नाशिकच्या ’जनजाती कल्याण आश्रमा’ने ‘वीर जनजाती योद्धे’ या नावाचे मोलाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात दिलेल्या या आणखी काही प्रेरणादायी कथा.
वनवासी समाजातील एक प्रमुख जमात म्हणजे भिल्ल. या जमातीत जन्माला आलेले तंट्या भिल्ल यांनी इंग्रजांना अगदी जेरीस आणले होते. त्यांचे मूळ नाव तान्तिया. मध्य प्रदेशात निमाड नावाचा भाग आहे. त्यातील विरी या गावी त्यांचा जन्म झाला. १८५७च्या स्वातंत्र्यसुद्धात भिल्ल जमातीचे लोकही सहभागी होते. तंट्या त्यावेळेस अवघे १५ वर्षांचे होते. या युद्धात आणि त्यानंतर इंग्रजांनी भिल्ल जमातीमधील लोकांवर केलेले अत्याचार त्यांच्या मनावर कोरले गेले होते. त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी इंग्रजांशी संघर्ष सुरू केला. त्याचा परिणाम म्हणून त्यांना एक वर्षभर गजाआड करण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यावरही पोलिसांचा ससेमिरा सुरू होता. खरे तर तेव्हा ते कोणतीही चळवळ करत नव्हते. पण, तरीही त्यांचा छळ थांबेना. त्यानंतर मात्र ते पेटून उठले. त्यांनी भिल्ल तरुणांना संघटित केले आणि जमीनदार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध आवाज उठवायला प्रारंभ केला. अन्याय करणारे जमीनदार आणि इंग्रज अधिकारी यांच्यावर हल्ले चालू झाले. हे हल्ले गनिमी काव्याने होत असत.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, तंट्या यांच्या एका सहकारी मित्राने त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचा ठावठिकाणा इंग्रजांना सांगितला. तंट्या आणि त्यांचे अनेक सहकारी पकडले गेले; पण जिगरबाज तंट्या आणि त्यांचे सहकारी एका रात्री तुरुंग फोडून पसार झाले. त्यानंतर त्यांचा मुक्काम निमाडच्या निबिड अरण्यात चक्क एका गुहेमध्ये होता. त्यामुळे इंग्रज त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्यच होते. ते तेथूनच सगळी सूत्रे हलवीत होते. त्यांनी केलेला संघर्ष इतका तीव्र होता की, निमाडमध्ये भिल्ल लोकांची इंग्रजांसाठी दहशतच निर्माण झाली होती. तान्तियाला पकडण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडले; पण काही उपयोग झाला नाही. पण, त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात इंग्रजांना यश मिळाले.
तंट्या इतका बहाद्दर की, त्या दोघांपैकी एकाला त्यांनी पोलीस पहार्यातून पळवून नेले. या प्रकाराने पोलीस इतके संतप्त झाले की, त्या दुसर्या सहकार्याला त्यांनी चक्क फाशी देऊन, त्याचे प्रेत झाडाला लटकावून ठेवले. पुढे तंट्या एका राखी पौर्णिमेच्या दिवशी (मानलेल्या) बहिणीला भेटायला म्हणून तिच्या घरी गेला खरा; पण त्याच्या मनगटात राखीऐवजी बेड्या पडल्या. त्या बहिणीच्या नवर्याने विश्वासघात करून, पोलिसांना तंट्या त्यांच्या घरी येणार असल्याची माहिती अगोदरच पुरवलेली होती. १८८८ मध्ये शूर वीर तंट्या भिल्ल यांना फासावर चढवण्यात आले. मध्य प्रदेशातील निमाड भागातील भिल्ल आजही तंट्या यांना विसरलेले तर नाहीतच; पण ते तंट्या यांना देवाच्या जागी मानतात. झुंजार वीर भागोजी नाईक यांची कहाणीदेखील अशीच संघर्षमय आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी अंतरावर नांदूर शिंगोटे नावाचे छोटेसे गाव आहे. ते भागोजी यांचे मूळ गाव. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाची मोठी तयारी देशभर झाली होती. हे गाव आणि भागोजी त्यात मागे नव्हते. त्यांनी तरूण मित्रांची एक सेनाच उभी केली होती. इंग्रजांना याचा सुगावा लागला आणि दि. ३ ऑक्टोबर १८५७ या दिवशी त्यांनी या गावावर हल्ला चढवला. पण, भागोजीच्या शूर सैनिक मित्रांनी इंग्रजांशी कडवा संघर्ष केला.
त्यांच्या प्रमुखाला ठार मारले. या लढाईत मिळालेल्या यशामुळे भागोजी आणि त्यांच्या मित्रांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी त्यांच्या संघटनेचा मोठा विस्तार केला. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागात क्रांतिकारकांचे अनेक समूह निर्माण झाले. दि. ९ ऑक्टोबर १८५७ या दिवशी समशेर ( जि. नगर) येथे असलेल्या इंग्रज तुकडीवर जोरदार हल्ला करण्यात आला. तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांची फार मोठी हानी झाली. याच वर्षी डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मोरगाव येथे भागोजीचे सैन्य आणि इंग्रज यांच्यात मोठी चकमक उडाली. त्यात इंग्रजांचा पराभव झाला. पुढच्या काळात भागोजी नाईक यांच्या सेनेने त्रिंबकमध्ये इंग्रजांचा खजिना लुटला आणि हरसूलच्या छावणीवर हल्ला केला. नंतरच्या काळातदेखील या सेनेने ठीकठिकाणी शत्रूशी लढाई केली. शेवटची लढाई झाली-दि. ११ नोव्हेंबर १८५९ या दिवशी. यावेळी मात्र भागोजी यांना चहूबाजूने घेरण्यात शत्रूला यश आले. भागोजीसह त्यांचे सगळे सहकारी या लढाईत हुतात्मा झाले. फक्त एकच सहकारी वाचला.
भागोजी यांचा इंग्रजांविरुद्ध असलेला लढा विषम स्वरुपाचा होता. म्हणजे भागोजी यांच्याकडे साधी शस्त्रे होती, तर शत्रूकडे अत्याधुनिक तोफा होत्या. संख्याबळ आणि इतर सामग्रीमध्ये देखील इंग्रज शक्तिशाली होते, तरीही भागोजी आणि त्यांचे सैन्य यांनी मोठ्या जिद्दीने आणि शौर्याने इंग्रजांना पाणी पाजले.
(संदर्भ ः नाशिकच्या ’जनजाती कल्याण आश्रमा’ने प्रसिद्ध केलेले ‘वीर जनजाती योद्धे’ या नावाचे पुस्तक)
डॉ. गिरीश पिंपळे
९४२३९६५६८६