीका दर्द मिल सके तो ले उधार। के मर के भी किसी को याद आयेंगे... जीना इसी का नाम हैं....


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.