प्रभू श्रीराम आले हो अंगणी...

    28-Nov-2023
Total Views | 163
 shree ram mandir

विकासापासून दूर असलेले पाडे मूळ विकासात कसे येतील, यासाठी ‘सेवा संकल्प समिती’ गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न करत आहे. अशाच एका पाड्यामध्ये शांती आणि सलोखा राहावा, विकासाची आणि विचारांची गंगा प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने प्रकट व्हावी, या उद्देशाने अतिदुर्गम हेदपाडा येथे भव्य श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान आणि सहेली सेवा मंडळ, उद्योजक मदन देवी यांच्या प्रयत्नांतून हे श्री राम मंदिर आता सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याविषयी...

 
म्हणूनच हवे श्रीराम मंदिर...
सामाजिक एकतेसाठी...
देशाच्या प्रगतीसाठी...
धर्म जागृतीसाठी...
जनजातींच्या विकासासाठी...


‘सहेली सेवा मंडळ’ यांच्या सौजन्याने आणि हेदपाडा ग्रामस्थांच्या श्रमदानातून श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे. रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी या मंदिरात श्रीराम, सीतामाई, श्री लक्ष्मण, श्री हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हेदपाडा, ग्रामपंचायत देवडोंगरा, तालुका त्र्यंबकेश्वर हे अत्यंत दुर्गम ठिकाण. जवळ असलेले दावलेश्वर हे महादेवाचे मंदिर तसे काही लोकांना माहीत आहे. लागूनच वाहत असलेली दमणगंगा नदी, बाजूला देव डोंगरा गावाचा मोठा डोंगर. तसे म्हणाल, तर सहा महिने निसर्गाची भरभरून कृपा. तुफान पाऊस, पण तितकेच वर्षातील सहा महिने रणरणते ऊन आणि त्यातील तीन महिने तर पिण्याच्या पाण्याची वणवण. अशाही वातावरणात विकासापासून दूर असलेले हे पाडे मूळ विकासात कसे येतील, यासाठी ‘सेवा संकल्प समिती’ गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न करत आहे. वरवर उपचार न करता शाश्वत विकास करण्यावर भर असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये वाडी प्रकल्प, सेंद्रिय शेतीवर भर, विहिरींचे पुनर्भरण, 2024 मध्ये आंब्यासाठी आणि तांदूळ यांच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


या पाड्यावर लोकांना एकत्र येऊन गावाच्या प्रगतीवर चर्चा करायची आहे. तीसुद्धा देवाला साक्षी ठेवून. गावात शांती आणि सलोखा राहावा, विकासाची आणि विचारांची गंगा प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने प्रकट व्हावी, यासाठी या पाड्यावर श्रीराम मंदिराची स्थापना व्हावी ही इच्छा येथील लोकांनी व्यक्त केली. यासाठी पाड्याने एकत्र येऊन ठराव केला व श्रमदानाची तयारीदेखील दर्शविली. गावकर्‍यांना या मंदिराचे गांभीर्य व महत्त्व समजले आणि नेहमीच या विषयावर सहकार्य करणारे सहेली सेवा मंडळ लगेच तयार झाले. नाशिकचे प्रसिद्ध उद्योगपती मदन देवी आणि परिवार यांनी यात सर्व आर्थिक हातभार लावला. श्रीनाथ बिल्डर्सचे प्रमुख श्री रामेश्वर मालाणी यांच्या मार्गदर्शनाने या दुर्गम भागात मंदिराची बांधणी झाली. मंदिर उभारणी करताना अनेक संकटे आली. कठीण असा भूभाग, आडवळणाचा घाट रस्ता, निसर्ग निर्मित अडथळे तर होतेच पण काही मानवनिर्मित अडथळेही आले. पण गावाने ठरवले, ‘मंदिर वही बनाएंगे’आणि यावर्षीच्या दिवाळीच्या आधीच मंदिर जनतेसाठी खुले करण्याचा सहेली सेवा मंडळाचा मानस होता. सर्व अडथळे दूर झाले आणि अखेर हे श्रीराम मंदिर सर्व लोकांना खुले झाले.

दोन दिवसांपासून इथे धार्मिक विधी सुरू होते. विशेष म्हणजे मुख्य पूजेसाठी केवळ दानशूर व्यक्ती नव्हते, तर ग्रामस्थांच्यावतीने पाच आदिवासी जोडपे दोन्ही दिवस एकत्रित प्रत्येक धार्मिक विधीत सहभागी होते. इथे कुठेही गरीब श्रीमंत, जात पात असा कुठलाही भेदभाव अजिबात नव्हता. मांडीला मांडी लावून सर्व विधी आणि संस्कार सुरू होते. या प्रसंगी गावातील अनेक माता-भगिनींना श्रीरामाला बघून झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता आणि ते बघून आदिवासी भिल्ल समाजातील श्रीराम भक्त शबरीचे गीत होते.


रामा रघुनंदना.....
आश्रमात तू कधी रे येशील
दीन रानटी वेडी शबरी...
एकदाच ये जाता येता...
पाहीन, पुजीन, टेकीन माथा...
तोच स्वर्ग मज तिथेच राहील...

अशी आर्त भावना या पाड्यांवर असलेल्या महिलांच्या चेहर्‍यावर होती. दोन्ही दिवस सर्व ग्रामाला आणि येणार्‍या पाहुण्यांना दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था ‘सहेली सेवा मंडळ यांच्यावतीने करण्यात आली होती. आजूबाजूच्या चार पाड्यांवर दि. 4 नोव्हेंबर रोजी मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली आणि या सर्व पाड्यांवर श्रीराम दर्शन घडवून आणले गेले. त्याच दिवशी रात्री सगळ्यांनी एकत्रित छान संगीत नाट्य करत करत फुलांचे हारदेखील तयार केले. रात्री धर्मजागरणाचे कार्य करणार्‍या निवृत्ती महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. दोन्ही दिवस आजूबाजूच्या परिसरातील भजनी मंडळे आवर्जून उपस्थित होते.सर्व धार्मिक विधी वेदमूर्ती मुकुंद खोचे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. कलशारोहण विधीसाठी एक नव्हे, तर तीन संन्यासी विभूती उपस्थित होते.स्वामी कंठानंद, ‘इस्कॉन’चे नरसिंह कृपा प्रभू तर बाफनविहीरचे लहुदास बाबा हे विभूती उपस्थित होते.स्वामी कंठानंद यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.सहेली सेवा मंडळ हे श्री गुरुजी रुग्णालयात गरीब रुग्णांना अत्यल्प दरात भोजनदेखील देत असते. म्हणूनच या प्रसंगी ‘श्रीगुरुजी रुग्णालय सेवा संकल्प समिती’ हे या भागातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव तत्पर असेल, असे श्रीगुरुजी रुग्णालयाचे कार्यवाह प्रवीण बुरकुल यांनी या प्रसंगी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत ज्येष्ठ प्रचारक विनायकराव काळे, जयंतराव गायधनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्रामीण कार्यवाह अरुण दादा मोरे, धर्मजागरणचे प्रतिनिधी, ग्रामीण प्रचारक, तसेच रामेश्वर मालानी, डॉ. राजेंद्र खैरे, हर्षवर्धन बडकस, ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय मंत्री रवींद्र बेडेकर, सहेली सेवा मंडळाच्या उर्मिला नाथानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. देवडोंगरा ग्रामपंचायत सरपंच पवन गावित आणि अमोल चौघुले आणि त्यांची सर्व सहकार्‍यांनी अहोरात्र मेहनत घेतली. सर्व ग्रामस्थांनी मंदिराची पुढील सर्व जबाबदारी घेण्याचे मान्य केले आणि हा सर्व दिमाखदार सोहळा सुफळ झाला. प्रभू श्रीराम कृपेने सगळ्यांचे भलेच होईल यात शंका नाही.

मिलिंद जोशी
(लेखक सेवा संकल्प समितीचे व्यवस्थापक आहेत.) 

 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121